” काय करताय सुधिरची आई…” साठे काकू दारातून आत येत म्हणाल्या.
” काही नाही हो…आज जरा बरं वाटत नाही आहे…म्हणून म्हटलं थोडा आराम करावा…” वृंदाताई म्हणजेच मनिषाच्या सासुबाई म्हणाल्या.
” आता या वयात इतकी कामे कराल तर तब्येत तर बिघडणारच ना…” साठे काकू मनीषा कडे तिरकस पाहत बोलल्या. तसे मानिषाच्या सासूबाईंनी तिला किचन मध्ये जाऊन चहा ठेव असा इशारा केला.
साठे काकू अशा का बोलल्या हे मनिषाला कळलेच नाही. पण तिने जास्त न विचार करता साठे काकू आणि सासूबाईंसाठी चहा ठेवला. हॉलमध्ये सासुबाई आणि साठे काकूंच्या गोष्टी सुरू होत्या. मनिषाला आपल्या गोष्टी ऐकू जाणार नाही ह्याची पुरेपूर काळजी तिची सासुबाई घेत होत्या. साठे काकू वृंदाताईंना म्हणाल्या.
” हे बघा सुधीरची आई…आता तुम्ही सुद्धा जरा कडक वागत जा सूनेशी…किती दिवस स्वतः घरातील काम करणार आहात…आणि तिला किती दिवस असेच लाडावून ठेवणार आहात…”
” मी तरी काय करणार…शेवटी राहायचं तर सूनेच्याच हाताखाली आहे ना…मग तिच्याशी वाकडं करून कसं चालेल…” वृंदा ताई बिचारेपणाने म्हणाल्या.
” तुम्ही हे सगळं सुधिरच्या कानावर का नाही घालत…” साठे काकू म्हणाल्या.
” कशाला उगीच…? माझ्यामुळे या नवरा बायकोत वाद नकोत व्हायला म्हणून…” वृंदाताई म्हणाल्या.
” कठीणच आहे बाई तुमचं…” साठे काकू हळहळत म्हणाल्या.
” ते जाऊद्या…मला सांगा तुम्ही आज सकाळी सकाळीच घरी कशा…?”
” ते तर सांगायचं राहूनच गेलं…माझ्या नातवाचा वाढदिवस आहे आज…संध्याकाळी आपल्या घरी कार्यक्रम आहे…तर तुम्ही नक्की यायचं…” साठे काकू म्हणाल्या.
इतक्यात मनीषा सुद्धा हातात चहाचा ट्रे घेऊन तिथे आली.
” मला तर आज या गुडघेदुखी चा त्रास होत आहे…नाहीतर मी नक्कीच आली असते…” वृंदा ताईंनी दिलगिरी व्यक्त केली.
” हरकत नाही… सुमेधाला किंवा मनिषाला पाठवून दिलं तरी चालेल.
” सुमेधा आज तिच्या काकुकडे गेली आहे. करुणा ( काकूंची मुलगी) कालच आलीय नाशिकहून…म्हणून तिला भेटायला गेलीय तिथे…” वृंदा ताई म्हणाल्या.
” हरकत नाही…मनिषालाच पाठवून द्याल मग थोडा वेळ…तसेही ती घरीच आहे ना…” साठे काकू मनीषा कडे बघत म्हणाल्या. ” काय ग…संध्याकाळी येशील ना वाढदिवसाच्या कार्यक्रमाला…”
मनीषाने सासूबाईंकडे पाहिले. सासूबाईंनी नाईलाजानेच होकार दिला. आणि साठेकाकू निघून गेल्या.
मनिषाच्या लग्नाला सहा महिने झालेत. तिच्या घरात सासुबाई, सुधीर(तिचा नवरा), वर्षभरापूर्वी घटस्फोट होऊन माघारी आलेली नणंद सुमेधा आणि ती असे चारच जण असतात. नवीनच लग्न झालेलं आल्याने इतक्यात तरी मनीषा बाहेरच्या कार्यक्रमांना जास्त जात नाही. सोसायटी मधील सगळ्याच कार्यक्रमात सासूबाईच जातात. पण आज सासूबाईंना बरं नव्हतं. आणि शेजारच्या साठे काकूंकडे त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता.
साठे काकू आणि मनिषाच्या घरच्यांचा चांगलाच घरोबा असल्याने त्यांच्या घरी कार्यक्रमाला जाणे आवश्यकच होते. शेवटी हो नाही करत सासूबाईंनी मनिषाला तिकडे पाठवायचे ठरवले. मनीषा सुद्धा घरातील सगळीच कामे आटोपून तयार झाली. सासूबाईंना सुद्धा काय हवं आणि काय नको ते विचारले.
सासूबाईंनी तिला अनेक सूचना दिल्या. त्यातील सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे कुणाशीच जास्त बोलायचे नाही. कार्यक्रम आटोपला की सरळ घरी यायचं. वगैरे वगैरे. मनीषा जरा अवघडून गेली होती. साठे काकू अगदी शेजारीच राहायच्या. पण आजवर मनीषा आणि त्यांचे बोलणे अगदीच जुजबी झाले होते.
मनीषा दिवसभर कामात असायची. सासुबाई तिला एकामागोमाग एक काम सांगायची आणि मनीषा सगळी कामे करत बसायची. शिवाय नवीनच सून असल्याने कधी घराबाहेर जाऊन शेजाऱ्यांशी गप्पा मारणे तिला जमलेच नाही.
पण आज मात्र ती पहिल्यांदा सोसायटी मधील कार्यक्रमाला जाणार होती. म्हणून मग तिने घरातील कामे लवकर आटोपली. संध्याकाळी सहा वाजता जायचं होतं. पण ही लवकरच निघाली. पावणेसहा वाजता. साठे काकूंचा फ्लॅट अगदीच जवळ होता.
मनीषाने सुंदर केशरी रंगाची साडी घातली होती. केसांना दोन्ही बाजूंनी पिनअप करून खाली मोकळे सोडले होते. कानात छोटेसे डुल आणि मंगळसूत्र. हातात मॅचींग बांगड्या. आधीच सुंदर असलेली मनीषा एवढ्याशा तयारीने सुद्धा खूप सुंदर दिसत होती.
ती पोहचल्यावर साठे काकूंनी तिची त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. अजूनही सगळीच पाहुणे मंडळी आलेली नव्हती. आपण एकटेच हॉल मध्ये बसून काय करणार म्हणून मग ती हळूच त्यांच्या किचन कडे वळली. साठे काकूंची सून शर्मिला अजूनही कामातच होती. ती अजून तयार सुद्धा झाली नव्हती.
मग मनीषा तिला म्हणाली.
” ताई…मी काही मदत करू का…”
शर्मिलाने मनिषाकडे अगदीच आश्चर्याने बघितले आणि म्हणाली.
” अगं काही नाही… भेळ करण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर कापायची बाकी आहे…म्हटलं हे सगळं वेळेवर केले तरी होऊन जाईल…पण बघ ना…वेळ होत आलीय आणि हे अजूनही राहिलय…पण करेल मी सगळं लवकरच…”
” तुम्ही जा तयारी करायला…मी करेन एवढं…” मनीषा म्हणाली.
” पण तुला जमेल का…?” शर्मिला ने आश्चर्याने विचारले.
” हो…का नाही जमेल…अगदी सोप्पं आहे हे तर…” मनीषा हसून म्हणाली.
आणि मग शर्मिला मनिषावर ते काम सोपवून तयारी करायला म्हणून निघून गेली.
इकडे मनीषा ने अगदी कमी वेळेत सगळी कामे करून ठेवली. आणि काम झाल्यावर किचन सुद्धा आवरले. शर्मिला तयार होऊन येईस्तोवर ती हॉल मध्ये येऊन बसली. शर्मिला तयार झाल्यावर तिने जेव्हा किचन आवरलेले बघीतले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली.
त्यानंतर हळूहळू एक एक पाहूणा यायला सुरुवात झाली होती. फक्त जवळचे तीस चाळीस लोक कार्यक्रमासाठी बोलावले होते. मनीषा सुद्धा आज इतक्या जणांशी पहिल्यांदा भेटून बोलत होती. पाहुणे मंडळी सुद्धा अगत्याने तिची चौकशी करायचे आणि ती सगळ्यांशी प्रेमाने बोलत होती.
बर्थडे केक कापला आणि सगळ्यांना चहा नाश्ता सर्व्ह करण्यात मनीषाने शर्मिलाला मदत केली. त्यानंतर शर्मिलाला सगळ्यांसोबत फोटो काढता यावेत म्हणून तिने सगळ्यांसाठी चहा करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि शर्मिलाला निश्चिंत होऊन फोटो काढण्यास सांगितले.
मनीषाने खूपच चांगला चहा केला होता. सगळ्यांना तिच्या हातचा चहा खूपच आवडला. साठे काकूला सुद्धा मनिषाला पाहून आश्चर्य वाटत होते. तिची कामात असलेली चपळाई आणि हाताला असणारी चव आज पहिल्यांदा कळली होती. नाहीतर आजपर्यंत तिच्या सासुकडून आजवर तिच्याबद्दल फक्त नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या.
सगळं काही झाल्यावर मनीषा जेव्हा घरी जायला निघाली तेव्हा साठे काकू तिला सोडायला बाहेर पर्यंत गेल्या. दरवाज्याच्या बाहेर आल्यावर त्या तिला एका बाजूने घेऊन गेल्या आणि म्हणाल्या.
” मनीषा…तू खूप समजदार वाटली आहेस म्हणून तुला हे सांगत आहे…तुझी सासू स्वभावाने खूप चांगली आहे ग…पण या वयात सुद्धा तिला घरातील कामे करावी लागत आहे…आता ते घर तुझं आहे…आणि जबाबदारी सुद्धा तुझीच आहे…त्या घराला सांभाळून घ्यायची…आता जरा माहेरच्या लोकांमधून लक्ष काढून स्वतःच्या संसारात लक्ष घाल…घरात वाद होऊ नयेत म्हणून तुझी सासू स्वतःहून घरातील सगळी कामे करते…पण हे तिचं वय नाही ना काम करायचं…”
साठे काकू काय बोलत आहेत हे मनिषाला कळतच नव्हते. तिने साठे काकूंना विचारले.
” काकू…तुम्ही काय बोलत आहात मला नीट कळलं नाही…जरा स्पष्ट सांगता का तुम्हाला काय बोलायचं आहे ते…”
” हेच की दिवसभर नुसतं लोळत पडल्यापेक्षा आणि फोन वर राहिल्यापेक्षा जरा घरातील कामात पण लक्ष देत जा…आणि तुझ्या नणंदेचा फार राग नको करत जाऊ…ती काय आयुष्यभर या घरात राहणार आहे का…आज ना उद्या तीचही लग्न होईल आणि ती पण जाईलच तिच्या घरी निघून…आपणच जरा सांभाळून घ्यावं…” साठे काकू म्हणाल्या.
आता मात्र मनिषाला धक्काच बसला होता. तिच्याबद्दल साठे काकू असा विचार का करत आहेत हा प्रश्न तिला पडला. तेव्हा तिने याबद्दल त्यांना विचारणा केली. त्यावेळी साठे काकूंनी तिला जे सांगितले ते ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिच्या सासुबाई नेहमीच बाहेर सगळ्यांना सांगायच्या की मनीषा घरातील एकही काम करत नाही. सगळं काही त्यांना आणि सुमेधाला करावं लागतं. मनीषा दिवसभर आपल्या माहेरच्या लोकांशी फोनवर बोलत असते. नाहीतर मग लोळत पडते. आणि नवरा आला की मग किचन मध्ये जाऊन काम केल्यासारखे करते म्हणून.
शिवाय सुमेधाचा घटस्फोट झाल्याने सतत तिला टोमणे मारणे सुरु असते. कुणाचाच आदर करत नाही. अशा एक ना अनेक गोष्टी तिला आज साठे काकूंकडून कळल्या होत्या. हे सगळं ऐकून तिला धक्काच बसला. कारण ज्या दिवशीपासून सुमेधा या घरात सून बनून आली होती त्या दिवसापासूनच तिने घराची सगळीच जबाबदारी स्वतःवर घेतली होती.
सुमेधा तर घरात एकही कामाला हात लावत नसे. पण मनीषा ने त्या बाबतीत कधीही तक्रार केली नाही. उलट सुमेधा ला सकाळपासून हवं नको विचारायची. सासूबाईंना तर सगळच वेळेवर नेऊन द्यायची. सासूबाईंना तर कुठल्याच कामाला हात सुद्धा लावू देत नसे. सासूबाईंचा प्रत्येक शब्द झेलला होता तिने.
आपल्या कुठल्याच वागण्याने सुमेधाला वाईट वाटू नये ह्याची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली होती. आणि या सगळ्याच्या बदल्यात तिला काय मिळाले होते. सासूबाईंनी स्तुती केली नसती तरीही चालले असते. पण निदान तिच्याबाबत असे तरी सांगायला नको होते असे तिला वाटून गेले. तरीपण तिने स्वतःला सावरले. तिचे मन म्हणाले की साठे काकू म्हणत आहेत ते सत्यच असेल हे कशावरून. म्हणून सध्यातरी काहीही न बोललेलेच बरे. स्वतःला सावरुन ती घरी आली.
साठे काकूंच्या बोलण्यात तथ्य असेल का..? मनीषा तिच्या सासूबाईंना जाब विचारेल का..? सुधिरचे याबाबत काय मत असेल…? हे पाहूया पुढील भागात…
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
Waiting for the next part
Nice this part
1st भागात आणि 2ऱ्या भागात सुद्धा मनीषा ऐवजी सुमेधा झालं आहे तरी ते सुधार करून पून्हा update करावं अशी सूचना। बाकी कथा चांगली आहे। आणि उर्वरित भाग लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आशा करतो।
एक विचारवंत
मिथुन यादव