आज सईला खूप ताप आला होता. तरीही ती स्वयंपाकघरात उभी राहून पोळ्या करत होती. अरविंदला जाणीव होती की तिला बरे नाही. तरीही तिची चौकशी न करता अरविंदने तिला फक्त एवढंच विचारलं,
“ माझा डबा तयार झाला का?”
त्याचे बोलणे ऐकून सईच्या डोक्यात पाणी आले. पोरकेपणाची भावना अजून गडद झाली. अरविंद तिच्याशी कायम तुटक वागायचा. लग्नाला फक्त सहा महिने झाले होते. पण या सहा महिन्यात मनाने ते एकत्र आलेच नव्हते. अरविंद फक्त कामापुरते तिच्या जवळ जायचा. कामापुरतेच बोलायचा. तिच्यावर जणू एखादा जुना राग काढतोय असाच वागायचा.
अरविंदच्या आयुष्यात एक अशी पोकळी होती, जी कितीही वर्षं गेली तरी भरून निघत नव्हती. ती पोकळी म्हणजे — त्याची आई.
आई गेल्यापासून त्याच्या आयुष्यात सगळं होतं… पण तरीही काहीच नव्हतं. रात्री उशिरा तो ऑफिसमधून घरी यायचा, थकून सोफ्यावर बसायचा आणि नकळत त्याची नजर स्वयंपाकघराकडे जायची.
तेथे आता कोणीच उभं नसायचं.
पूर्वी आई दारात उभी असायची.
“आलास बाळा? थांब… गरम भाकरी करते…”
त्या आवाजात भूक संपवण्याची ताकद होती.
पण आता घरात शांतता होती… आणि त्या शांततेत आईची आठवण आणखी मोठी वाटायची.
अरविंद लहान असतानाच त्याचे वडील गेले होते. आईने लोकांच्या घरची धुणी-भांडी करून त्याला वाढवलं होतं. पावसाळ्यात गळणाऱ्या घरात ती एका हाताने भांडी ठेवायची आणि दुसऱ्या हाताने त्याला छातीशी कवटाळून झोपवायची.
“तू फक्त अभ्यास कर रे…
मोठा हो… अधिकारी हो… मग मला काही नको.”
ती नेहमी हसत त्याला म्हणायची.
पण अरविंदला माहित होतं…आईच्या त्या हसण्यात किती वेदना लपलेल्या आहेत. त्याने अनेकदा पाहिलं होतं की आई स्वतः भूक सहन करून त्याच्या ताटात शेवटची भाकरी वाढायची. एकदा तर शाळेच्या फी साठी आईने तिची एकमेव सोन्याची बांगडी विकली होती.
त्या दिवशी अरविंद रडत म्हणाला होता, “आई… मी मोठा झालो की तुला खूप सुखात ठेवेन. तुला काही काम करू देणार नाही.”
आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला होता.
“माझं सुख तूच आहेस रे…”
काळ पुढे सरकत गेला. अरविंद हुशार होता. शिक्षण पूर्ण झालं. नोकरीसाठी मुलाखती सुरू होत्या. आई रोज देवासमोर दिवा लावायची.
“देवा… माझ्या लेकराला चांगली नोकरी दे. त्याच्या वाट्याला माझ्यासारखे कष्ट येऊ देऊ नकोस…”
पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका रात्री आईला अचानक छातीत दुखायला लागलं. अरविंद तिला दवाखान्यात घेऊन गेला. पावसाची रात्र होती. रस्त्यावर पाणी साचलं होतं. आई स्ट्रेचरवर पडली होती आणि तरीही त्याचाच हात घट्ट पकडून म्हणत होती,
“घाबरू नको बाळा… मी ठीक आहे…आणि मला काही झाले तरीही तू दुखी होऊ नकोस…तुला आनंदी असलेलं पाहून मी सुखाने डोळे मिटेन बघ..”
आईचे शब्द ऐकून अरविंदला आणखीनच भरून आले. पण त्याने आईला ते दाखवले नाही. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी आईला तपासले. डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच उत्तर होतं.
“आम्ही प्रयत्न केले… पण आईला वाचवू शकलो नाही…”
त्या एका वाक्याने अरविंदचं आयुष्य जणू अंधारात हरवलं. आईच्या अंत्यसंस्कारानंतर घरात पहिल्यांदा तो एकटाच बसला होता. लहानपणापासून त्याचं आयुष्य फक्त त्याची आई होती. आईनेच अरविंदचे सगळे जग व्यापले होते. आज त्याच्या आयुष्यात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली होती. चुलीपाशी आईची जुनी शाल पडली होती. त्याने ती छातीशी धरली आणि आयुष्यात पहिल्यांदा लहान मुलासारखा हंबरडा फोडला.
“आई… अजून थोडं थांबायचं होतंस ना…मला तुला खूप सुखात आणि आनंदात ठेवायचं होतं…”
पण मृत्यू कोणासाठी थांबत नाही. त्यानंतर फक्त दोन महिन्यांनी त्याला मोठ्या कंपनीत नोकरी लागली. ऑफर लेटर हातात घेताच त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण आनंद साजरा करायला ज्याची सर्वात जास्त गरज होती… ती व्यक्तीच नव्हती.
तो घरी आला. आईचा फोटो समोर ठेवला. थरथरत्या आवाजात म्हणाला,
“आई…तुझ्या कष्टाला फळ मिळालं बघ…मला चांगली नोकरी लागली…
तू म्हणायचीस ना… माझा मुलगा मोठा होईल…बघ माझा यशाची सुरुवात झाली आहे.”
फोटोतील आई फक्त हसत होती. तेव्हापासून अपराधीपणाची एक सल त्याच्या मनात कायमची घर करून बसली.
काही वर्षांनी कुण्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने त्याचं सईशी लग्न झालं. सई अनाथ होती. तिच्या आत्याने तिला सांभाळले होते. आत्याच्या घरी राहायची आणि दिवसभर कामं करायची. तिला कधी मायेची उब मिळाली नाही. आत्या दोन वेळेला जेवण द्यायची आणि कधीतरी सणावाराला कपडे मिळायचे. नाहीतर घरात जर काही शिळे अन्न उरले असेल तर ते आधी सईला खायला लागायचे. आत्याच्या मुलींचे जुने कपडे सुद्धा तिच्या नशिबात यायचे.
त्यांनी सईला बारावीपर्यंत कसेतरी शिकवले आणि आपल्यावरची जबाबदारी झटकावी तशी आलेल्या स्थळाला होकार देऊन सईचे लग्न लावून दिले.
सई अरविंदच्या आयुष्यात आली. ती प्रेमळ होती. समजूतदार होती.
घर सांभाळणारी होती. दोन प्रेमाच्या शब्दांसाठी आसुसलेली होती. पण अरविंद आई गेल्यावर अबोल झाला होता. त्याच्या मनात एक विचित्र कठोरपणा निर्माण झाला होता. आपल्या आयुष्यात त्याने फक्त एकच स्त्रीला महत्व दिले. ती म्हणजे त्याची आई. इतर नात्यांसाठी त्याच्याजवळ भावनाच नव्हत्या.
तो सतत कामात बुडून राहायचा. घरी आल्यावर चिडचिड करायचा. कधी तिच्याशी आपुलकीने, प्रेमाने दोन शब्द सुद्धा बोलायचा नाही.
सई कितीही दमली तरी तो म्हणायचा,
“तू दिवसभर घरीच असतेस… एवढं काय थकायला होतं?”
तिच्या केलेल्या प्रत्येक गोष्टीत तो चुका काढायचा. त्याच्या मते या जगात त्याच्या आईसारखं कुणीच नव्हतं. सई आजारी असली तरी त्याला फारसं जाणवायचं नाही. कारण त्याच्या मनात कायम एकच विचार होता की “माझ्या आईने तर याहून खूप जास्त सहन केलं आहे आयुष्यात ”
तो नकळत आपल्या आईच्या दुःखाशी प्रत्येक गोष्ट तुलना करू लागला.
आणि त्यात सईचं अस्तित्व हरवत गेलं. त्या असंख्य क्षणांनी मनाने घातलं झालेल्या सईच्या डोळ्यांतलं काहीतरी कायमचं हरवलं. ती शांत झाली. अबोल झाली. पूर्वीसारखी हसणं बंद झालं. ती बोलायची… पण फक्त गरजेपुरतंच. अरविंदला तिच्या वागण्यात झालेल्या बदलाची अजून जाणीव सुद्धा झाली नव्हती.
एकदा सईच्या आत्याच्या घरी कसलातरी कार्यक्रम होता. त्यासाठी सई दोन दिवस मुक्कामी गेली होती. दोन दिवसांनी अरविंद तिला घेण्यासाठी म्हणून तिच्या आत्याच्या घरी गेला. आत्याच्या घरच्यांशी तो तसा फारसा बोलायचा नाही. फक्त कामापुरते बोलायचा.
योगायोगाने त्या दिवशी मदर्स डे होता. आत्याच्या दोन्ही मुली मदर्स डे निमित्त सजावट करत होत्या. त्या दोघीही प्रेमाने आईला मदर्स डे चा केक कापायला लावत होत्या. आईसोबत फोटो काढत होत्या. आत्या सुद्धा तिच्या मुलींच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होती. त्याची दृष्ट काढत होती. त्यांना आशीर्वाद देत होती. त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होती. अरविंदला हे पाहून त्याच्या आईची आठवण झाली. अचानक आत्याची नजर स्वयंपाकघराच्या दारात उभ्या असलेल्या सईकडे गेली. आत्या तिला पाहून म्हणाली.
” अगं अशी उभी काय आहेस…पटकन किचन आवरून घे ना…आणि मग घरी जा… अरविंदराव ताटकळत उभे आहेत तुझ्यासाठी…”
इतक्यात अरविंदची नजर स्वयंपाकघरातून हॉल मध्ये पाहणाऱ्या सईकडे गेली. सईच्या डोळ्यात अश्रू होते. ते ती कसेबसे थोपवून ठेवत होती. तिच्या चेहऱ्यावरची वेदना अरविंद आज पहिल्यांदाच पाहत होता. अनुभवत होता. बहुतेक तिलासुद्धा तिच्या आईची आठवण आली असावी. अरविंदने ऐकले होते की ती वर्षभराची असतानाच तिची आई हे जग सोडून निघून गेली होती.
अचानक त्याला जाणीव झाली की आपल्याला तरी आयुष्यात काही वर्षे आईची साथ मिळाली. बालपण तिच्या मायेच्या पदराखाली सुरक्षित गेलं. पण सई तर लहानपणापासून आईच्या प्रेमापासून पोरकी आहे. मी स्वतः इतका दुखी आहे तर सईच्या दुःखाचे काय. ती आपल्या एका प्रेमळ कटाक्षासाठी सारखी मागेपुढे करायची हे आता अरविंदला जाणवले. या आईविना पोरक्या सईला मी सुद्धा कळत नकळत इतके दुःख दिले या जाणिवेने तो व्यथित झाला होता.
आत्याच्या मुली हॉलमध्ये छान फोटो काढत होत्या आणि सई स्वयंपाकघरात काम करत होती. अरविंद किचन मध्ये गेला आणि सईचा हात पकडून म्हणाला.
” काम राहूदे बाजूला…तुझ्या आत्याच्या मुली करतील ते…चल आपल्या उशीर होतोय…”
अरविंदने आज पहिल्यांदाच हक्काने सईचा हात पकडला होता. सई त्या स्पर्शाने मोहरली होती. पहिल्यांदा तिला त्याच्यासोबत एवढे सुरक्षित वाटत होते. ती सुद्धा त्याचा हात पकडून तशीच बॅग घेऊन निघून गेली. आत्या आणि तिच्या मुली आज अरविंद आणि सईकडे बघतच राहिल्या.
अरविंद सईशी एवढा चांगला वागत नाही हे आत्याला आणि तिच्या मुलींना माहित होते म्हणून त्या मुद्दामहून त्याच्यासमोर तिला अजून घालून पाडून बोलायच्या. पण आज मात्र अरविंदच्या सई सोबत वागण्या वरून त्यांना अंदाज आलाच होता की यानंतर सईची बाजू घ्यायला तिचा नवरा अरविंद नेहमी उभा राहणार आहे.
घरी गेल्यावर दमलेली सई लगेच झोपी गेली. त्या रात्री अरविंद मात्र बराच वेळ जागाच होता. सई त्याच्या बाजूला झोपली होती.
थकलेल्या चेहऱ्यावर केस आले होते. हातांवर भांड्यांच्या साबणामुळे पडलेली खरखरीत त्वचा स्पष्ट दिसत होती.
अचानक त्याला स्वतःची आई दिसू लागली. तीच थकलेली नजर…तीच स्वतःला विसरून कुटुंबासाठी जगण्याची सवय…त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने आयुष्यात पहिल्यांदा सईचा हात अलगद हातात घेतला.
मनात एकच विचार घुमत होता —
“आईसाठी काही करू शकलो नाही…
पण आईविना पोरक्या सईला मात्र असं तुटू देणार नाही. तिच्या आयुष्यातली आईची पोकळी भरून काढू शकत नसलो तरीही तिच्या उरलेल्या आयुष्यात तिच्यावर खूप प्रेम करेन, तिच्यावर माया करेन, तिला सुखात ठेवीन…”
दुसऱ्या दिवशी सकाळी सई उठली तेव्हा स्वयंपाकघरातून चहाचा वास येत होता. ती आश्चर्याने बाहेर आली. अरविंद चहा करत होता.
तिने विचारलं,
“अहो तुम्ही स्वयंपाकघरात काय करताय…मी करते ना…”
त्याने तिच्याकडे पाहिलं.
त्याचे डोळे लाल झाले होते.
“ मला माफ कर सई…” इतकंच बोलताना त्याचा आवाज भरून आला.
“मी तुला कधी समजूनच घेतलं नाही…” तो पुढे म्हणाला.
सई काही बोलली नाही कारण काय बोलावं हे तिला कळत नव्हतं.
” अहो तुम्ही असं माफी वगैरे मागू नका…मी ठीक आहे…माझी काहीच तक्रार नाही तुमच्याबद्दल…” सई कशीबशी म्हणाली.
त्या दिवशी तिने अरविंदच्या डोळ्यांत पश्चात्ताप पाहिला. हळूहळू अरविंद बदलू लागला. तो सईला विश्रांती घे म्हणू लागला.तिच्या आवडीच्या गोष्टी विचारू लागला. रात्री उशिरा तिच्यासाठी चहा बनवू लागला.
एकदा तर तो तिला साडी घ्यायला घेऊन गेला. साडी निवडताना सईच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा कोणीतरी तिची आवड विचारत होतं.
त्या रात्री अरविंद आईच्या फोटोसमोर उभा राहिला. फोटोवरील धूळ हलकेच पुसली. आणि म्हणाला,
“आई…तुला सुख देऊ शकलो नाही मी…पण आता तुझ्यासारखं आयुष्य जगणाऱ्या एका स्त्रीला तरी या जन्मात कधीच रडू देणार नाही.”
आईच्या फोटोकडे पाहून त्याला जाणवलं…
आईला खरं सुख महागड्या वस्तूंमध्ये नव्हतंच. तिला फक्त एवढंच हवं होतं — तिचा मुलगा एक चांगला माणूस व्हावा.
आणि त्या दिवशी, अनेक वर्षांनी…
अरविंद खऱ्या अर्थाने मोठा झाला होता.
समाप्त.







