पण एका क्षणी त्याच्या मनात विचार आला की प्रेमासाठी नाही तरी निदान सुमेधा ने आपल्याला जो त्रास दिलाय त्याची तिला परतफेड करण्यासाठी तरी पुन्हा एकदा तिला स्वतःच्या आयुष्यात घेऊन यावे. नेहमी नैतिक तेणे वागणारा निशांत आज थोडासा स्वार्थी झाला होता. प्रेम, राग,चीड अशा संमिश्र भावनांचा उद्रेक त्याच्या मनात होत होता. शेवटी त्याने त्याचा निर्णय घेतला.
त्याने सुधीर आणि मनिषाला होकार दिला. सुधीर आणि मनीषा खूप जास्त आनंदले होते. त्यांना तर अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते. निशांत ची आई सुद्धा मनापासून आनंदी होती. शेवटी त्यांनी इतके वर्ष दुनिया बघितली होती. सुमेधा बदललीय या गोष्टीवर त्यांना विश्वास होता. आणि निशांतचे तिच्यावर खूप प्रेम आहे हे सुद्धा त्यांना माहिती होते.
मनीषा आणि सुधीर आनंदातच घरी आले. पण घरी येताच त्यांच्या लक्षात आले की आपण अजून याबद्दल आईशी किंवा सुमेधाशी बोललेलो नाही. आता मात्र त्यांना खरी काळजी वाटायला लागली होती. सगळं त्यांना सांगणार तरी कसे. आणि त्या दोघी या सगळ्याला तयार होतील का ? असे एक ना अनेक प्रश्न होते.
खरे सांगायचे म्हणजे जेव्हा ते दोघे निशांत ला भेटायला गेले होते तेव्हा त्यांना माहिती नव्हते की त्याच्याकडून सकारात्मक उत्तर मिळेल. ते देखील इतक्या लवकर. त्यामुळे इतर गोष्टींचा विचार करायचा वेळच मिळाला नाही. पण आता लवकरात लवकर सुमेधा आणि आईला हे सांगणे गरजेचे होते.
सुमेधाला सांगायची जबाबदारी मनीषा ने स्वतःवर घेतली. आणि आईला दोघांनी मिळून समजावून सांगायचे असे ठरले.
एकदा सहज बाहेर बसलेल्या असताना मनीषा सुमेधा ला म्हणाली.
” ताई…एक विचारू का…?”
” विचार ना वहिनी…” सुमेधा म्हणाली.
” जर तुम्हाला आता एक संधी मिळाली निशांतच्या आयुष्यात पुन्हा जायची तर…?” मनीषा ने विचारले.
” काहीही काय बोलतेस…असे कधी होऊ शकते का…?” सुमेधा म्हणाली.
” अन् जर झाले तर तुम्ही तयार व्हाल का…?” मनीषा ने पुन्हा विचारले.
” नाही…” सुमेधा म्हणाली.
” पण का…?” मनीषा ने विचारले.
” कारण मी त्याच्या लायकीची नाही आहे…मी त्याच्या आयुष्यात गेल्यावर त्याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले…सगळं काही माझ्यामुळे झालंय…मी सगळे काही बिघडवून टाकले…” सुमेधा म्हणाली.
” आणि ते सगळं चांगली करायची संधी जर तुम्हाला मिळाली तर…?” मनीषा ने पुन्हा विचारले.
” तू हे जर तर काय करत आहेस ते मला कळत नाहीय…मला सगळं काही व्यवस्थित सांग की तुला काय म्हणायचं आहे…तुझ्या मनात काय आहे ते सांग…आणि निशांत आणि माझं पुन्हा काही होऊ शकतं असे तुला का वाटते…?” सुमेधा ने विचारले.
” कारण निशांतराव तुम्हाला पुन्हा स्वीकारायला तयार आहेत…?”
” काय…तू काय बोलत आहेस ते कळतंय का तुला…?”. सुमेधा म्हणाली.
” हो…मला कळतंय की मी काय बोलत आहे ते…” मनीषा म्हणाली.
” पण कसे…? हे सगळे तुला कसे माहीत…म्हणजे तुला कसं कळलं की त्याला मी त्याच्या आयुष्यात पुन्हा हवीय ते…तो भेटला होता का तुम्हाला…काही बोलला का तो माझ्याबद्दल…?” सुमेधाने विचारले.
” हो…आम्ही भेटलो होतो त्यांना…” मनीषा म्हणाली.
” आम्ही म्हणजे आणखी कोण…? आणि काय म्हणाला तो…?” सुमेधा ने अधिरतेने विचारले.
” मी आणि सुधीर आम्ही दोघेही निशांत रावांना भेटायला गेलो होतो…आम्ही त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली…तुम्ही आता पहिल्या पेक्षा किती बदलल्या ते देखील सांगितले…सुरुवातीला त्यांनी जरा आढेवेढे घेतले पण नंतर जेव्हा त्यांच्या आईने त्यांना होकार दिला तेव्हा त्यांनी सुद्धा ते मान्य केले…” मनीषा म्हणाली
” अगं पण तो तिरस्कार करतो माझा…तो कसा काय तयार होईल…तो झालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मला जबाबदार मानतो…इतकेच नाहीतर त्याला माझा चेहरा देखील पहायची इच्छा नव्हती…मग तो कसा काय तयार झाला…?” सुमेधा गोंधळून म्हणाली.
” ते तुमचा तिरस्कार नाही करत…?” मनीषा म्हणाली.
” अगं पण तू हे असे कशावरून म्हणतेस…?” सुमेधाने विचारले.
” कारण ज्या गाडी मुळे तुमचा अपघात झाला होता ती निशांतरावांची होती…तुम्हाला तसे जखमी झालेले पाहून ते खूप अस्वस्थ झाले होते…त्यानंतर बराच वेळ ते हॉस्पिटल मध्येच घुटमळत होते…सुधीर आणि माझ्यापासून लपून ते तुम्हाला पाहत होते…त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसून येत होती…त्यानंतर जोपर्यंत तुम्ही दवाखान्यातून परत आला नाहीत तोवर ते तिथेच थांबलेले होते…तिथे सुद्धा आडोशाला उभे राहून चोरून तुम्हाला पाहत होते…” मनीषा म्हणाली.
हे सगळे ऐकून सुमेधा काही वेळासाठी एकदमच शांत झाली. तिला काय बोलू आणि काय नको असे झाले होते. त्या दिवशी दिवसभर निशांत दवाखान्यातच होता हे समजल्याने तिला बरे वाटत होते. पण क्षणभर काहीतरी विचार करून ती मनिषाला म्हणाली.b
” अगं पण हे सगळं तो यासाठी सुद्धा करत असेल कारण त्याच्या गाडी मुळे माझा ॲक्सिडेंट होता…त्यावरून त्याचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे हे कसे सिद्ध होईल…?” सुमेधाने विचारले.
” कारण त्यांनी अजूनही दुसरे लग्न केलेले नाही…त्यांच्या आईंनी त्यांना खूप मुलींचे स्थळ सुचवले पण त्यांनी लग्नाला होकार दिला नाही… त्यांच्या रूम मध्ये अजूनही तुमच्या लग्नाचा फोटो लावलेला आहे…तुम्ही त्यांना गिफ्ट केलेली घड्याळ अजूनही त्यांच्या हातात असते…त्यांची आई सांगत होती की जेव्हा ती घड्याळ दिसत नव्हती तेव्हा त्यांचा जीव अगदीच कासावीस झाला होता…” मनीषा सांगत होती.
आणि सुमेधा अगदीच तल्लीन होऊन ऐकत होती. हे सगळं ऐकणे सुद्धा खूप चांगले वाटत होते तिला. आपले ज्याच्यावर प्रेम आहे त्याचे सुद्धा आपल्यावरच प्रेम आहे ही भावना असतेच सुखावह. आणि सुमेधासाठी तर ती अजूनच सुखावह होती कारण इतकं सगळं झाल्यावर तिला पुन्हा ते प्रेम खुणावू लागले होते. अचानक तिला काहीतरी आठवले आणि ती मनिषाला म्हणाली.
” मला खूप भीती वाटतेय ग वहिनी…मी त्याच्या समोरासमोर नाही जाऊ शकत…इतकं सगळं झाल्यावर त्याचा सामना कसा करू…आणि त्याच्या आईलाही कसे सामोरे जाऊ…मी किती वाईट वागले त्यांच्यासोबत…पूर्ण आयुष्य खराब केलं मी त्यांचं..माझ्याच्याने तर त्याच्या समोर सुद्धा जाणे होणार नाही…त्याच्या आयुष्यात जाणे तर दुरचेच…” सुमेधा हताशपणे म्हणाली.
” मग असे समजा की देवाने तुम्हाला ही एक संधी दिली आहे…सगळं काही नीट करायची…तुमच्या चुकांना सुधरवण्याची…तुमच्यामुळे आजवर जितकं दुःख त्यांना झालंय तेवढेच सुखाचे दिवस त्यांना दाखवा…यावेळेला अगदी मनापासून प्रयत्न करा…तुम्हाला नक्कीच जमेल…अशी संधी प्रत्येकाला नाही मिळत…नशिबाने ती संधी तुमच्या वाट्याला आली आहे…” मनीषा म्हणाली.
” तू खरं बोलतेयस वहिनी… जर मला एक संधी मिळत असेल तर की त्या संधीचे सोने करेन…त्याला आणि त्याच्या आईला सुखात ठेवेन…निशांतला इतकं प्रेम देईल की त्याला पुन्हा जुन्या गोष्टी आठवणारच नाहीत…” सुमेधा मनिषाला मिठी मारत म्हणाली.
तितक्यात तिथे वृंदाताई आल्या आणि या दोघींना म्हणाल्या.
” काय बोलत आहात तुम्ही…की निशांतचे नाव ऐकले…तुम्ही त्याच्याबद्दल बोलत होतात का…?”
” नाही आई…आम्ही तर वेगळ्या विषयावर बोलत होतो…” मनीषा विषय टाळत म्हणाली.
” बरं आहे…त्याच नाव सुद्धा ऐकण्याची इच्छा नाही आहे माझी या घरात..त्याने खूप दुःख दिलंय माझ्या मुलीला… हिचं काहीच ऐकलं नाही त्याने…इतकंच नाही तर हिचं बाळ गेल्यावर हिला धीर देण्याऐवजी हीच्यावरच आरोप केलेत…अगदी माझ्या जिवंतपणी तरी मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही…” वृंदाताई म्हणाल्या.
यावर सुमेधा आवेशात येऊन आईला काहीतरी बोलणार इतक्यात मनीषा ने डोळ्यांनीच तिला आता काहीही न बोलण्याचा इशारा केला आणि दोघी जणी गप्प बसल्या. आता वृंदाताईंना समजावून सांगणे तर भाग होते. कारण काहीही झाली तरी सुमेधा त्यांची मुलगी होती. त्यांच्या मर्जी विरूध्द काही करणे योग्य ठरलेच नसते. त्यांच्या आशीर्वादा शिवाय सुमेधा सुखी कशी झाली असती.
मग मनीषाने आपले सुपीक डोके इथेही वापरले. सुमेधा आणि सुधीरला आपली योजना समजावून सांगितली. सुरुवातीला त्यांना ही योजना जरा जोखमीची वाटली. पण नंतर दोघे ही तयार झाले. आणि मनीषाचे नाटक सुरू झाले.
मनीषा आता रोज काही ना काही विषय काढून सासूबाईंशी भांडण करायची. गरोदरपणात चिडचिड होते म्हणून वृंदा ताई काहीच बोलायच्या नाहीत. पण मनीषा ची चिडचिड जरा वाढतच जात होती. अगदी थोड्याशा गोष्टीवरून सुद्धा वाद घालायची. भाजीत मीठ नाही आहे. तुम्ही मुद्दामहून माझ्या नावडत्या भाज्या करता. तुम्हाला माझी अजिबात काळजी वाटतं नाही. वगैरे वगैरे.
एके दिवशी सासूबाईंनी सुधीर आणि सुमेधाला चहा दिला. तितक्यात मनीषा तिथे आली. त्यांना पाहून मनीषा म्हणाली.
” आई…मला सुद्धा चहा हवाय…”
” थांब तू इथेच… मी काहीच चहा ठेवते तुझ्यासाठी…” वृंदा ताई म्हणाल्या.
” आता ठेवणार आहात म्हणजे ह्या दोघांच्या चहा सोबत माझ्या चहा नाही ठेवला तुम्ही…” मनीषा म्हणाली.
” अगं तू रूम मधून बाहेर आली नव्हतीस…मला वाटलं आराम करत असशील…म्हणून नाही ठेवला…” वृंदा ताई म्हणाल्या.
झालं. मनिषाला एवढंच कारण पुरलं. तिने तिथेच सासुबाईशी भांडायला सुरुवात केली. तुम्ही मला तुमच्या घराचा सदस्य मानतच नाही. आणि बरेच काही बोलली. सुधीर आणि सुमेधा तर नवलाने तिच्याकडे पाहतच राहिले. वृंदाताई मात्र एकदमच आश्चर्यचकित झाल्या. कारण मनीषाचे हे रूप त्यांच्यासाठी नवीनच होते. त्या काहीच बोलल्या नाहीत. यावर मनीषा म्हणाली.
” बघितलं तुम्ही सुधीर…ह्या काहीच बोलत नाहीयेत माझ्याशी…माझ्या प्रश्नाचं उत्तर देखील देत नाही आहेत ह्या…तुम्ही तर आईच्या पुढे काहीच बोलत नाही आहात…हे काही चालणार नाही…मी यांच्यासोबत एकत्र नाही राहू शकत…आपण वेगळे राहू यांच्यापासून…”
मनीषाने असे म्हटले आणि वृंदाताईंना धक्काच बसला. एवढीशी गोष्ट असे रूप घेईल असे त्यांना वाटले नव्हते. त्या मनीषाला म्हणाल्या.
” अगं मनीषा…एवढ्याशा गोष्टीसाठी तू वेगळं राहायचे म्हणत आहेस…तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते…या वयात माझ्यापासून माझ्या मुलाला तोडणार आहेस का तू…अगं माझी पण इच्छा आहे की मी माझ्या मुलासोबत, सूनेसोबत आणि नातवांसोबत राहावं म्हणून…आणि सुधीर तू का काहीच बोलत नाही आहेस… तुला पटतय का हिचं म्हणणं…काहीतरी बोल ना हिला…”
” अगं पण आई…ती प्रेग्नेंट आहे…मला तिचे ऐकायलाच हवे… ती काळजीत राहिली तर या गोष्टीचा आमच्या बाळावर सुद्धा वाईट परिणाम होईल ना…” सुधीर म्हणाला.
” अरे या दिवसा साठी तुला इतके मोठे केले का मी…बायकोचे ऐकून आई पासून वेगळं राहायला तयार होत आहेस तू…हेच पांग फेडलेस आईचे… तू कशी इतका वाईट वागशील असे नव्हते वाटले मला…” वृंदाताई आवेशात येऊन म्हणाल्या.
मग मनीषा समोर आली आणि म्हणाली.
” तुमचा मुलगा त्याच्या बायकोचे ऐकून वेगळं राहायला तयार आहे तर तो वाईट मुलगा झाला…आणि तुम्ही जेव्हा निशांतरावांसमोर ही अट ठेवली होती की त्यांनी त्यांच्या आईला वृद्धाश्रमात ठेवले नाही तर तुम्ही सुमेधाचे अबोर्शन कराल ते काय होते…तेव्हा तुम्ही काय चांगला सल्ला दिला होतात का त्यांना…आज ह्यांनी माझे ऐकले तर हे वाईट झाले आणि त्या वेळी निशांत रावांनी तुमची ही अट मान्य केली नाही तर ते वाईट झाले होते…स्वतःच्या सूनेसाठी वेगळा न्याय आणि मुलीसाठी वेगळा…नाही का…?” मनीषा म्हणाली.
तसे सासूबाईंनी चमकून तिच्याकडे पाहिले.
क्रमशः
मनीषाच्या अशा वागण्याचे कारण काय असेल…?” सासूबाईंना त्यांची चूक लक्षात येईल का…? सुमेधा आणि निशांत पुन्हा एकत्र येऊ शकतील का…?” हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.