वैदेहीने तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. आणि तिच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी व्हायला लागली. वैदेही आठव्या वर्गात असेल तेव्हाच तिची आई हे जग सोडून गेली होती. तेव्हापासून आपसूकच तिच्यावर सर्व घराची जबाबदारी येऊन पडली.
तिच्या घरी ती, तिचा मोठा भाऊ सागर, आणि तिचे बाबा एवढे तिघेच होते. शिक्षणात बऱ्यापैकी हुशार असणारी वैदेही घरातील जबाबदाऱ्या पार पाडत शिक्षण देखील घेत होती. वैदेही भल्या पहाटे उठून घरी सडा टाकायची.
त्यानंतर सर्वांचा चहा, नाश्ता, जेवणाची तयारी करायची. जेवण आटोपले की मग कपडे धुणे, भांडी घासणे ही सर्व कामे करून शाळेत जायची. कधी कधी तिला तिच्या आईची खूप आठवण यायची. आणि मग ती कितीतरी वेळ एकटीच रडत बसायची.
घरातील कामे करून सुद्धा वैदेहीने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले होते. वैदेहीच्या वडिलांना वाटायचे की वैदेही वरील जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात आणि तिने शिक्षणाकडे लक्ष द्यावे. म्हणून त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न लावून द्यायचे ठरवले. त्यांना वाटले की सुनेच्या रूपाने वैदेहीला सोबत मिळेल.
म्हणून त्यांनी सागर साठी मुली पाहायला सुरुवात केली. त्यांच्या नात्यातील व्यक्तीने त्यांना सविताचे स्थळ सुचवले. सविता एका गरीब घरातील मुलगी होती. दिसायला सुंदर आणि बारावी पर्यंतचे शिक्षण झालेले होते. त्यांना सविता सागर साठी योग्य वाटली. सागरला देखील सविता पसंत पडली आणि दोघांचेही लग्न पार पडले.
नवीन वहिनी घरी आल्याने वैदेही खूप आनंदात होती. तिला वाटले वहिनीच्या रूपाने आपल्याला मैत्रिणी मिळाली म्हणून. पण सविता मात्र वेगळ्याच विचारात होती. सविताला वाटले घरी सासू नसल्याने आता पूर्ण घराचा कारभार आपल्याच हाती असेल.
वैदेही सविताशी खूप बोलायची. वहिनी वहिनी करून दिवसभर तिच्या मागे मागे फिरायची. वहिनी मात्र वैदेहीशी तुटकपणाने बोलायची. वैदेही कडून घरातील सर्व कामे करून घ्यायची. घरात काही खाऊ आणला की वहिनी लपून ठेवायची. स्वतः लपुनछपून गोडधोड करून खायची.
घरातील कामांमध्ये वैदेहीचे अभ्यासात दुर्लक्ष होऊ लागले होते. सविता हळूहळू घरातील सर्व कारभार हातात घेत होती. आणि वैदेहीला गोड बोलून राबवून घेत होती. वैदेही च्या वडिलांना मात्र आपल्या वैदेहीला वहिनीच्या रूपाने चांगली सोबत मिळाली ह्याचा आनंद होत होता.
दहावीत चांगल्या मार्कांनी पास होणारी वैदेही बारावीत मात्र एका विषयात काठावर पास झाली होती. आता मात्र तिच्या वहिनीला तिच्या लग्नाचे वेध लागले होते. तिने नातेवाईकांना वैदेही साठी स्थळ शोधायला सांगितले.
वैदेहीचे वडील म्हणाले की त्यांना इतक्या लवकर वैदेहीचे लग्न करायचे नाही तेव्हा सविता म्हणाली की आतापासून पाहायला सुरुवात केली तरी अजुन 2-3 वर्षे लागतील लग्न व्हायला. वैदेहीच्या वडिलांना सुध्दा देखील हे पटले आणि वैदेहीसाठी स्थळ शोधायला लागले.
वैदेही साठी वरसंशोधान सुरू असताना सविताने गोड बातमी दिली. दादा आणि वहिनीला बाळ होणार ह्याचा वैदेहीला खूपच आनंद झाला. इकडे वैदेहीला एका खूप चांगल्या मुलाचे स्थळ चालून आले. मुलगा चांगल्या नोकरीवर होता. मोठ्या शहरात राहायचा. घरी फक्त तो आणि आई दोघेच राहायचे.
त्यांना वैदेहीचा फोटो पसंत पडला होता. इकडे सविताच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी सुचत होते. तिला वाटले वैदेहीचे इतक्यात लग्न झाले तर तिला बाळंतपणात तिची मदत होऊ शकणार नाही. आणि वैदेहीला इतके चांगले स्थळ मिळाले म्हणून वहिनीला तिचा मत्सर वाटत होता.
म्हणून तिने वैदेहीच्या लग्नाचा विचार तात्पुरता सोडून दिला. वैदेही सविताला एकाही कामाला हात लावू द्यायची नाही. उलट सविता जे मागेल ते तिच्या हातात द्यायची. वहिनीला मुलगा झाला. घरात सर्वांना आनंद झाला.
वैदेहीला तर बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असे झाले. ती घरातील सर्व कामे करायची. सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबायची. तिची वहिनी बाळाला घेऊन बसायची. आणि वैदेहीची घरातील कामे आटोपली की बाळाला तिच्या जवळ देऊन स्वतः झोपा काढायची. वैदेही मात्र दिवसरात्र बाळाला खेळवत बसायची.
सविताचा बाळ दोन वर्षांचा झाला. आणि पुन्हा एकदा सविताने वैदेहीच्या लग्नाचा विषय काढला. पुन्हा वैदेही साठी स्थळं पाहायला सुरुवात झाली. त्यांच्या जवळच्याच एका नातेवाईकाने वैदेही साठी राघवचे स्थळं सुचवले.
राघवचे नुकतेच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता घरच्यांना शेतीच्या कामात मदत सुद्धा करायचा. राघवला दोन मोठे भाऊ देखील होते. आणि त्यांची लग्नेही झाली होती. राघवच्या घरी भरपूर शेती होती.
सविताला वाटले की हे स्थळ वैदेही साठी योग्य राहील. कारण एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर कामे करावी लागतील आणि तिच्या दोन मोठ्या जावा तिच्यावर हुकुम सुद्धा गाजवतील.
सविताने तिच्या नवऱ्याला आणि सासरे बुवांना हे स्थळ वैदेही साठी खूप चांगले आहे असे पटवून सांगितले. राघव जवळच्याच गावात असल्याने वैदेहीवर आपले लक्ष राहील. शिवाय तिला हवं नको ते देखील बघता येईल. शिवाय भरलेलं घर असल्याने तिला अजिबत एकटेपणा वाटणार नाही.
वैदेहीच्या बाबांना सुद्धा ते कुटुंब चांगले वाटले. खेड्यात राहत असले तरीही फार पुढारलेले विचार होते त्यांचे. त्यांना हुंडा वगैरे सुद्धा काही नको होते. मुलगा सुद्धा चांगला वाटला. राघवच्या घरच्यांना सुद्धा वैदेही खूप आवडली होती. दोन्हीकडील मंडळींची पसंती झाली आणि राघव आणि वैदेहीचे थाटामाटात लग्न झाले.
सविता मात्र खूप खुश होती. तिला वाटले की आता वैदेहीला आणखी जास्त कामे करावी लागतील. शेतात जावे लागेल. जावांचा जाच सहन करावा लागेल. पण याउलट वैदेहीच्या दोन्ही जावा मात्र खूप प्रेमळ होत्या. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी वैदेहीला सांभाळून घेतले.
कामे करण्याची सवय तर वैदेही ला आधीपासूनच होती. पण इथे तिघी जनी मिळून काम करायच्या. आणि हसत खेळत कामे पूर्ण व्हायची. राघव तर खूपच चांगला नवरा होता. वैदेही वर आपला जीव ओवाळून टाकत होता. इतके सारे प्रेम मिळाल्याने वैदेही खूप आनंदात होती.
आणि ह्या सर्वांमध्ये त्यांना एक आणखी आनंदाची बातमी मिळाली. राघवने लग्नाच्या पूर्वी राज्यसेवेची परीक्षा दिली होती. आणि त्याचा रिझल्ट सुद्धा त्याच्या अपेक्षेप्रमाणेच लागला. राघव सरकारी नोकरीत चांगल्या पदावर रुजू झाला.
आता वैदेहीच्या आयुष्यात आनंदी आनंद झाला होता. राघव लवकरच वैदेहीला सुद्धा आपल्या सोबत शहरात घेऊन गेला. सासरच्या लोकांनी तिला इतके प्रेम दिले होते की वैदेहीचा घरातून पाय निघत नव्हता पण राघवने तिला समजावून सांगितले की जेव्हा जेव्हा तुला घरची आठवण येईल तेव्हा तेव्हा आपण घरी येतच जाऊ म्हणून. तेव्हा कुठे वैदेहीला बरे वाटले.
वैदेही आनंदात होती. मात्र सविता वैदेहीला आनंदात पाहून दुखी होत होती. तिला वाटले होते की एकत्र कुटुंबात वैदेहीला जाच होईल. मात्र हिच्या वाट्याला तर सुखच सुख आलंय. सविता मनोमन वैदेहीचा मत्सर करत होती. पण ह्यापासून अनभिज्ञ असणारी वैदेही मात्र आपल्या वहिनीने आपल्यासाठी ह्या जगातला सर्वात चांगला नवरा निवडलाय म्हणून मनोमन तिचे आभार मानत होती.
आपल्या वाट्याला आलेले सुख न अनुभवता सविता केवळ वैदेही ला दुःख कसे देता येईल ह्याचाच विचार करत राहिली. पण कुणी कितीही प्रयत्न केले तरी समोरच्या व्यक्तीच्या नशिबात लिहिलेले सुख हिरावून घेऊ शकत नाही. तिने वैदेहीला आपली लहान बहीण मानून तिच्यावर प्रेम केले असते तर कदाचित सविता सुद्धा निर्मळपणे आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकली असती.
समाप्त.
फोटो साभार – गूगल
©®आरती खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.
very nice
would like to read more
खुपच छान