” तू माझ्या प्रेमावर संशय घेतोस…अरे तुझ्यासाठी मी माझ्या दोन लहान मुलांना टाकून आलेय…” कावेरी म्हणाली.
” तेच तर…तू तुझ्या दोन लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाहीस… मग मी असा कोण लागून गेलोय ग तुझा…बंद कर तुझी नाटकं…मी तुला कायमचा सोडून चाललोय…तुला आता काय करायचं ते तू ठरव…” अजय म्हणाला.
आणि अजय खरोखर निघून गेला. कावेरी मात्र आज पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. तिला आज स्वतःचाच खूप राग येत होता. कैलास सारख्या देव माणसाला तिने लाथाडले होते. सोन्यासारखा संसार मातीमोल केला होता. क्षणिक मोहापायी स्वतःच्या दोन लहान मुलांना पोरके केले होते. अजयचा शब्द अन् शब्द तिला पटला होता. या सर्वात तिची चूक आहे हे तिने मानून घेतले होते. आणि ह्या चुकीचे प्रायश्चित्त तिला करायचे होते.
कैलास आणि मुलांकडे परत जाणे तर तिच्यासाठी अशक्य होते म्हणून तिने एकदा तिच्या माहेरचा आधार घ्यायचा ठरवले. आणि तिच्या माहेरी गेली. तिच्या माहेरी आल्यावर कळले की तिचे बाबा महिनाभरापूर्वी मरण पावले होते. तिच्या दादा अन् वहिनीने तिला घरात घ्यायला स्पष्ट नकार दिला. पण तिच्या आईच्या काळजाला मात्र पोरीला एकटं सोडण पटलं नाही म्हणून तिच्या आईने मुलीसोबत राहण्यासाठी स्वतःच घर सोडलं. गावी राहणे त्यांना शक्य नसल्याने कावेरी आणि तिची आई दोघीजणी पुन्हा शहरात आल्या.
इथे कावेरी लोकांच्या घरी धूनी भांडी करायला लागली आणि आईची काळजी घ्यायला लागली. दोघी मायलेकी एकमेकांच्या आधाराने राहू लागल्या. आधी एका संपन्न घरातील सून आलेली कावेरी आता लोकांनी दिलेल्या शिळ्या अन्नावर समाधान मानू लागली होती. तिला मुलांची खूप आठवण यायची. पण आपली मुलं आपल्याला कधीच माफ करणार नाही हे तिला माहीत असल्याने तिने कधी मुलांना भेटायला जायचा विचार केला नाही.
आताशा तिच्या आईची तब्येत बरी नसायची. ती कसतरी लोकांची कामे करून आईचा इलाज करायची. दोघी मायलेकी इकडे हलाखीचे जीवन जगत होत्या तर कैलास मात्र संकेत आणि साक्षी ह्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देत होता. आणि त्याच्या मेहनतीमुळे आज संकेत राज्यातून दुसरा आला होता. कावेरी चा उर आज अभिमानाने भरून आला होता पण तिचे दुर्दैव होते की ती तिच्या मुलाला समोरून बघू ही शकत नव्हती. ती अजूनही त्याचं विचारात होती. इतक्यात सिमाताईंनी दिलेल्या आवाजाने कावेरी भानावर आली.
” काय ग कावेरी…बरं वाटतं नाहीये का तुला…बरं वाटतं नसेल तर सोड ते काम आणि घरी जाऊन आराम कर…” सीमाताई म्हणाल्या.
” नाही ताईसाहेब…मी बरी आहे…मी एवढं काम उरकून घरीच जायला निघते बघा…” कावेरी डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली.
कावेरीने काम आटोपले आणि ती घरी आली. आईला जेवण वाढून दिलं आणि नंतर औषधे दिली. मन मात्र अजूनही जुन्या विचारात गढून गेलेले होते.
काही दिवसानंतर कावेरी कामासाठी बाहेर निघाली असता अचानक तिला मागून कोणीतरी ‘ कावेरी ‘ म्हणून हाक मारली. ओळखीचा आवाज असल्याने तिने चमकून मागे बघितले.
आणि समोर कैलासला बघून ती जागेवरच स्तब्ध झाली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
” तुम्ही…अन् इथं…?” तिने कसेबसे अवसान गोळा करत विचारले.
” हो…तुलाच शोधत आलो आहे इकडे…” कैलास म्हणाला.
” पण का..?” कावेरी च्या आवाजात थोडी भीती होती.
” आपल्या मुलांना तुला भेटायचंय…” कैलास म्हणाला.
” पण ते खूप राग करत असतील ना माझा…” कावेरी चाचरत म्हणाली.
” नाही…आधी करायचे पण आता ते दोघेही एवढे मोठे झालेत की रागावर नियंत्रण करायला शिकलेत…परिस्थितीने त्यांना वयाच्या आधीच मोठं केलं कावेरी…” कैलास खिन्न पणे म्हणाला.
” मला भीती वाटत आहे त्यांच्या समोर यायची…” कावेरी म्हणाली.
” मग मीच त्यांना बोलवतो इथे…संकेत…साक्षी… या समोर…” कैलास म्हणाला.
आणि संकेत आणि साक्षी जे दाराबाहेर उभे होते ते अचानकपणे आत आले. त्यांना पाहून कावेरी चा उर भरून आला. पण आपण त्यांना दिलेल्या दुःखा च्या सतत होणाऱ्या जाणिवेमुळे ती त्यांच्यापासून नजर चोरत उभी होती. आता ही मुले आपल्याला आपल्या चुकीबद्दल जाब विचारणार असे कावेरी ला वाटले. पण ते दोघेही समोर आले आणि त्यांनी कावेरी ला मिठी मारली. त्या मिठीत ते तिघेही मायलेक कितीतरी वेळ रडत होते.
” मला माफ करा मुलांनो…मी चांगली आई नाही होऊ शकले…मी आईच्या नावाला कलंक लावला…” कावेरी रडत म्हणाली.
” आई…आपण आता जे होऊन गेलं आहे ते विसरु शकत नाही का…आपण पुन्हा एकत्र नाही का राहू शकत…?” संकेत म्हणाला.
त्याचे बोलणे ऐकून कावेरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. हे असं काही होऊ शकते ह्याची तिने कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. तिला तर नेहमीच वाटायचे की तिला पाहिल्यावर मुलं तिला एक क्षणही त्यांच्या नजरेसमोर उभं करू शकणार नाहीत. पण हे तर तिला स्वीकारायला सुद्धा तयार होते.
” हो आई…आपण राहू यात ना पुन्हा एकत्र…” साक्षी सुद्धा म्हणाली.
” हे शक्य नाही बाळांनो… मी या लायकीची नाही आहे…” कावेरी म्हणाली.
” असे नको म्हनू स कावेरी…तू चुकली होती हे मला मान्य आहे…पण इतकी वर्ष तू तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त सुद्धा केलंस…इतकी वर्ष लोकांकडे मोलकरीण म्हणून काम केलं स…पुरे झाली आता स्वतःला शिक्षा करून घेणं…आता चल…आपण पुन्हा एक कुटुंब म्हणून एकत्र राहूया…” कैलास म्हणाला.
” पण तुम्ही मला माझ्या चुकीबद्दल माफ करू शकणार आहात का…?” कावेरीने विचारले.
” हो…मी तुला आधीच माफ केलं होतं…जेव्हा अजय तुला सोडून गावी परत आला होता तेव्हा तुझ्यासोबत वाईट झाल्याचा आनंद झाला होता मला…पण एका क्षणाला तुझी काळजीही वाटली होती की आता तुझं कसं होईल…
त्यानंतर जसजसा काळ निघून जात होता तसतसा तुझ्याबद्दल माझ्या मनात असलेला राग सुद्धा कमी होत होता…तुझ्या घरच्यांनी तुझं माझ्याशी जबरदस्तीने लग्न लावून दिलं आहे ह्याची मला आधी कल्पना नव्हती….तुला मी आवडलोच नव्हतो म्हणून तुझं वागणं तुझ्या दृष्टीने योग्य होतं पण तू मुलांचा सुद्धा विचार नाही केला ह्याचा राग जास्त होता मनात…
तुझं जीवन खूप हलाखीत सुरू आहे हे कळल्यावर तर राग निघून गेला माझा…कारण एकेकाळी मी खूप प्रेम करायचो तुझ्यावर… असं वाटलं होतं की तुला परत एकदा घेऊन यावं घरी…पण तोपर्यंत मुलांच्या मनात तुझ्याबद्दल फक्त अन् फक्त तिरस्कार होता…
जसजशी मुलं मोठी होत गेली तसतशी मी त्यांना तुझ्या वागण्यामागच कारण सांगत गेलो…आणि तू आता किती एकाकी जगत आहेस हे सुद्धा त्यांना सांगितलं…आणि आपली मुलं इतकी समजदार आहेत की त्यांनी मोठ्या मनाने तुला माफ सुद्धा केलं…” कैलास म्हणाला.
” आपली मुलं समजदार आहेत पण ती फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या संस्करांपुढे…तुम्ही अस्सल सोनं होते आणि मी मात्र तुमच्या बाह्य स्वरूपाला च पाहत आले…आणि स्वतःच्या सोन्यासारख्या आयुष्याची माती केली…माझ्या एका अविचाराने मी सगळं काही गमावून बसले…मी खरंच या लायकीची नाही की तुम्ही मला माफ करावे…आता तर देवाला फक्त एकच मागणं आहे की त्याने लवकरच मला ह्या जन्मातून मुक्त करावे आणि माझ्या पापाचं प्रायश्चित्त करायला मिळावं…” कावेरी म्हणाली.
” असे नको म्हणू स कावेरी…आपल्या मुलांना त्यांच्या आईची गरज आहे ग…इतकी वर्ष त्यांना आईचं प्रेम नाही मिळालं पण आता त्यांना स्वतःच्या प्रेमापासून दूर नकोस ठेवू…आम्ही तुला माफ केलं य…आता तू पण स्वतः ला माफ कर…” कैलास म्हणाला.
” पण मी गावातल्या लोकांचा सामना कसा करणार…आणि तो अजय सुद्धा असणार तिथे…मी कशी येऊ तिथे…” कावेरी म्हणाली.
” गावातल्या लोकांचा विचार करू नकोस…ते तुला कधीच स्वीकारणार नाहीत ह्याची जाणीव आहे मला…म्हणूनच आपण आता इथेच राहायचं…की इथे एक घर बघून ठेवलं आहे…तू, मी, आपली मुलं अन् तुझी आई… मुलांचं पुढील शिक्षण सुद्धा आपण इथेच करू आणि आपण सर्व आनंदाने मिळून एकत्र राहूया…गावातील शेती पाहायला मी कधी गावाकडे तर कधी इथे राहत जाईल…” कैलास म्हणाला.
कैलास आपल्याबद्दल अजूनही इतका विचार करतो हे पाहून कावेरी ला गलबलून आले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती कैलास च्या पायात पडून रडू लागली. तिच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. आणि तिच्या अश्रुंच्या बरोबरीने तिच्या आईच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू वाहत होते. एक विस्कळीत झालेलं कुटुंब आज पुन्हा एकत्र आलं होतं. कावेरीचे प्रायश्चित्त आज खऱ्या अर्थाने पुर्ण झालं होतं.
ही कथा काल्पनिक आहे. सदर कथेतील घटना किंवा पात्र यांचे कुठेही साम्य आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा. कारण खऱ्या आयुष्यात असे काही घडणे म्हणजे अशक्यच. अशी चूक करणाऱ्या स्त्रीला तिचे कुटुंब कधीच माफ करत नाही. पण हीच चूक जर पुरुषाच्या हातून घडली तर त्याला मात्र त्याला दुसरी संधी शक्यतो मिळतेच. त्यामुळे आयुष्यात चुका करताना शंभर वेळा विचार केलेला बरा. नाहीतर क्षणिक मोहापायी अवघा संसार आणि अनेक आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नाही.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
खुपच छान आणि हृदयस्पर्शी