श्वेताला आज लग्नासाठी म्हणून पाहुणे पाहायला येणार होते. श्वेता जरा घाबरलेलीच होती. पण सोबतच तिला एक अनामिक ओढ सुद्धा वाटत होती. तिने सिनेमात बघितलं होतं. मुलगा आणि मुलगी कसे चोरून एकमेकांना बघतात. मग हळूच घरच्यांना पसंत आहे की नाही ते सांगतात. त्यानंतर ते लग्नाआधीचे गोड क्षण कल्पनेत आठवून ती शहारली होती.
श्वेताला पाहायला येणार म्हणून तिच्या आईने मागच्याच आठवड्यात तिच्यासाठी छान पिवळ्या रंगाची काठा पदराची साडी घेतली होती. मुळातच सावळा असणारा तिचा रंग पिवळ्या साडीवर खुलून दिसत होता.
इतक्यात पाहुणे घरी आले. आणि घरच्यांची लगबग सुरू झाली. गावी पाहुणे पाहायला येणे हा सुद्धा एक सोहळाच असतो. पाहुण्यांचे चहा पाणी झाले आणि लगेच मुलीला बोलवा म्हणून कुणाचा तरी आवाज आला. लगेच श्वेताला पाहुण्यांच्या बैठकीत नेण्यात आले. श्वेताने आधीच ठरवले होते की एकदा चोरट्या नजरेने मुलाला ती पाहून घेईल.
पण इतक्या सगळ्या लोकांमध्ये वर पाहण्याची तिची हिम्मत झाली नाही. ती बराच वेळ तिथे मान खाली घालून एका खुर्चीवर बसली होती. पाहुण्यांनी बराच वेळ तिचे निरीक्षण केल्यानंतर त्यांच्यातील एका ज्येष्ठ माणसाने तिला तिचे नाव विचारले. तिने जरा घाबरतच तिचे नाव सांगितले. त्यानंतर अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले.
स्वयंपाक येतो का ह्या प्रश्नावर तिने होकारार्थी उत्तर दिल्यावर तिला लगेच शिरा कसे करतात ह्याची रेसिपी सुद्धा विचारली. त्यानंतर पाय दाखव, चालून दाखव, गाणं म्हणून दाखव अशा अनेक पद्धतीने तिचे मूल्यमापन करण्यात आले. श्वेताने ह्या सगळ्याची कल्पना केली नव्हती. हे सगळे तिच्या कल्पने पेक्षा खूप वेगळे होते.
थोड्या वेळाने तिला बैठकीतून परत पाठवण्यात आले. त्यानंतर बराच वेळ पाहुण्यांच्या गोष्टी सुरू होत्या. त्यानंतर मुलाकडच्यांनी लगेच सांगितले की त्यांना मुलगी पसंत आहे. श्वेताच्या वडिलांनी सुद्धा त्यांना दुजोरा दिला की त्यांना सुद्धा मुलगा पसंत आहे.
त्यातील एकाने त्यांना सुचवले की एकदा मुलीला विचारून बघा तेव्हा श्वेताच्या वडिलांनी मोठ्या ठामपणे सांगितले की त्यांची मुलगी त्यांच्या शब्दाबाहेर नाही म्हणून. श्वेताने त्यांच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिचा भ्रमनिरास झाला. कारण एकतर तिने मुलाला अजिबात पाहिले नव्हते. आणि तिच्या बाबाने मुलाला होकार देण्यापूर्वी एकदाही तिला विचारले नव्हते. ती उदास झाली. त्यानंतर जेव्हा पाहुणे घरातून बाहेर जात होते तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला खिडकीजवळ बोलावले आणि खिडकीबाहेर बोट दाखवून म्हणाली…
” ते बघ…तो निळ्या रंगाच्या शर्ट मध्ये आहेत ना तोच नवरा मुलगा आहे…”
श्वेता ने त्याच्याकडे पाहिले. साधारण पस्तीशीच्या जवळपास असणारा तो दिसायला अगदीच साधारण होता. त्याचा चेहरा पाहताक्षणीच तिला रागीट वाटत होता. त्याचे लालसर डोळे, डोक्यावरील केस बहुधा नुकतेच गळायला लागले होते म्हणून मध्येच थोडं टक्कल पडलेले होते. श्वेताला तो मुलगा अजिबातच आवडला नव्हता.
ती तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली.
” आई…मला हा मुलगा लग्नासाठी अजिबातच आवडला नाही ग…”
” गप्प बस…तुझ्या बाबांनी ऐकले तर…आणि तुला काय कळतं तुझं चांगलं वाईट कशात आहे ते…तुझ्या बाबांना मुलगा पसंत आहे…आणि त्याच्या घरी पंधरा एकर शेती आहे…एकटाच मुलगा आहे…त्याच्या घरी एखाद्या राणी सारखी राहशील तू…” आई म्हणाली.
” पण आई…मला चालेल मुलाच्या घरी शेती कमी असली तरी…पण हा मुलगा आवडला नाही मला…” श्वेता म्हणाली.
” तुझ्या बाबांनी होकार दिलाय आता…आता जास्त बोलू नकोस…आणि तुझ्या बाबांसमोर तर अजिबात नाही…आणि इतकं चांगलं स्थळ मिळायला नशीब लागतं…तुझ्या एका तरी बहिणीला मिळाला आहे का पंधरा एकर शेती असणारा मुलगा…तुझ नशीब समज…” आई म्हणाली.
श्वेता गप्प बसली. सकाळी एका वेगळ्याच कल्पनेमध्ये हरवलेल्या श्वेताला मात्र आता हे सर्व नकोसे झाले होते. तिला वाटत होते की हे सर्व तिचं एक वाईट स्वप्न असावं. पण तिच्या घरचे मात्र खूप आनंदात होते. सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगितले जात होते की किती चांगला मुलगा आहे ते.
त्याचे शिक्षण चौदावी पर्यंत झाले आहे हे सांगताना तर त्यांची छाती अभिमानाने फुलून येत होती. आणि पंधरा एकर शेती म्हणजे जणू कुठली जहागीर प्राप्त झाल्यासारखे सांगत होते. श्वेताला हे सगळे अजिबात आवडले नव्हते पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. जे होत आहे ते स्वीकारणे तिला भाग होते.
त्या नंतर आठ दिवसातच साखरपुडा उरकून घेण्यात आला. साखरपुड्याचे दिवशी नवरा मुलगा सचिन आणि श्र्वेताची नजरानजर झाली. तेव्हा त्याने तिच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. ती मनातून आणखीनच घाबरली. पण आता काही होऊ शकणार नव्हते. एकदा लग्न ठरलं म्हणजे ठरलं. आणि साखरपुडा झाल्यावर मोडणे तर शक्यच नाही.
त्यानंतर एके दिवशी त्यांच्या ओळखीतील एक गृहस्थ त्यांच्या घरी आले. ज्या गावी श्वेताचे लग्न ठरवण्यात आले होते हे त्याचं गावचे होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या वर त्यांनी सरळ विषयालाच हात घातला.
” खरं सांगायचं म्हणजे मला इथे काही विशेष काम नव्हते…फक्त तुम्हाला भेटायचं म्हणून आलो इथे…” ते म्हणाले.
” काय काम होतं पाहुणे…बोला की…” श्वेताचे वडील म्हणाले.
” तुम्ही ज्या मुलाशी तुमच्या मुलीचे लग्न ठरवले आहे तो मुलगा खूप दारुडा आहे…रात्रंदिवस नुसता दारूत असतो…म्हणूनच आजवर त्याचे लग्न नाही होऊ शकले…घरी शेती आहे पण सगळं उत्पन्न त्याच्या व्यसना वर खर्च होतं…सोबत त्याला बाईचा सुद्धा नाद आहे…” ते म्हणाले.
त्या माणसाचे बोलणे ऐकून श्वेताच्या वडिलांचा पारा चढला. ते तडक जागेवरून उठले आणि त्या माणसाच्या कॉलर ला हात घातला आणि म्हणाले…
” काय रे… जळतोस ना तू…तुझ्या मुलीला इतकं चांगलं स्थळ नाही आलं आजवर म्हणून…माझ्या मुलीचं लग्न तोडायला पाहतोस काय…माझ्याच घरी येऊन माझ्याशी तोंड वर करून बोलतोस… चल निघ इथून…आम्ही तुझ्या बोलण्यात येणारे नाही…” श्वेताचे वडील म्हणाले.
त्या माणसाला आपला अपमान सहन झाला नाही म्हणून तो ताडकन त्या घरातून बाहेर पडला. मनात मात्र म्हणत होता की तुम्ही खूप चुकीचं करताय. पण श्वेताच्या घरचे काही ऐकायला तयार नसल्याने त्याने सुद्धा जास्त प्रयत्न केले नाहीत.
त्या माणसाचे बोलणे श्वेताने ऐकले होते. श्वेताला आला त्याच्याशी लग्न करायची अजिबात इच्छा उरली नव्हती. तिने हिम्मत करून वडिलांसमोर आपला नकार सांगायचे ठरवले. ती जरा भीतभीतच वडीलांसमोर आली आणि म्हणाली.
” बाबा…मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही…मला तो अजिबात आवडला नाही बाबा…” श्वेता म्हणाली.
श्वेताचे बोलणे ऐकून तिच्या बाबांचा राग अनावर झाला. त्यांनी रागातच तिच्या एक कानशिलात लगावली.
” इतकी हिम्मत वाढली तुझी…माझ्यासमोर बोलत आहेस…मी तुला सल्ला मागितलेला नाही…आम्ही जे म्हणू ते चुपचाप ऐकायचं…यापुढे एक शब्द जरी बोललीस तर याद राख… तुझं लग्न याच मुलाशी होईल…एकदा ठरलं म्हणजे ठरलं…” श्वेताचे बाबा रागातच म्हणाले.
श्वेता मात्र या अनपेक्षित प्रसंगाने भीतीने थरथरत होती. शेवटी तिची आई तिला समजवायला आली आणि म्हणाली.
” लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात पोरी…आज तो दारू पितो पण लग्न झाल्यावर सुटेल त्याची दारू…तू सुधार शील त्याला पुढे…अग संसार सुखी कसा ठेवावा हे बाई माणसालाच पाहावं लागतं…बाकी तुझ्या नशिबात जे असेल तेच होईल…”
आईचे बोलणे ऐकून श्वेता गप्प बसली. आता कुणाजवळ काही बोलायची सोय राहिली नव्हती. तिने आता परिस्थितीला स्वीकारायचे ठरवले. लवकरच लग्नाची तारीख काढण्यात आली. श्वेता वडिलांच्या भीतीने लग्नाची सगळी तयारी करत होती. लग्न साध्या पद्धतीने करायचे ठरले होते.
क्रमशः
सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग २ (अंतिम भाग )