आईचे बोलणे ऐकून पराग ला जरा आश्चर्यच वाटले. कारण आईला ह्याचे सुद्धा वाईट वाटू शकते ह्याचा विचार त्याने केलाच नव्हता. परागला वाटले की आपण पल्लवी साठी नवीन मंगळसूत्र केल्याचा आईला आनंदच होईल.
” मी तिच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेणार हे तिलाही माहिती नव्हतं आई…मला तुला सरप्राइज द्यायचं म्हणून मी ऐन वेळेला दुकानात गेल्यावर सांगितले तिला…” पराग म्हणाला.
” हे असे सांगायचे पण तिनेच शिकवले असेल तुला…आणि तुझ्या बहिणीच्या लग्नात तिला सोनं करायला तुझ्याकडे पैसे नव्हते आणि आता बरे पैसे आलेत बायकोसाठी सोने करायला…” आई म्हणाली.
” अग आई तेव्हा खरेच पैसे नव्हते माझ्याकडे…असते तर मी तिच्यासाठी काही कमी केलं असतं का…आता थोडे पैसे हातात आले होते म्हणून पल्लवी साठी मंगळसूत्र खरेदी केलं मी…स्नेहाच्या लग्नात पल्लवी ने स्वतःच मंगळसूत्र दिलं तेव्हाच मी ठरवलं होतं की पैसे आल्यावर पल्लवी साठी एक छानसे मंगळसूत्र करायचे म्हणून…म्हणून मग काल तिला सरप्राइज दिलं…” पराग ने आईला स्पष्टीकरण दिलं.
” मग करायचं च होतं तर दोघींनाही एक एक तोळ्याचा दागिना बनवून द्यायचा असता ना…तुला मात्र हल्ली बायकोच्या पुढे काहीच दिसत नाही…आणि मंगळसूत्र दिलं म्हणून काही मोठं काम नाही केलं…संसार म्हटलं की बायकांचं कर्तव्यच असतं ते…मी काय काही कमी केलंय का आमच्या वेळी…” आई रागानेच म्हणाली.
” माझ्याकडे पैसे आले की मी स्नेहासाठी सुद्धा एखादा दागिना बनवून देईल आई…पण तू नाराज नकोस होऊ…” पराग आईला समजावत म्हणाला.
आई मात्र रागातच होती. ती काहीच बोलली नाही. मग पराग हळूच तिच्या खोलीतून निघून गेला. त्या दिवशीपासून मात्र पराग ची आई पल्लवीशी फटकून वागायला लागली. तिच्या कामात चुका काढायला लागली. तिच्या हातचे जेवण आईला गोड वाटत नव्हते. आपल्या आईसारख्या सासुबाई अचानक अशा वागायला लागल्यावर मात्र पल्लवीला खूप दुःख होत होते. तिला वाटत होते की उगीच नवीन मंगळसूत्र घेतले. पराग मात्र हे सर्व नुसतं पाहत होता. ह्या दोघी सासू सूनांमधील अबोला आता त्यालाही सहन होत नव्हता.
अशातच एके दिवशी स्नेहा माहेर पणासाठी म्हणून काही दिवसांसाठी घरी आली. स्नेहा आणि पल्लवीचे एकमेकांशी चांगले पटत असे. आई आणि पल्लवी वहिनीमध्ये अबोला आहे स्नेहाने ओळखले होते. स्नेहाने आईला समजावून देखील सांगितले पण आई मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती. म्हणून मग स्नेहाने आईला काही दिवस तिच्या घरी राहायला ये असा हट्ट केला. आईलाही आता काही दिवसांसाठी कुठेतरी जावं असं वाटत होतं म्हणून मग आईसुद्धा तयार झाली. सुजय स्नेहा आणि आईला घ्यायला आला आणि दोघीही तिच्या घरी गेल्या.
स्नेहाच्या घरचे वातावरण खूप चांगले होते. घरी प्रत्येकाचा स्वभाव सुद्धा खूप चांगला होता. स्नेहाच्या सासुबाई आणि तिची आई तर चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. स्नेहाची नणंद सुद्धा स्नेहाला खूप मान द्यायची. आपल्या मुलीचा सुखाचा संसार पाहून स्नेहाच्या आईला खूप समाधान वाटले. अशातच एके दिवशी स्नेहाचा वाढदिवस होता. स्नेहाच्या वाढदिवसा निमित्त तिच्या घरच्यांनी खूप छान तयारी केली होती.
वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर सुजयने स्नेहाला एक छानसे गिफ्ट दिले. आतमध्ये नाजुकशी सोन्याची चेन होती. गिफ्ट उघडुन पाहिल्यावर स्नेहाला खूप आनंद झाला. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात एक विचार आला. तीने सुजयला एका बाजूला नेले व म्हणाली.
” गिफ्ट तर खूप छान आहे…पण मागच्याच महिन्यात अमृताचा ( स्नेहाची नणंद ) वाढदिवस होता तेव्हा तिच्यासाठी तुम्ही सोन्याचं काहीच नाही आणलं…आणि माझ्यासाठी चेन आणली… तिला वाईट वाटेल ना…तुम्ही आमच्या दोघिंसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायला पाहिजे होते…” स्नेहा म्हणाली.
” तुझं बरोबर आहे स्नेहा…मी ह्याचा विचारच केला नाही बघ…तिला लहान समजून नेहमीच तिला छोटे गिफ्ट आणतो मी…पण आता ती खरंच मोठी झालीय…मी उद्या अशीच एक चेन तिच्यासाठी पण आणतो…” सुजय म्हणाला.
सुजय आणि स्नेहाचे हे बोलणे तिच्या आईने ऐकले होते. किंबहुना तिला ऐकायला जाईल याच उद्देशाने स्नेहा मुद्दाम हून तिच्या जवळ जाऊन बोलली होती.
वाढदिवसाचा कार्यक्रम संपला आणि स्नेहाची आई स्नेहाच्या खोलीत आली आणि म्हणाली.
” काय ग स्नेहा… सुजयरावांनी इतकी छान चेन आणली तुझ्यासाठी आणि तू मात्र खुश व्हायच्या ऐवजी त्यांना आणखी खर्च करायला लावत आहेस… अमृताचा वाढदिवस होऊन गेलाय ना…आणि तिला वाईट वाटत नाहीये तर तू कशाला मनाला लावून घेत आहेस.. काहीही झाले तरी तुझी नणंद आज ना उद्या परक्यांच्या घरात नांदायला जाणार आहे…पण तू इथली मालकीण आहेस…तू तर उलट सगळं काही स्वतःसाठी करायला पाहिजेस…मी तर म्हणते सांग जवाईबापुंना की राहुद्या म्हणावं तिच्यासाठी चेन आणायचं…” आई म्हणाली.
” हे छान आहे ग आई तुझं…तुझ्या मुलीसाठी एक न्याय आणि सुनेसाठी दुसरा…तुझ्या मुलाने त्याच्या बायकोसाठी काही आणले तर तुला किती वाईट वाटले…कितीतरी दिवसांपासून वहिनिशी बोलत सुद्धा नाही आहेस तू…आणि मला म्हणतेस नणंद परक्यांच्या घरी जाणार आहे म्हणून सगळं मीच ठेवू…” स्नेहा म्हणाली.
” हो…मी असाच विचार करणार कारण काहीही झाले तरी तू माझी मुलगी आहेस…” आई म्हणाली.
” सून आणि मुलगी यात तू फरक केलास आई पण वहिनीने कधीच तुला अंतर दिले नाही…नेहमी आईच मानले तुला…मुलगी बनून सगळं काही केलं…इतकंच नाही तर तिच्या माहेरच्यांनी तिच्या लग्नात तिला दिलेलं चार तोळ्याच मंगळसूत्र माझ्या लग्नासाठी विकलं…इतकं कोण करत ग आई आजच्या काळात…पण तू मात्र तिची आई बनू शकली नाहीस आई…सासू म्हणजे सासुसारखच वागली तिच्याशी…” स्नेहा म्हणाली.
” ते तिचं कर्तव्यच होतं…आता ती त्या घरची सून आहे आणि सुनेला सासरच सगळं करावं लागतं…आम्ही नाही का केलं…” आई म्हणाली.
” वहिनीने हे सगळं कर्तव्य भावनेतून नाही केलं तर आपल्या सर्वांना आपलं मानून केलं…तुला आई मानलं आणि बहिणीसारख…बाबा आजारी असताना बाबांचं अंथरूण सुध्दा साफ केलंय ग तिने…आणि तुझ्या वेळी तर तू आत्यांना कधीच महागात ली साडी सुद्धा घेऊ दिली नाहीस बाबांना…स्वतःच जाऊन त्यांच्यासाठी अगदी साध्यातल्या साड्या घेऊन यायचीस…
त्यांना साधं किचन मध्ये जाऊन चहा करून पिण्याची सुद्धा उजागरी नव्हती…पण वहिनी ने मला ह्याची कधी जाणीव सुद्धा होऊ दिली नाही…ना तुला कधी साध्या शब्दाने दुखावलं…दादाने सुद्धा बाबांच्या नंतर घर किती चांगलं सांभाळलं…बाबांच्या आजारपणात दादावर कर्ज झालं होतं हे पण तुला माहिती आहे ना… तसही मला इथे काहीच कमी नाही…मग आता जेव्हा त्याच्याजवळ थोडे पैसे आले आणि त्याने त्याच्या बायकोसाठी दागिना केला तर काय बिघडलं…शेवटी त्यांचा सुध्दा स्वतःचा संसार आहेच की…
तू तर त्याच्याशी सुद्धा नीट बोलत नाही आहेस…तुला नशिबाने इतकी चांगली सून मिळाली आहे…तिची कदर कर…तिला जीव लावशील, तिला मुलगी समजशिल तर ती सुद्धा तुला कधीच अंतर देणार नाही…पण अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला घेशील तर नात्यात कडवटपणा आल्याशिवाय राहणार नाही…” स्नेहा म्हणाली.
स्नेहाच्या बोलणे ऐकुन तिच्या आईला मनापासून वाईट वाटले. आजवर पल्लवी ने त्यांची केलेली सेवा आठवली. परागच्या बाबांच्या आजारपणात केलेली सुश्रुषा आठवली. स्नेहाच्या लग्नात किती जबाबदारीने वागली होती पल्लवी. खरंच आपण किती चुकीचे वागलो तिच्याशी हे सुद्धा आता त्यांना कळले होते. त्यांना आता त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता. त्या स्नेहाला म्हणाला.
” खूप मोठी झालीस ग…आज तू तुझ्या आईचे डोळे उघडले बघ…नाहीतर माझ्या अशा वागण्याने मी माझ्या मुलापासून आणि सूनेपासून कायमची दुरावले असते…खरंच ती किती चांगली आहे हे माझ्या कधी लक्षातच आले नाही…मी आयुष्यभर फक्त स्वतःचाच विचार केला ग…ना कधी माझ्या नणंदा चा विचार केला ना कशी भावजयींचा विचार केला…पण तू मात्र समजदार निघालीस…एका लहानशा गोष्टीमुळे खरंच किती दुस्वास केला मी पल्लवीचा…पण माझी चूक आता माझ्या लक्षात आलीय…मी यापुढे अशी खरंच नाही वागणार…मला आता माझ्या घरी जायचं आहे…तू पराग ला सांग मला घ्यायला ये म्हणून…” आई म्हणाली.
आईला तिची चूक लक्षात आली ह्याचा स्नेहा खूप आनंद झाला. तिने लगेच तिच्या दादाला फोन करून घरी बोलावून घेतले. स्नेहाच्या घरच्यांचा निरोप घेऊन आई घरी आली. आईने घरी आल्यावर पल्लवीला जवळ बोलावून तिची माफी मागितली. सासुबाई पुन्हा आपल्याशी बोलायला लागल्या ह्याचा पल्लवीला खूप आनंद झाला. दोघी सासू सूना पूर्वीप्रमाणे वागायला लागल्या. पराग मात्र मनातून स्नेहाचे आभार मानत होता कारण ह्या सासू सुनांचे मनोमिलन दोघा बहीण भावांच्या आयडिया मुळेच तर झाले होते.
आपल्याला जीव लावणाऱ्या व्यक्तीला वेळीच ओळखावे. त्याची किंमत वेळीच जाणावी. एकदा का नात्यात दुरावा आला की पुन्हा ते नाते पूर्वीप्रमाणे होईल ह्याची शाश्वती देता येत नाही.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
खुपच छान आणि हृदयस्पर्शी