” बाबा…माझ्या मनात आहे की आपण आपल्या ह्या वाड्याचे रिनोवेशन करावे…”
अनघाचे बोलणे ऐकून विनायक रावांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांना खूप आनंद झाला. वाड्याची डागडुजी करावी हा विचार अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात रेंगाळत होता. पण नवी पिढी ह्यात काही लक्ष घालत नसल्याने त्यांनी सुद्धा हा विचार मनातल्या मनातच ठेवला होता.
” हो बाबा…अनघा या विषयी मागे माझ्याशी बोलली होती…आणि माझ्या सुद्धा मनात होतंच…आपण वाड्याचे रिनोवेशन केले तर चालेल ना तुम्हाला…” आदित्य म्हणाला.
” का नाही चालणार…हा वाडा आता जुना झालाय…ह्याला डागडुजीची गरज आहेच…तुम्हा दोघांना आवडेल तसा वाडा तयार करा…माझी काहीच हरकत नाही…” विनायक राव आनंदाने म्हणाले. त्यांना इतकी आनंदात पाहून जानकीबाई ना सुद्धा बरे वाटले.
आजी बघता बघता अनघा आणि आदित्य ने वाड्याच्या रिनोवेशन साठी लागणारा खर्च आणि वेळ ह्याचा आराखडा तयार करून घेतला. खर्च थोडा जास्त येत होता पण दोघेही आता मागे हटणार नव्हते. विनायकरावांनी सुद्धा त्यांच्याकडील काही पैसे दोघांना ह्या कामासाठी देऊ केले होते.
इकडे अजीतच्या कानावर जेव्हा आदित्यने रिनोवेशनची गोष्ट घातली तेव्हा अजितने मात्र ह्यातून आपले हात काढून घेतले. त्याच्या मते गावातील जुन्या वाड्यावर पैसे खर्च करणे मूर्खपणाचे होते. तो या दोघांच्या कल्पनेवर हसला होता. पण या दोघांनी ठरवले होते आणि त्यांनी त्यावर काम करायला सुद्धा सुरुवात केली.
बघता बघता वाड्याच्या रिनोवेशनचे काम सुरू झाले. आणि वाड्याचे रूपच पालटले. वाडा पुन्हा नव्या रंगात न्हाऊन निघाला. घरातील जुन्या फर्निचरला सुद्धा नवा रंग दिला जात होता आणि जोडीला काही नवीन फर्निचर सुद्धा केले होते. वाड्याच्या समोर छान झोपाळा लावला होता.
बाजूला छोटीशी बाग तयार केली होती. किचन सुद्धा नवीन तयार केले होते. वाड्यात सुंदर पडदे आणि नवीन लाइट्स लावले होते. वाड्याची सुंदरता पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरत होती. वाड्यात जणू एक नवं चैतन्य बहरले होते. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना आपल्या मुलाने आणि सुनेने इतक्या चांगल्याप्रकारे जपले हे पाहून विनायकरावांना खूप आनंद होत होता.
जेव्हा अजित आणि अदितीने वाड्याचे नवीन रूप पाहिले तेव्हा त्यांना आदित्य आणि अनघाचा हेवा वाटला. त्याला वाटलं इतका सुंदर आणि भव्य वाडा एकट्या आदित्यला मिळेल. अदितीने अजितला आपण पुन्हा एकदा वाड्यात राहायला येऊ असे सुचवले. त्यानुसार एके दिवशी तो सुद्धा त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला.
” बाबा…मला आणि अदितीला शहरात एकटं वाटतं…म्हणून आम्ही विचार करतोय की अधून मधून गावी राहायला यावं म्हणून…” अजित म्हणाला.
” ये ना…त्यामध्ये विचारायचं काय आहे…हे घर तुमचं सुद्धा आहे…” विनायकराव म्हणाले.
” तसं नाही बाबा…पण वेळीच ज्याचा हिस्सा त्याला मिळालेला बरा…” अजित म्हणाला.
” म्हणजे…मला कळलं नाही…” विनायकरावांनी विचारले.
” म्हणजे बाबा…माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आताच वाड्याचे दोन भाग करावेत आणि मला व आदित्यला आपापला भाग वाटून द्यावा…” अजित म्हणाला.
” तुला बोलताना काहीच वाटत नाही का…वाड्याचे दोन भाग करायचे म्हणजे काय…या वाड्याचे दोन भाग कधीच होणार नाही…शहरात वेगळं राहून मन भरलं नाही का तुम्हा दोघांचं की आता ह्या घरात सुद्धा वेगळ्या चुकी मांडायच्या आहेत तुम्हाला…राहायचं असेल तर एकत्र राहा नाहीतर तुम्ही राहायला आले नाहीत तरी चालेल…” विनायकराव रागाने म्हणाले.
” पण बाबा…पुढे जर वाड्याच्या वाटणीत काही घोळ झाला तर उगाच वाद होतील…म्हणून म्हटलं मी…” अजित म्हणाला.
” ह्या वाड्याची वाटणी होणारच नाही…तुला माहिती नसेल सांगतो की हा वाडा मी आदित्य च्या नावाने करणार आहे…तुझा आधीच निर्णय झाला होता ना शहरात राहायचं म्हणून…वाड्याची किंमत तर तुझ्या लेखी शून्य होती…आणि आता जेव्हा आदित्य आणि सूनबाईने आपली आजवरची सर्व मिळकत ह्या वाड्याच्या डागडुजी साठी खर्च केली तेव्हा तुला ह्या वाड्यात अर्धा वाटा हवाय…” विनायकराव म्हणाले.
” पण तुमचा मुलगा म्हणून माझा ह्या घरावर अधिकार नाही का..?” अजित म्हणाला.
” माझा मुलगा म्हणून तुला या वाड्यात अधिकार आहेत…तू कधीही ये आणि राहा…पण तुला शहरात राहून जर इथे अर्धा वाटत पाहिजे असेल तर मात्र तुला तो मिळणार नाही…आणि तुझ्या बाबतीत मी काही कमी केलं नाही…तुला चांगलं शिक्षण दिलं…थाटामाटात तुझं लग्न लावून दिलं…शहरात घर घ्यायला पैसे सुद्धा दिले..
पण तू मात्र कधी मोकळ्या मनाने आम्हाला काही दिवस राहायला चला असे साधे विचारले देखील नाही…तुझ्या घरात तुझ्या आईवडिलांना साधा मान सुद्धा देत नाहीस तू आणि आईवडिलांच्या घरात मात्र तुला अधिकार हवेत…हा कुठला न्याय…हा वाडा त्याचाच राहील ज्याला ह्याची खरी किंमत माहिती आहे…
ज्याला आपल्या घरात होऊन गेलेल्या पुरुषांच्या कर्तबगारीची जाणीव असेल…जो ह्या वाड्याचा वारसा जपेन…ह्याचे संवर्धन करेन…तुला जेव्हा ह्या सर्वांची जाणीव होईल तेव्हा तुझ्या मनात वाटणीचा विचार देखील येणार नाही…पण निदान आता ना तुला ह्याची जाणीव आहे ना गरज…” विनायकराव म्हणाले.
अजित मात्र बाबांच्या या कान उघडणी ने खजील झाला होता. घर सोडून शहरात राहायला जाताना तो वाड्याबद्दल जे बोलला होता ते किती चुकीचं होतं हे देखील त्याला कळत होतं. बाबांनी आजवर आपल्यासाठी जे केलं ते त्यांचं कर्तव्यच होतं असा विचार करून त्यांना नेहमी गृहितच धरले होते. बाबांना शहरातल्या घरी राहायला बोलावन्या मागे सुद्धा त्याचा स्वार्थी हेतू होता. त्याला वाटायचं आई बाबांना शहरातलं वातावरण आवडलं तर ते कायमचे इथेच राहतील असे त्याला वाटले होते.
आणि वेगळं राहण्याचा त्यांचाग मुख्य हेतू म्हणजे त्यांची प्रायव्हसी. त्यांना आता स्वतःवर जास्त बंधने नको होती म्हणून त्यांनी आईवडिलांना तिथे बोलावले नाही… वाड्याचे रिनोवेशन होत असताना सुद्धा आदित्यला पैशांची अडचण आहे हे माहिती असूनही त्याला एका पैशांचीही पडत केली नव्हती. एकामागून एक त्याला त्याच्या चुका लक्षात येत होत्या. आणि त्या चुकांच त्याला मनापासून वाईट वाटत होतं.
त्या दिवशी नंतर कधीही अजित ने वाड्याच्या वाटणी बद्दल विषय काढला नाही. त्यानंतर दर सुट्टीला ते वाड्यात राहायला यायचे. आदित्य आणि अनघाने कधीच त्यांना घरात परकेपणा वाटू दिला नाही.
मुलं वडिलांच्या प्रत्येक गोष्टीत आपला अधिकार मागतात. पण मुले स्वतः कमवायला लागल्यावर त्यांच्या आईवडिलांसाठी काय करतात हा विचार सुद्धा करणे गरजेचे आहे.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.
Mast. Je kanhiblihioe ahe tyala tathya ahe. Hulli asech ghaste tyasathi gharatil wadildharyani kankhar asne jaruri ahe. Wel pransgavadhan mulanchi kan ughadani karne avshak ahe. Dukhat tyach umajat. Chan mudhesudh likhan dhanyawad