त्या दिवशी मनिषाला रात्रभर झोप आली नाही.रात्रभर ती कुस बदलत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला तिच्या नवऱ्याचा रोष सहन करावा लागत होता. तिने सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला आणि मनातल्या मनात एक निर्धार केला.
आज ती उपाशीच असल्याने तिला झोप येत नव्हती. तिने विचार केला की जे काही घडून गेलय किंवा घडत आहे ह्यात आपली काहीच चूक नाही. मग आपण कशाला उपाशी राहून स्वतःला त्रास द्यायचा. ती तशीच उठली आणि स्वयंपाकघरात गेली. आणि फ्रीजमधून जेवण काढून गरम करून पोटभरून जेवली.
आता तिला स्वतःची पुरेपूर काळजी घ्यायची होती. कारण उद्या आणखी एका लढाईची सुरुवात करायची होती. स्वतःला सिद्ध करून सासूबाईंना त्यांची चूक लक्षात आणून द्यायची होती. ते सुद्धा भांडण किंवा आरडाओरड न करता युक्तीने. कसलासा विचार करून ती स्वतःशीच हसली आणि झोपी गेली.
रोज सुधीरच्या आधी झोपेतून उठणारी मनीषा आज सुधीर ऑफिसला जायला तयार झाला तरीही झोपेतून उठली नव्हती. तो ऑफीसमध्ये जायला निघणार इतक्यात ती उठली आणि आरामात मोबाईल बघत लोळत बसली. सुधीरने तिच्याकडे बघितले पण आधीच तो तिच्यावर नाराज असल्याने तो तिला काहीच बोलला नाही.
तो बाहेर येऊन बघतो तर आज किचन मध्ये काहीच हालचाल नव्हती. एव्हाना रोज त्याचा डबा सुद्धा तयार व्हायचा. पण आज मात्र साधा नाश्ता सुद्धा तयार झालेला नव्हता. त्याला वाटले आज आईला बरे नसेल म्हणून स्वयंपाक केला नसेल आज ऑफिसमधील कॅन्टीन मध्येच जेवण करू असा विचार करून तो ऑफिसला जायला निघाला.
इतक्यात त्याची आई तिथे आली आणि त्याला म्हणाली.
” सुधीर…आज नाश्ता न करताच ऑफिसला जाणार आहेस का…?”
” आई…आज नाश्ता तयार झालेला नव्हता म्हणून म्हटलं आज ऑफिस कॅन्टीन मध्ये नाश्ता करेल म्हणून…” सुधीर म्हणाला.
तेव्हा त्याच्या आईला लक्षात आले की आज बराच उशीर झालाय तरीसुद्धा मनीषा उठलेली नाही. तेव्हा त्या सुधीरला म्हणाल्या.
” अरे आज मला झोपेतून उठायला उशीर झाला ना म्हणून नाश्ता बनवताच नाही आला आज…”
” ठीक आहे आई…मी करेल ऑफिसला जाऊन नाश्ता…” सुधीर म्हणाला.
” ठीक आहे…” आई म्हणाली. आणि सुधीर ऑफिसला निघून गेला.
पण आई मात्र विचारात पडली. कारण याआधी मात्र कधीच मनिषाला उठायला उशीर झालेला नव्हता. पण आता नाही तर थोड्या वेळाने येऊन कामे उरकून घेईल म्हणून वृंदाताई मनिषाला काहीच बोलल्या नाहीत.
पण बराच वेळ झाला तरीही मनीषा खोलीबाहेर आलीच नाही. सुमेधा सुद्धा खोलीबाहेर आली आणि म्हणाली.
” काय ग आई…आज इतका वेळ झाला तरीही वहिनी चहा घेऊन आली नाही…मला उठून बराच वेळ झाला तरीही चहा नाही झाला अजुन…”
” अग हो ना…मलाही तेच कळत नाही आहे की इतका वेळ होऊनही ती खोलीच्या बाहेर का आलेली नाही ते…” आई म्हणाली.
” म्हणजे…आज ती बाहेरचं आलेली नाही अजुन…मग माझ्या चहाचं काय होईल आज…” सुमेधा वैतागून म्हणाली.
” तू थांब… मी करते चहा…” वृंदा ताई म्हणाल्या.
” अगं त्यापेक्षा जाऊन तिला उठव ना…म्हणजे तुझी मेहनत वाचेल…” सुमेधा म्हणाली.
” थांब…आधी चहा करते…मग तिच्या खोलीत जाऊन बघते…” वृंदा ताई म्हणाल्या.
” तू बघ बाई काय करायचं ते…” असे म्हणत सुमेधा तिथेच हॉल मध्ये सोफ्यावर बसून टीव्ही पाहू लागली.
सासुबाई चहा बनवण्याकरिता किचन मध्ये गेल्या. त्यांनी चहा ठेवलाच होता की मनीषा तिथे आली. तिला पाहून सासुबाई एकदमच चमकल्या. कारण आज मनीषा चक्क गाऊन वर किचन मध्ये आली होती.
आजवर कधीच ती अंघोळ न करता वा तयारी न करता त्यांच्यासमोर आली नव्हती.आणि आज अशी अंघोळ न करता चक्क गाऊन वर त्यांच्यासमोर उभी होती. वृंदा ताई मनीषा ला काही बोलणार त्या आधीच मनीषा त्यांना म्हणाली.
” आई…चहा ठेवताय का…?”
” हो…” सासुबाई फक्त एवढेच बोलू शकल्या.
” मग माझ्यासाठी पण ठेवा एक कप…” मनीषा म्हणाली.
आणि सासूबाईंनी चमकून तिच्याकडे पाहिले. तिने सासुबाई कडे साफ दुर्लक्ष करून हॉल मध्ये जाऊन टीव्ही बघत बसली.
सासूबाईंनी तिघिंसाठी चहा गाळला आणि हॉलमध्ये घेऊन आली.मनीषा ने समोरचे टीव्ही चे रिमोट घेतले आणि चॅनल बदलत आरामात चहाचा कप उचलला. सुमेधा आणि सासुबाई मात्र काहीतरी विचित्र बघितल्या सारखे तिच्याकडे बघत होत्या.
पण मनीषा ने जाणीवपूर्वक दोघींकडे ही दुर्लक्ष केले. चहा घेतला. थोडावेळ टीव्ही पाहिली आणि पुन्हा रूम मध्ये निघून गेली. सासुबाई आणि नणंद बाईंची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती. तिला पाहण्याच्या नादात दोघींनाही चहा थंड झाला.
ती रूम मध्ये गेली आणि तिने रूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. दाराच्या आवाजाने वृंदा ताई आणि सुमेधा भानावर आल्या. त्या दोघींनी एकमेकींना हातवारे करत हे काय चाललंय हे एकमेकींना विचारले आणि बुचकळ्यात पडल्या. मनीषा नेमकी अशी का वागते हे त्यांना अजिबात कळत नव्हते.
पण अजून थोडावेळ काय चाललंय ते बघू आणि मगच तिला प्रश्न करू असे त्यांनी ठरवले होते. पण तेवढा संयम त्या दोघीही दाखवू शकला नाही. कारण बराच वेळ झाला होता आणि दोघींना ही सडकून भूक लागली होती. एव्हाना मनिषाचा नाश्ता आणि स्वयंपाक दोन्हीही तयार व्हायचे. पण आज मात्र काहीच तयार झाले नव्हते.
मनीषा आल्यापासून सासूबाईंची स्वयंपाकाची सवय सुटली होती. आणि सुमेधा तर त्यांचं लाडकं शेंडेफळ. तिला तर त्यांनी कामांची सवयच लावली नव्हती. म्हणून दोघीही तशाच ताटकळत बसल्या होत्या. शिवाय भूक सुद्धा एवढी लागली होती की आता काही करायची इच्छा होत नव्हती.
इतक्यात सासुबाई मनिषाच्या खोलीत गेली. मनीषा अजूनही फोन चाळत बसली होती. सासुबाई तिला म्हणाल्या.
” मनीषा…काय हे…अजुन तयार सुद्धा झालेली नाहीस तू…आणि नाश्ता स्वयंपाक सुद्धा केला नाहीस आज…”
मनीषा ने आज सासूबाईंचे ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. तिने स्वताच्या फोन मधून तिच्या एका मैत्रिणीला फोन लावला आणि सासूबाईंना म्हणाली.
” आई…जरा महत्त्वाचा फोन आहे…मी तुमच्याशी नंतर बोलते…”
आणि फोनवर बोलत बाल्कनी मध्ये निघून गेली. सासुबाई मात्र एकदमच गप्प बसल्या. आपण हिच्याशी बोलतोय आणि हिने काहीच उत्तर न देता फोन वर बोलण्याला प्राधान्य दिले ही गोष्ट सासूबाईंच्या पचनी पडणार नव्हती.
पण सासूबाईंनी काहीही बोलले तरीही आज मनीषा दुर्लक्षच करत होती. सासूबाईंना तिचे हे वागणे कळतच नव्हते.
शेवटी सासुबाई तिच्या खोलीतून बाहेर निघाल्या. भूक तर खूप लागली होती. मग सुमेधाने ऑनलाईन ॲप वरून दोघींसाठी नाश्ता मागवला. नाश्त्याला घरच्यासारखी चव नव्हती पण नाईलाज होता. आज मनीषा घरातील काहीच काम करणार नाही ह्याची एकंदरीत कल्पना सासूबाईंना आणि सुमेधाला आली होती. पण ती अशी का वागते आहे ह्याचे कोडे त्यांना उलगडत नव्हते.
थोड्याच वेळात दाराची बेल वाजली आणि मनीषा तिच्या खोलीतून बाहेर आली. आज मनीषा ने सुद्धा ऑनलाईन नाश्ता मागवला होता. ती आली आणि तिचे पार्सल घेऊन तिच्या रूम मध्ये निघून गेली. रूम मधून तिच्या मोठमोठ्याने हसत फोनवर बोलण्याचा आवाज हॉलमध्ये या दोघींना स्पष्ट येत होता. आता मात्र वृंदाताईंच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. नाश्ता झाल्यावर थोड्या वेळाने जेवण सुद्धा बनवायचे होते.
सासूबाईंनी सुमेधाला हाताशी घेऊन कसाबसा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार होईस्तोवर दुपारचे दोन वाजले होते. एव्हाना दोघींना कडाडून भूक लागली होती. दोघींनाही जेवण केले. त्या खूप थकल्याने त्यांना लवकरच झोप येऊ लागली. किचन मध्ये आवराआवर करायचे अजुन बाकीच होते.
मनिषाला तर सगळ्यांच्या नंतर चहा आणि नाश्ता करायची रोजची सवय असल्याने तिला जास्त कठीण गेले नाही. तिने आज किचन मध्ये पसारा पाहून देखील आवराआवर केली नाही. आज तिने सगळा दिवस फक्त आळसात घालवला. अगदी तशाचप्रकारे जशा सासुबाई इतरांना तिच्याबद्दल सांगायच्या.
इकडे सासूबाईंना संध्याकाळी साडेपाच वाजता झोपेतून जाग आली. त्या बाहेर येऊन पाहतात तर अजूनही घरातील काम जसेच्या तसेच पडलेले होते. त्यांना खूप राग आला. त्या मनीषाच्या खोलीकडे गेल्या पण तिच्या खोलीचे दार आतमधून बंद होते.
त्यांनी दातओठ खाल्ले. पण नाईलाजास्तव घरातील झाडू घेतला आणि घर झाडायला सुरुवात केली. बऱ्याच दिवसांपासून घरातील कामांची सवय नसल्याने त्यांनी कसातरी घरात झाडू मारला. तोवर त्यांना खूप जास्त थकायला झालं. इतक्यात सुमेधा तिथे आली आणि आपल्या आईला इतके जास्त थकलेले पाहून तिला खूप राग आला. ती रागातच मनिषाच्या खोलीकडे गेली आणि जोरात तिचा दरवाजा वाजवला.
क्रमशः
मनीषा सुमेधाला नक्की काय उत्तर देईल…? तिच्या वागण्या मागचे कारण सासूबाईंना कळेल का…? मनिषाला असे वागून नेमके काय साध्य करायचे आहे…? या प्रश्नांचे उत्तर मिळेल पुढील भागात…पुढील भाग उद्या प्रकाशित होईल…
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
Chan katha … next part please …