तशी निमाताईंना तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रूचायची नाही. सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्याच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरीही त्याला लवकर जवळ घ्यायची नाही. निमाताईंना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसे बोलून दाखवले नाही.
पण आताशा कल्पना अन् अजयच्या लग्नाला सहा महिने झाले तरीही कल्पना चे वागणे तसेच होते. आता अर्णव सुद्धा दोन झाला होता. त्याचा पहिला वाढदिवस वैदेहीच्या आजारपणामुळे साजरा केलाच नव्हता. म्हणून त्याचा दुसरा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात करायचा विचार होता निमाताईंचा. तसे त्यांनी अजय जवळ बोलूनही दाखवले.
पण कल्पना मध्येच म्हणाली की अर्णव अजुन लहान आहे. त्याला वाढदिवस म्हणजे काय ते सुद्धा कळत नाही. मग मोठा वाढदिवस करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा तो जरा मोठा झाला की करूयात मोठा वाढदिवस. अजय ने सुद्धा कल्पना च्या हो ला हो करत घरातल्या घरात वाढदिवस करायचे निश्चित केले. निमाताई मनातल्या मनात नाराज झाल्या.
पण अजयसमोर त्या काही बोलल्या नाहीत. एव्हाना आपल्या शब्दाला घरात फारशी किंमत उरलेली नाही हे त्यांना कळले होते. शेवटी अर्णवचा वाढदिवस घरातल्या घरातच साजरा केला गेला. लहानग्या अर्णवला तर काहीच कळत नव्हते. पण निमा ताईंना मात्र आपल्या नातवाला सावत्र वागणूक मिळायला लागलीय हे लक्षात येत होते. त्यांनी याबाबत अजयसोबत बोलायचे ठरवले. पण त्या काही बोलणार त्या आधीच एक दिवस अजय त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला.
” आई…काही माझ्या ऑफिस मधून मला काही दिवसांसाठी पुण्याला पाठवायचे ठरवले आहे…तर मला काही दिवसांसाठी जावे लागेल…मी कल्पनाला सांगितले आहे तयारी करायला…पुढच्या आठ दिवसांतच निघावे लागेल…”
” हो का…फारच कमी दिवस आहेत तयारी करायला…पण किती दिवसांकरिता जावे लागेल त्याची कल्पना आहे का…म्हणजे मी सुद्धा त्या हिशोबाने तयारी करेन…अर्णव साठी पण बरेच सामान घ्यावे लागेल…” निमाताई म्हणाल्या.
तसं कल्पनाने अजयला काहीतरी इशारा केला आणि अजय चाचरतच आईला म्हणाला.
” आई…मी काय म्हणतो…फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे…तर फक्त मी आणि कल्पनाच जावून येतो…तू अर्णवला घेऊन घरी थांब…म्हणजे फक्त काही दिवसच…”
आता मात्र निमा ताईंना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्या अजयला म्हणाला.
” म्हणजे…तू मला आणि अर्णवला इथे राहायला सांगतो आहेस का…?”
” हो…म्हणजे…अर्णव आता एवढा सुद्धा लहान नाही…आणि एरव्ही तूच सांभाळतेस ना त्याला…मग काय हरकत आहे ना…आणि तिथे नवीन जागेत अडजस्ट व्हायला वेळ लागणार मला… अशात सगळ्यांना तिथं घेऊन जाणं सध्यातरी ठीक वाटत नाही…” अजय म्हणाला.
” अरे पण अर्णव इतक्या लहान वयात आई वडीलांना सोडून कसा राहणार…मी सुद्धा तुमच्या दोघांशिवाय एकटी त्याला कशी सांभाळणार…एवढं वय सुद्धा नाही राहिलं माझं…आणि स्वतःच्या पोटच्या गोळ्याला सोडून कसं काय राहवलं जाईल रे तुला…आणि काय ग कल्पना…तुझा सख्खा मुलगा असता तर अशी सोडून गेली असतीस का त्याला माझ्याजवळ…” निमा ताई संतापून म्हणाल्या.
आता मात्र कल्पनाने लगेच डोळ्याला पदर लावला आणि मोठमोठ्याने रडवेल्या आवाजात म्हणाली.
” मी आजवर इतकं केलं तरी शेवटी मला सावत्र म्हणून हिणवलंच ना ह्यांनी…रोज राब राब राबतो मी ह्या घरासाठी…सख्ख्या आईनेही केलं नसतं एवढं केलंय मी अर्णव साठी…तरीपण काही कमी जास्त झालं की शेवटी माझंच नाव खराब…शेवटी काही उपयोग नाही एवढा जीव लावून…”
मग लगेच अजय तिच्याजवळ जाऊन तिला सावरत म्हणाला.
” अगं कल्पना…रडू नकोस…तू खरंच खूप केलंस घरा साठी अन् आमच्या सगळ्यांसाठी…कोणाला नसली तरी मला तुझी खुप कदर आहे…” मग आईकडे पाहून म्हणाला.
” आई…कल्पना ने किती केलं ग घरासाठी…वैदेही गेल्यावर आपल्या सगळ्यांना हिनेच सांभाळून घेतलं ना…आता काही दिवस तिला जरा मोकळं जगायचं आहे… जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातून निघून थोडं निवांत व्हायचं आहे तर काय चुकलं तिचं…आणि कल्पना नव्हती तेव्हा सांभाळले ना तू सगळे घरदार अन् अर्णवला सुद्धा…मग आता काही दिवसांचा प्रश्न आहे…तेवढे तर होईलच तुझ्याच्याने…”
निमाताई त्याला काहीतरी बोलणार त्या आधीच कल्पना डोळ्याला पदर लावत तिच्या खोलीत निघून गेली. अन् अजय तिच्या मागे मागे तिथून निघून गेला. आता मात्र निमा ताईंना खूप दुःख झाले. अजय इतका बदलेल ह्याची त्यांनी कधी कल्पना सुद्धा नव्हती केली. त्यानंतर एक दोनदा अजुन त्यांनी अजयला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काही ऐकले नाही.
आठ दिवसांनी तो आणि कल्पना घरादाराची आणि अर्णवची जबाबदारी निमाताईंवर टाकून निघून गेले सुद्धा. आता मात्र रिकामे घर आणि लहानगा अर्णव दोघांनाही पाहून त्यांना रडू येत होते. दोन दिवस तर त्या कशातरी अर्णवला पोटाशी धरून कशातरी राहिल्या.
पण अर्णवला आता कल्पना आणि अजयची सवय असल्याने तो आता पूर्णवेळ निमा ताईंजवळ राहत नव्हता. सतत चिडचिड आणि रडारड सुरूच होती. मग निमाताईंनी त्यांच्या मुलीला अरुणाला फोन केला आणि तिला सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. अरुणाला हे ऐकून खूप वाईट वाटले.
निमाताईंनी अरुणा जवळ काही दिवसांकरीता तिच्याकडे येऊन राहण्याची इच्छा बोलून दाखवली. काही दिवसांचा प्रश्न असल्याचे वाटून अरुणा ने सुद्धा मोठ्या उत्साहाने आईला तिच्याजवळ राहायला बोलावले. पण काही दिवसांकरिता गेलेला अजय वर्ष सरत आले तरीपण परतला नव्हता. तो फक्त फोन करून आईची आणि अर्णवची ख्याली खुशाली विचारायचा. म्हणून आताशा अरुणा सुद्धा या जबाबदारीला कंटाळली होती.
आजच्या घटनेने निमाताईंना अर्णवच्या भविष्याबाबत काळजी वाटायला लागली होती. त्या विमनस्क अवस्थेत अर्णव ला घेऊन तशाच बाहेर पडल्या आणि जवळच्या स्वामींच्या मंदिरात जाऊन बसल्या. त्यांनी देवाला अंतःकरणापासून हात जोडले आणि त्यांच्या मनातील अर्णवबद्दल असलेली काळजी बोलून दाखवली. त्यानंतर त्या बराच वेळ अर्णव ला मांडीवर घेऊन विचार करत तिथे बसल्या होत्या. अचानकच त्यांचे लक्ष समोर गेले. एक ओळखीचा चेहरा त्यांच्या समोर आला. आणि त्यांनी लगेच तिला ओळखले. ही राधा होती. वैदेहीची वहिनी. तितक्यात राधाचे लक्ष सुद्धा निमाताईंवर गेले. आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या अर्णववर सुद्धा. अर्णवला पाहताच ती धावतच त्याच्या जवळ आली आणि पटापटा त्याचे मुके घेतले. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यातील आनंदाश्रू निमा ताई पाहतच राहिल्या. राधाने त्याला मिठीत घेऊन त्याचा खूप लाड केला. मग तिचे लक्ष निमाताईंवर गेले जरा अवघडून तिने अर्णवला खाली ठेवले आणि निमाताईंना नमस्कार करत अदबीने म्हणाली.
” माफ करा…मी तुम्हाला न विचारता अर्णवला जवळ घेतले…पण इतक्या दिवसांनी त्याला पाहून मला राहवलेच नाही…” ती अर्णवकडे पाहत म्हणाली.
” तू इकडे कशी काय…? म्हणजे तुम्ही राहता तो भाग तर इथून दुसऱ्या टोकावर आहे ना…” निमाताईंनी विचारले.
” हो…पण इकडे एक जुनी मैत्रीण राहते…ती आजारी होती म्हणून तिला पाहायला आले होते…जाताना मंदिर दिसले म्हणून दर्शनाला आले…आणि देवाचीच कृपा म्हणून आज कितीतरी दिवसांनी अर्णवची भेट झाली…” राधा म्हणाली.
त्यावर निमाताई काही बोलल्या नाही. त्या फक्त राधाला पाहतच होत्या. मग राधा जरा हिम्मत करून पुढे म्हणाली.
” तुमची हरकत नसेल तर एक बोलू का…?”
” बोल ना…” निमाताई म्हणाल्या.
” आई खूप आठवण काढतात अर्णवची…त्याला बघण्यासाठी खूप व्याकूळ होतात…तुमची हरकत नसेल तर एकदा आईंची आणि अर्णवची भेट घडवून द्याल का…आईंना खूप आनंद होईल…” राधा म्हणाली.
” हो…का नाही…” निमा ताई त्यांच्याही नकळत बोलल्या.
” खरंच…कधी घेऊन येऊ आईंना इथे…” राधाने अत्यानंदाने विचारले.
” इथे…इथे नको…” काहीसा विचार करत निमा ताई म्हणाल्या. ” त्यापेक्षा तुमच्या घरी जाऊयात…आताच…”
” आताच…” राधाचा विश्र्वासच बसत नव्हता. पण अर्णव ला थोड्या वेळासाठी का होईना त्याच्या आजोळी जाता येईल म्हणून राधा ने लगेच रिक्षा बोलावली आणि तिघे जण तिच्या घरी जायला निघाले.
क्रमशः
मराठी कथा/ वारस – भाग ४( अंतिम भाग)