मनीषाचे कॉल पाहून निशांतला कल्पना आली होती की सुमेधा तिथेही नसेल. तरीही त्याने एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सुमेधा च्या फोन वरून मनिषाला कॉल केला. दुसरीकडून मनीषा म्हणाली.
” हॅलो…सुमेधा ताई…अहो काल परत जाताना आईंनी तुमच्यासाठी दिलेला लाडवांचा डबा घरीच विसरून आल्यात की तुम्ही…”
निशांत ला काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. तो फक्त हॅलो एवढेच म्हणू शकला. त्याचा आवाज ऐकून मनीषा म्हणाली.
” अय्या निशांत दादा…तुम्ही बोलताय का…मला वाटलं सुमेधा ताई असतील… बरं सुमेधा ताईंना निरोप द्याल की त्या लाडवांचा डबा घरीच विसरल्या म्हणून…”
निशांत फक्त हो एवढेच म्हणू शकला. मनीषा तिच्या माहेरी सुद्धा नाही हे त्याला आता कळून चुकले होते. तिकडे त्याची आई बाहेर आली आणि म्हणाली.
” निशांत…काय होतंय हे तू मला सांगणार आहेस का…सुमेधा कुठे आहे…हे सगळं काय सुरू आहे…?”
” सगळं सांगतो आई…आधी सुमेधा कुठे आहे ते तर कळू दे…” हे बोलताना निशांत खूप जास्त घाबरलेला होता.
त्याच्या आईला देखील काहीच कळत नव्हते. त्या लगेच देवाजवळ गेल्या. देवाला हात जोडत म्हणाल्या.
” देवा…माझ्या सुनेला सुखरूप ठेव देवा…तिला लवकर घरी परत येऊ दे…”
इकडे निशांत मात्र सुमेधा कुठे असेल ह्या विचाराने अस्वस्थ झाला होता. मनातून भीती दाटून येत होती. नजर सैरभैर होत होती. इतक्यात त्याला टेरेस फार जाणाऱ्या पायऱ्यांकडे सुमेधाची चप्पल दिसली. त्याच्या डोक्यात लगेच विचार आला. सुमेधा टेरेस वर असेल का…? आणि क्षणाचाही वेळ न दवडता तो धावतच टेरेस वर गेला.
आणि सुमेधा त्याच्या नजरेस पडली. टेरेसवर जाणाऱ्या पायऱ्यांवर डोके टेकवून झोपलेली. तो लगेच तिच्याजवळ गेला. तिला हात लावून उठवायला लागला. पण ह्याने तिला हलवल्यावर देखील ती उठली नाही. तिला खूप ताप भरलाय हे त्याच्या लक्षात आले. त्याने एक दोन दा तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठली नाही. शेवटी ह्याने तिला उचलून घरात आणले.
तिला उचलून घरात आणताना तिच्या सासूबाईंनी त्याला पाहिले. त्या लगेच देवघरातून उठून त्याच्या मागोमाग आल्या. त्याने तिला बेडवर झोपवले. सासूबाईंनी तिच्या डोक्याला हात लावला तर तापाने फणफणत होती ती. बहुतेक तापानेच बेशुद्ध सुद्धा झालेली. सासुबाई निशांत ला म्हणाल्या.
” काय झालंय रे हिला…आणि ही उठत का नाही आहे…कुठे गेली होती ती…?”
” आई…बाहेर टेरेसवरच्या पायऱ्यांवर बेशुद्ध पडलेली होती. बहुतेक ताप असल्यामुळे असे झाले असावे.” निशांत म्हणाला.
आणि निशांतने डॉक्टरांना फोन लावला. तोवर सासुबाई थंड पाण्याच्या पट्ट्या आणायला म्हणून किचन मध्ये गेल्या. तिच्या अंगावरील कपडे सुद्धा अजूनही जरा ओलसर होते. निशांतने वेळ न दवडता तिचे कपडे बदलले. ती अजूनही तापीच्या गुंगीत होती. आता थोडीफार शुद्धीवर यायला लागली होती.
इतक्यात डॉक्टर सुद्धा आले. डॉक्टरांनी तिला तपासले आणि म्हणाले.
” ताप जरा जास्तच आहे…मी औषध लिहून दिलं आहे…हिला काहीतरी साधा आहार द्या आणि मी दिलेले औषध द्या…थोड्या वेळात बरे वाटेल…मात्र की ह्यांना काही टेस्ट लिहून देत आहेत…ह्यांना बरे वाटले की जाऊन टेस्ट करून घ्या…शिवाय ह्यांना अजिबात दगदग करायला लावू नका…काही दिवस फक्त आरामच करायला हवा…”
” हो डॉक्टर…” निशांत म्हणाला.
निशांत डॉक्टरांना बाहेर पर्यंत सोडायला गेला. तोवर सुमेधा थोडी शुद्धीत आली होती. सासूबाईंनी तिच्यासाठी डाळीची पातळ खिचडी केली होती. सासूबाईंनी तिला खिचडी भरवली. आणि तिला म्हणाल्या.
” सुमेधा…बाळा…तू टेरेसवर कशी काय पोहचली…आणि तुला अचानक ताप कसा काय आला…?”
सुमेधा यावर काहीच बोलली नाही. त्यावर सासुबाई म्हणाल्या.
” तुला बरे वाटत नसेल तर नको सांगू सध्या…आणि तू म्हणत असशील तर तुझ्या आईला बोलावून घेऊ का तुला भेटायला…त्यांना भेटून बरे वाटेल तुला…”
” नको आई…” सुमेधा एवढेच बोलू शकली. नंतर थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाली. ” आई काळजी करत बसेल उगीच… बरं वाटलं की सांगेल मी तिला…”
त्यावर तिच्या सासुबाई काहीच बोलू शकल्या नाहीत. त्यांनी तिला पेज खाऊ घातली आणि औषधे दिली. त्यानंतर तिला आराम करायला सांगून त्या तिथून जायला लागल्या. पण जाताना बेडच्या खाली सरकवलेला बिछाना त्यांचा दृष्टीस पडला. त्या तेव्हा काही बोलल्या नाहीत.
त्या बाहेर गेल्यावर निशांत पुन्हा रूम मध्ये आल्या. सुमेधाचा नुकताच डोळा लागला होता. तो पलंगावर तिच्या बाजूला जाऊन बसला. आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून ताप उतरलाय का ते पाहू लागला. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवताच तिला थोडी जाग आली. तिने त्याच्याकडे पाहूनही न पाहिल्या सारखे केले. आणि त्याच्याकडे पाठ फिरवून झोपी गेली.
आता मात्र त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. आपण निदान रात्री ह्या गोष्टीची तरी खातरजमा करायला हवी होती की ती रूम मध्ये आलीय. तिची इतकी वाईट मनस्थिती असताना तिला एकटे सोडून आपण झोपी गेलो ह्यामुळे त्याला अपराधीपणा वाटत होता.
तो बराच वेळ तिथेच बसला. तोवर सुलभा मावशी येऊन घरातील कामे करून निघून सुद्धा गेल्या. सुमेधाच्या सासुबाई सुद्धा मध्ये मध्ये तिच्या तब्येतीची चौकशी करायला येतच होत्या. थोड्या वेळात सुमेधाला थोडे बरे वाटले. तिने उठून पाहिले तेव्हा निशांत तिथेच बसून होता. ती पलंगावरून उठायला लागली. तेव्हा निशांत तिला म्हणाला.
” तुला काही हवे असेल तर मला सांग…तू कशाला उठतेस…?”
तिने त्याच्याकडे पाहिले पण त्याला काहीच उत्तर दिले नाही.
ती बाथरूम मध्ये जाऊन आली. आणि रूम च्या बाहेर जायला लागली. तिला पाहून निशांत पुन्हा म्हणाला.
” तुला बरं वाटतंय का आता…?”
तिने अजूनही त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. ती तिथून चालत किचन मध्ये गेली. तिथे तिच्या सासुबाई होत्याच. सुमेधा ला पाहून त्या म्हणाल्या.
” अगं तू इथे काय करत आहेस…तुझ्या खोलीत जा…आराम कर…”
” नाही आई…एका जागी बसून मला कंटाळा आलाय…मला थोडा वेळ इथे बसू द्या…” सुमेधा म्हणाली.
” बरं ठीक आहे…ही खुर्ची घे आणि थोडा वेळ बस इथे…मला सांग तुला काही खायला हवे आहे का…नाहीतर थोडा चहा करू का..?” सासुबाई म्हणाल्या.
” हो आई…थोडा चहा करू द्या मला… थोडं डोकं दुखत आहे…” सुमेधा म्हणाली.
तसा सासूबाईंनी चहा केला. आणि तीन कपांमध्ये चहा गाळला. एक त्यांनी सुमेधा ला दिला. एक त्यांच्यासाठी ठेवला. सुमेधा ने त्यांना विचारले.
” आई…हा एक कप चहा कुणासाठी आहे…?”
” अगं निशांत साठी ठेवलाय…”
” पण ते असे मध्येच चहा नाहीत ना घेत…म्हणजे त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात ना चहाच्या…”
” अगं आज सकाळपासून काहीच नाही खाल्लंय त्याने…चहा सुद्धा नाही घेतला…”
” पण का..?”
” का म्हणजे काय…? अगं सकाळी तुझी तब्येत खूप जास्त खराब होती…तुला पाहून त्याच्या गळ्यातून काही उतरले असते का…?” सासुबाई म्हणाल्या.
त्यावर सुमेधा गप्प बसली. निशांत सुद्धा बाहेर हॉल मध्ये येऊन बसला. सासूबाईंनी त्याला चहा नेऊन दिला. त्याने सुद्धा काहीही न बोलता मुकाट्याने आईच्या हातून चहा घेतला.
त्यानंतर थोडा वेळ तिथे थांबून सुमेधा पुन्हा तिच्या खोलीत आराम करायला निघून गेली. निशांत सुद्धा तिच्या मागेच गेला.
निशांत आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण ती मात्र त्याला टाळत होती. अगदी मनापासून टाळत होती.
त्यानंतर अनेक दिवस हेच सुरू होते. निशांत सुमेधा शी बोलण्याचा प्रयत्न करायचा. सुमेधा मात्र काहीच प्रतिसाद देत नव्हती. तिची तब्येत आताशा ठीक झाली होती. सगळे रिपोर्ट्स सुद्धा नॉर्मल होते. तिने हळूहळू घरातील कामांना सुरुवात सुद्धा केली होती. सासूबाईंसोबत ती एकदम नॉर्मल वागायची. पण निशांत जवळ आला की त्याला मात्र टाळायची.
नवरा बायको मधील हा तणाव आता सासूबाईंच्या चांगलाच लक्षात येत होता. मध्येच मनीषा आणि सुधीर घरी येऊन भेटून जायचे. पण त्यांना मात्र सुमेधा ने काहीच कळू दिले नव्हते. सुमेधाच्या सासुबाई मात्र योग्य वेळेची वाट पाहत होत्या. निशांतशी बोलण्याची.
एकदा सासूबाईंच्या खोलीतील कपाट आवरताना सुमेधाला बराच उशीर झाला. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला ते कळलेच नव्हते. इतक्यात तिच्या सासुबाई तिला म्हणाल्या.
” अगं सुमेधा…बराच वेळ झालाय बघ आता…तू तुझ्या खोलीत जाऊन झोप… थोडेच काम बाकी आहे.. मी करून घेईल ते…”
” नाही आई…मी करते आहे ना…थोडेच बाकी आहे आता…” सुमेधा म्हणाली.
” अगं मग निशांत झोपल्यावर गेलीस तर त्याची झोपमोड होईल दरवाज्याच्या आवाजाने…” सासुबाई म्हणाल्या.
” आई…तुम्हाला जर चालत असेल तर मी आजच्या दिवस येथेच झोपू का…?”
” अगं मला का नाही चालणार…झोप ना…” सासुबाई म्हणाल्या. पण मनातून मात्र त्यांना काळजी वाटत होती.
त्यानंतर मात्र असे नेहमीच घडू लागले. सुमेधा बराच वेळ पर्यंत सासूबाईंच्या खोलीत राहायची आणि मग तिथेच झोपायची. निशांतला आता तिची खूप आठवण यायची. ती नसताना खोली त्याला खायला उठायची. दुरावा जेवढा वाढत होता त्यापेक्षा ही जात जास्त पटीने त्याची तिच्या प्रती असणारी ओढ वाढत होती. पण तो सुमेधाला काही बोलू शकत नव्हतं कारण या सगळ्याची सुरुवात त्यानेच तर केली होती. म्हणून मग त्याची चिडचिड सुद्धा वाढत होती.
एके दिवशी निशांत कपाटात काहीतरी शोधत होता. त्याने सुमेधाला विचारले की माझं निळ्या रंगाचं शर्ट कुठे आहे ते. नेहमी प्रमाणेच सुमेधा त्याच्याशी काहीच न बोलता रूमच्या बाहेर पडली. नाही. मग तो त्याच्या आईकडे गेला. आईला म्हणाला.
” आई…माझं निळ्या रंगाचं शर्ट दिसलं का ग…”
” कोणतं ? माझ्या काही लक्षात येत नाहीये…” आई म्हणाली.
” अगं तेच जे मागच्या वर्षी दिवाळीला तू माझ्यासाठी आणले होते ते…”
” अच्छा.. ते होय.. पण ते कशाला हवंय तुला…”
” कशाला म्हणजे काय आई… घालायला हवाय मला…”
” अरे पण तुला तर ते शर्ट अजिबात आवडले नव्हते ना…तू आजवर एकदाही घातलं नाही ते शर्ट…”
” आवडलं नव्हतं…पण म्हटलं नंतर कधीतरी घालता येईल…आता अचानक पणे घालायची इच्छा होत आहे…”
” अरे… मी तर ते जुन्या कपड्यांसोबत सुलभा मावशीला दिलंय ते…मला वाटलं तुला आवडलं नाही म्हणून…” आई म्हणाली.
” काय ग आई…मला विचारायचं होतस ना…”
” अरे…तू सांगितल्याशिवाय मला कसे कळले असते की तुला ते हवंय…” आई म्हणाली.
त्यावर निशांत काहीच बोलला नाही. तेव्हा आई त्याला म्हणाली.
” निशांत…आपल्या आयुष्यात ही असच असतं बघ…आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात…पण आज नाही उद्या करू…नंतर बघू असे म्हणून आपण त्या गोष्टी टाळत राहतो बघ… आयुष्यात अनेक गोष्टींना आपण गृहीत धरतो…अमुक वस्तू वा अमुक व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की आपल्याला तिची कदर नसते…पण ती नेहमीसाठी आपल्या जवळ राहील असे नसते…म्हणून आपल्याला जे काही करायचे आहे ते वेळेवर करणे गरजेचे असते…आपल्या जवळच्या वस्तूंना, व्यक्तींना जीवापाड जपावं लागतं…आपली आवड, आपलं प्रेम जपण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात…”
एवढे बोलून आई तिथून निघून गेली. आई नक्की त्या शर्ट बद्दल न बोलता आपल्या आणि सुमेधाच्या नात्याबद्दल बोलत आहेत हे त्याला कळले होते. आई असे का म्हणत आहे ह्याचा त्याला अंदाज लागत नव्हता. सुमेधाने आईला काही सांगितले तर नसेल अशी शंका त्याच्या मनात दाटून आली. त्यासरशी तो जरा जास्तच अस्वस्थ झाला.
त्या दिवशी ऑफिस मध्ये तो नुसता विचारात गुंतलेला होता. इतके दिवस सुमेधा त्याला टाळत होती. आता तेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत होती. आपण जेव्हा तिला टाळायचो तेव्हा तिला काय त्रास होत असेल हे त्याला आता कळून चुकले होते.
आईचे म्हणणे सुद्धा त्याला पटले होते. आपण प्रतिशोध घ्यायच्या विचारात आपल्या प्रेमाला स्वतःच आपल्यापासून दूर करतोय हे त्याला कळत होते. पण त्याला आता स्वतःची चूक दुरुस्त करायची होती. आता अधिक वेळ घालवणे योग्य नाही हे त्याला कळले होते. तो त्या दिवशी लवकरच घरी आला.
घरी आल्यावर त्याने आईला सर्वप्रथम सुमेधा कुठे आहे ते विचारले. त्यावर आई त्याला म्हणाली.
” अरे सुमेधा बाहेर गेली आहे…घरी काही समान आणायचे होते…म्हणून मीच म्हटलं तिला जरा जाऊन ये…”
” परत कधी येईल…?” त्याने विचारले.
” एव्हाना यायला पाहिजे होती…पण अजून आलेली नाही…येईलच इतक्यात…” आई म्हणाली.
त्यावर निशांत तिथेच हॉल मध्ये बसून तिची वाट पाहू लागला. मध्येच जाऊन ती आली का ते पाहायला बाहेर जायचा. पण आज बराच उशीर झाला तरीही ती मात्र घरी परतली नव्हती.
क्रमशः
निशांत सुमेधाशी नेमके काय बोलेल…? सुमेधा च्या त्याला टाळण्यामागचे कारण काय असेल…? दोघांतील दुरावा कमी होईल का…?” जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरु नका.
पुढील भाग प्रकाशित झाल्याबरोबर त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ब्लॉगला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा.
©®आरती निलेश खरबडकार.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.
Hope so end of story will be happy