थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या, म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहचली सुद्धा. राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासुबाई एकदमच हरखल्या. त्यांनी त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले. त्याचे किती लाड करू अन् किती नाही असे झाले होते सर्वांना.
लहानग्या अर्णवला हे सर्व काय होतंय ते कळतच नव्हते. पण बऱ्याच दिवसांनी निमाताईंव्यतिरिक्त आणखी मायेची माणसे त्याला मिळाली होती. त्यांच्या मायेचा स्पर्श त्यालाही कळत होता. इथे आल्यावर त्यालाही आपुलकी जाणवत होती. इथे सगळेजण त्याचे लाड करत होते.
निमाताई हे सर्व पाहत होत्या. मनातल्या मनात त्यांनी काहीतरी विचार केला आणि वैदेहीच्या आईला बाजूला नेले आणि विचारले.
” विहिण बाई…तुमच्या राधाने अजूनही गोड बातमी दिलेली नाही का…?”
” नाही…म्हणजे अजुन तरी नाही…” वैदेहीची आई म्हणाली.
” मग एखादे मूल दत्तक घेण्याचा विचार का नाही करत…?” निमा ताई म्हणाल्या.
” मूल दत्तक घेण सुद्धा एवढं सोप्प नाहीय आजच्या काळात…त्याला सुद्धा नशीब बलवत्तर असावं लागतं… तसं आमच्याही मनात आहेच…घरात एखादं मूल असेल तर घराला घरपण येतं…” वैदेही च्या आईने उत्तर दिले.
” आमच्या अर्णवला घ्याल दत्तक…राधासारखी आई मिळाली ते त्याच ही बालपण धन्य होईल…” निमाताई निर्धाराने म्हणाल्या.
वैदेहीच्या आईला स्वताच्या कानांवर विश्र्वासच बसला नाही. त्या निमाताईंकडे एकटक पाहतच बसल्या. मग निमाताईच पुढे म्हणाल्या. ” तुम्ही बरोबर ऐकलंय…मला जाणीव झालीय की अर्णव तुमच्या घरी जास्त आनंदात राहील…”
आणि मग निमाताईंनी वैदेहीच्या आईला न संकोचता घडलेले सर्वकाही सांगितले. कल्पनाने अर्णवला दिलेली सावत्रपणाची वागणूक, अजयचा अर्णवच्या बाबतीत असलेला निष्काळजीपणा, अरुणाने अर्णवला दिलेली आश्रीतासारखी वागणूक हे सगळंच सांगितलं. त्यांना वाटत असलेली अर्णवच्या भविष्याबद्दलची काळजी सुद्धा बोलून दाखवली. आजवर अर्णवला भेटू न दिल्याबद्दल मोकळ्या मनाने माफी सुद्धा मागितली. सगळं झाल्यावर त्या वैदेहीच्या आईला म्हणाल्या.
” माझं आता वय झालंय… आणि अर्णवला मी एकटी सांभाळू शकणार नाही ह्याची मला जाणीव झालीय…अर्णव माझ्या घरचा एकुलता एक वारस…त्यामुळे आजवर त्याला स्वतःपासून दूर करण्याचे धाडस होत नव्हते…पण मला आता कळून चुकलय की त्याच्याकडे वारस म्हणून पाहण्याआधी एक मूल म्हणून पाहायला हवं…ज्याला ह्याक्षणी सर्वात जास्त त्याच्या मायेच्या माणसांची गरज आहे…”
निमाताईंचे बोलणे ऐकून वैदेहिच्या आई, बाबा, भाऊ अन् राधावहिनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. राधा ने तर अर्णव ला उचलून घट्ट छातीशी कवटाळले. एवढ्याशा पोराने एवढं सहन केलंय हे ऐकून सारेच हळहळले होते. पण निमा ताईंनी त्याच्या भविष्याचा विचार करून स्वतःच्या काळजाचा तुकडा त्यांना देऊ केला याच कौतुक जास्त त्यांना जास्त वाटत होते. निमाताईंनी सुद्धा हा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला होता. वैदेही ची आई निमाताईंना म्हणाली.
” निमाताई…हा निर्णय घेऊन तुम्ही आम्हाला आमच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान भेट दिलीत…पण माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे…”
” विनंती…कसली विनंती…?”
” आमची इच्छा आहे की तुम्ही सुद्धा अर्णव बरोबर आमच्या सोबत राहावं…आजवर तुम्ही अर्णवला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले आहे…आमच्या झोळीत हे सुख देताना तुम्ही त्या सुखाला पारख्या झाल्या तर हे सुख कायम एकांगी राहील..अर्णवला तुमच्या मायेच्या सावलीची सुद्धा तितकीच गरज आहे…आपण सगळे मिळून अर्णवला खूप प्रेम देऊ…” वैदेहीची आई भावूक होत म्हणाली.
सुरूवातीला संकोच म्हणून निमाताईंनी टाळाटाळ केली. मी येऊन जाऊन राहील असे म्हणाल्या. पण खरे तर त्या सुद्धा अर्णव पासून दूर राहू शकणार नव्हत्या. म्हणून मग सगळ्यांचा आग्रह त्यांनी मान्य केला. आणि तिथे सगळ्यांसोबत राहण्याचे आनंदाने मान्य केले.
संध्याकाळी त्या अरुणाच्या घरी गेल्या आणि तिथून अर्णव चे आणि त्यांचे सर्व सामान घेऊन आल्या. सुरुवातीला त्यांना काळजी वाटली होती की त्यांचा हा निर्णय त्या अरुणाला कसा सांगतील आणि अरुणा त्यांना जाऊ देणार की नाही. पण अरुणा ने त्यांची चौकशी तर केली की त्या कुठे चालल्यात आणि अर्णव कुठे आहे. पण त्यांना थांब असे अजिबात म्हणाली नाही. अजय तर आपल्याच धुंदीत जगत होता त्यामुळे त्याने काही विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता.
आपण वैदेहीच्या कुटुंबात ॲडजेस्ट करू शकू की नाही ही साशंकता मनात घेऊनच त्या तिथे राहायला गेल्या. पण लवकरच त्या सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग बनल्या. राधाच्या ममतेच्या छायेत आणि दोन्ही आजींच्या मायेच्या सावलीत अर्णव मोठा होत होता. वैदेहीच्या घरच्यांना निमा ताईंनी बरेचदा आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी विनम्रपणे ती नाकारली.
सुरूवातीला अरुणाला वाटले होते की आई काही दिवसांपूरती जाईल आणि अर्णवला तिथे ठेवून परत येईल. पण निमाताई जेव्हा परत यायचं नाव घेईनात तेव्हा अरुणा एकदा त्यांना भेटायला गेली होती. तिने निमाताईंना सुचवले की त्यांनी अर्णव ला वैदेही च्या माहेरी ठेवून स्वतः तिच्याकडे राहायला परत यावे. पण निमाताईंनी नकार दिला.
तेव्हा मात्र तिने आपल्याला पैशांची अडचण आहे आणि पेन्शन आणि घरभाड्याचे पैसे दर महिन्याला देत जा असे सुचवले तेव्हा मात्र निमाताईंना तिच्या येण्याचा हेतू कळला होता. तरीही तिचा हक्क म्हणून त्यांनी घरभाड्याची अर्धी रक्कम दर महिन्याला तिला देऊ केली. पण पेन्शन मात्र तिला देऊ शकत नाही हे सुद्धा सांगितले. कारण पेन्शन ही त्यांच्या स्वाभिमानाने जगण्याची तजवीज होती.
अर्णवच्या नावाने सुद्धा त्या बँकेत दर महिन्याला काही पैसे टाकायच्या. अजय सुद्धा आता पूर्णपणे पुण्यातच स्थायिक झाला होता. कधीतरी तो यायचा तेव्हा अर्णव आणि निमाताईंना भेटून जायचा. पण पुढे त्याला आणि कल्पनाला मुलगी झाली तेव्हा त्याच्या भेटी आणखीनच कमी होत गेल्या. इकडे अर्णव मात्र सगळ्यांच्या प्रेमाच्या छायेत मोठा होत होता. आणि निमाताई त्याला मोठं होताना पाहून स्वतःच्या निर्णयावर खूप समाधानी होत होत्या.
निमाताईंना वेळेवरच हे कळले की अर्णव ला एक वारस म्हणून मोठे करण्यापेक्षा एक मूल म्हणून त्याला आनंदी बालपण देणे जास्त गरजेचे होते. आणि त्यांच्या एका निर्णयाने अर्णव ला आयुष्यभरासाठी प्रेमाची माणसं मिळाली होती.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.