” मी सुद्धा इथे थांबायला नाही आलोय…पण निशाची ईच्छा होती की आमच्या लग्नाला तुमचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आलो आहे…तुमचा राग मला कळतोय…पण तुम्ही एकदा शांतपणे आमच्या निर्णयाचा विचार करा…मग तुम्हालाही कळेल आम्ही हे सगळे का केले ते…” साकेत म्हणाला.
” मला काहीच ऐकून घ्यायचे नाही…तुम्ही जा इथून…” वसंतराव स्वतःच्या खोलीत जात म्हणाले.
त्यासरशी निशा आणि साकेत तिथून जायला निघाले. त्यांना जाताना पाहून आशाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना निशाच्या निर्णयाचा राग आलेला नव्हताच मुळी. उलट त्यांना आधीपासूनच वाटायचे की निशाने साकेतला घटस्फोट देऊन चूक केलीय म्हणून. पण वसंतरावांच्या पुढे त्यांचं काही चालायचं नाही. म्हणून आज सुद्धा त्या काही बोलू शकत नव्हत्या. साकेत आणि निशा दाराच्या बाहेर जाणार एवढ्यात मागून निशांत ने त्यांना आवाज दिला. तो म्हणाला.
” थांब निशाताई…”
मग बाबांकडे पाहून म्हणाला.
” बाबा…खरंच तुम्ही निशा ताईला घराबाहेर काढणार आहात का…? निशा ताई तर तुमची सर्वात जास्त लाडकी आहे ना…मग आज तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी तुम्ही तिची साथ कशी सोडू शकता…?”
” हिने केलाय का आमच्या इभ्रतीचा काही विचार…आम्ही हिच्यासाठी तोलामोलाचे स्थळ शोधून आणले…अन् हिने शेवटी हिच्या मनाचेच खरे करून दाखवले…” वसंतराव म्हणाले.
” बाबा…इभ्रत वगैरे निशा ताईच्या आनंदाच्या पेक्षा जास्त आहे का…? आणि तुम्ही जो मुलगा ताईसाठी पसंत केला होता तो मलाही अजिबात आवडला नव्हता…जर ताईच खुश नसेल तर मग अशा सोयरिकीला अर्थ तरी काय होता…” निशांत म्हणाला.
” तुम्ही कितीही हीची बाजू घेतलीत तरी मला हे अजिबात पटलेलं नाही…मला ह्यानंतर ही या घरात नकोय…” असे म्हणून वसंतराव त्यांच्या खोलीत निघून गेले.
वसंतराव खोलीत निघून गेल्यावर निशांत निशाच्या जवळ जाऊन म्हणाला.
” ताई…मला माफ कर…आजवर मी तुझ्यासाठी कधीच काही करू शकलो नाही…पण आज तुझ्या या निर्णयात मी तुझ्या बाजूने ठामपणे उभा आहे…माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं काही असेल तर तो म्हणजे तुझा आनंद…”
निशांतचे बोलणे ऐकून निशाला आनंद झाला. मग आशाताई सुद्धा समोर येऊन म्हणाल्या.
” आणि मी सुद्धा तुझ्या या निर्णयाने खूप आनंदी आहे…मला सुद्धा फक्त तुला सुखात पाहायचे आहे…पण तुझ्या बाबांचा राग तर तुला माहितीच आहे…ते सध्या तरी काहीच ऐकून घेणार नाहीत…” आशाताई म्हणाल्या.
” तुम्ही दोघांनी मला समजून घेतलत तेच माझ्यासाठी पुरेसे आहे…पण बाबांनी मला समजून घेतलं असतं तर माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आनंदात झाली असती…” निशा म्हणाली.
” ताई…तू खरंच काळजी नकोस करू…सगळं काही व्यवस्थित होईल…” निशांत म्हणाला.
वृषाली मात्र असमंजस मध्ये होती. निशाच्या बाजूने बोलावे की तिच्या विरोधात म्हणून. तसे पाहता तिला निशा या घरातून जायलाच हवी होती. पण अशा पद्धतीने जाईल हा तिने कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे ह्यावर कसं व्यक्त व्हावं हे तिलाही कळत नव्हतं.
सगळ्यांचा निरोप घेऊन साश्रू नयनांनी निशा साकेतसोबत निघून गेली. आशाताईंना हुरहूर लागली होती पण आनंद सुद्धा होताच. निशांतने ठरवले होते की यापुढे नेहमीच निशाताई सोबत ठाम पणे उभे राहावे. वृषाली मात्र या सगळ्यात तटस्थ होती.
निशाच्या घरून निघून दोघेही साकेतच्या घरी जायला निघाले. खरे तर दोघांच्याही मनात धाकधूक होतीच. निशाच्या घरच्यांप्रमाणे साकेतच्या घरचे देखील आपले लग्न मान्य करणार नाहीत हे दोघांनीही गृहीत धरले होते. पण जे घडले ते त्यांच्या विचारांच्या पलीकडले होते.
ह्या दोघांना असे लग्न करून आलेले पाहून साकेत च्या घरच्यांना धक्का बसला पण त्यांनी कोणतीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही. साकेतच्या आयुष्यात मागच्या काही वर्षात झालेली परवड त्यांनी पाहिली होती. निशा पासून वेगळं झाल्यावर त्यांनी साकेतला कधीच आनंदी पाहिले नव्हते.
त्यामुळे ह्या लग्नामुळे का होईना सगळं काही नीट होईल अशी त्यांना कुठेतरी आशा वाटत होती. पण तरीही निशाच्या स्वभावाबद्दल ते अजूनही साशंकच होते. विशेष करून तिच्या दोन्ही मोठ्या जावा. पण तरीही त्यांनी तसे बोलून न दाखवता मोठ्यांचा निर्णय मान्य केला.
निशा आणि साकेतला घरच्यांनी घरात राहायची परवानगी दिली ती काहीशी साशंक मनानेच. पण निदान एवढ्यापुरते का होईना घरच्यांनी आपल्याला स्वीकारले ह्याचाच दोघांना आनंद झाला होता. निशा आणि साकेत दोघांनीही आपल्या नव्या संसाराची समाधानाने सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी निशा सकाळीच तयार होऊन स्वयंपाक घरात गेली. तिथे तिच्या दोन्ही जावा आधीपासूनच काम करत होत्या. तिने दोघींनाही गूड मॉर्निंग म्हटले. पण दोघींनीही तिला थंड प्रतिसाद दिला. ती मोठ्या जावेला म्हणाली.
” ताई…मी काही मदत करू का…?”
” नको…” दोघीही एकदमच म्हणाल्या.
त्यानंतर त्या दोघीही हिच्याशी काहीच बोलल्या नाहीत. निशा थोडा वेळ तिथे थांबून पुन्हा स्वतःच्या खोलीत निघून गेली. आता निशा जवळपास रोजच सकाळ संध्याकाळ स्वयंपाक खोलीत यायची. ह्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची. कामात मदत करायची इच्छा बोलून दाखवायची. हळूहळू मग दोन्ही जावा सुद्धा हिला घरातील छोटी मोठी कामे सांगू लागल्या.
साकेत सुद्धा त्याच्या हाताच्या असमर्थपणामुळे पूर्वी चे काम नीटपणे करू शकत नव्हता. म्हणून मग त्याने मजुरांना हाताशी स्वतःच्या शेतातील मालापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा छोटासा उद्योग सुरू केला होता. निशा सुद्धा आता त्याच्या मदतीला येत होती. सोबतच साकेतचा हात पूर्वीप्रमाणे व्हावा यासाठी फिजिओथेरपी सुद्धा सुरू होतीच.
हळूहळू या दोघांच्या प्रयत्नांना यश मिळत होते. उद्योग सुद्धा छान सुरू होता. निशा सासरच्यांची मने सुद्धा जिंकत होती. निशाचा स्वभाव बदललाय ह्याची आता तिच्या जावांना खात्री पटत होती. आशाताई आणि निशांत दोघेही निशा आणि साकेतला भेटायला यायचे. कधीतरी वसंतरावांच्या अनुपस्थितीत हे दोघेही त्यांना भेटायला जायचे. वसंतरावांची नाराजी मात्र काही केल्या कमी होत नव्हती.
एकदा वसंतरावांनी निशा आणि साकेतला रस्त्यावर रिक्षाची वाट पाहताना बघितले. निशाला एवढ्या उन्हात रस्त्यावर उभी राहून रीक्षाची वाट पाहताना पाहून क्षणभर त्यांचा जीव तुटला. पण सोबत साकेतला पाहून पुन्हा त्यांना सगळे काही आठवले आणि राग उफाळून आला. ते त्यांच्याशी काहीही न बोलता निघून आले.
असेच दिवस चालले होते. एव्हाना साकेतच्या हाताच्या सौम्य हालचाली व्हायला देखील लागल्या होत्या. साकेतच्या घरच्यांना आता साकेत आणि निशाच्या पुनर्विवाहाचा निर्णय सर्वथा योग्य वाटत होता. तिच्या जावा सुद्धा तिच्यावर खुश होता. फक्त वसंतरावांची नाराजी आहे तशीच होती.
एकदा वसंतराव संपूर्ण कुटुंबासोबत एका कार्यक्रमा निमित्ताने शेजारच्या गावात आलेले होते. त्यांना पाहून त्यांच्या जुन्या परिचयातील व्यक्ती तिथे आली आणि त्यांना म्हणाली.
” नमस्कार पाटील…”
त्यांना पाहून वसंतराव म्हणाले.
” रावसाहेब तुम्ही…कसे आहात…? “
” मी मजेत…तुम्ही खूप दिवसांनी येणं केलंत…” रावसाहेब म्हणाले.
” सवडच नव्हती मिळत…आज यजमानांनी खूप आग्रह केला म्हणून आलो…” वसंतराव म्हणाले.
” अच्छा…बरं तुमच्या कानावर गोष्ट आली का…?” रावसाहेबांनी विचारले.
” कुठली गोष्ट…?” वसंतरावांनी विचारले.
” अहो…शेजारच्या गावातील श्रीकांत पाटलांना म्हणे पोलिसांनी पकडुन नेले…” रावसाहेबांनी माहिती दिली.
” काय…?” वसंतराव एकदम हादरलेच. मग एकाएकी स्वतःला सावरून म्हणाले.
” पण का नेले…असे काय केले होते त्यांनी…”
” अहो आता महिन्याभरापूर्वी त्यांचं दुसरं लग्न झालं होतं…त्याच दुसऱ्या बायकोच्या माहेरच्यांनी पोलिस तक्रार केलीय की ह्यांनी तिला अर्धमेल होईपर्यंत मारलं म्हणून…” रावसाहेबांनी सांगितले.
” काय…? पण आपण तर ओळखतो ना त्यांना…म्हणजे एवढे चांगले ओळखत नसलो तरी ते चांगले प्रतिष्ठित नागरिक आहेत एवढं तर माहित आहेच ना आपल्याला…एवढा प्रतिष्ठित माणूस कशाला बायकोला मारेल…” वसंतराव अविश्र्वासाने म्हणाले.
” अहो वसंतराव… दिसतं तसं नसतं ते…नुसत्या तोंड ओळखीवरून आपण माणसाच्या स्वभावाचा अंदाज नाही लावू शकत…त्यांचं सुद्धा तसंच काहीतरी झालंय…आपण जरी म्हटलं की त्यांची दुसरी बायको खोटं बोलत असेल तरी पण त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलंय…त्यांच्या मते त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोला तर मारहाण केलीच पण पहिल्या बायकोला सुद्धा आयुष्यभर मारहाण करत होते…मुलांनी तर त्यांच्या आईच्या मृत्यूला सुद्धा वडिलांनाच जबाबदार धरले आहे…” रावसाहेबांनी माहिती दिली.
आता मात्र वसंतरावांना चांगलाच धक्का बसला होता. कारण हे श्रीकांत पाटील तेच होते ज्यांच्याशी त्यांनी निशाचे तडकाफडकी लग्न ठरवले होते. आपण इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त समाजात असणारी त्यांची प्रतिष्ठा आणि तोलामोलाची श्रीमंती पाहिली ह्याची जाणीव त्यांना झाली.
क्रमशः
तुझ्याविना मी – भाग ८ ( अंतिम भाग)