घराबाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. त्या सरशी आशाताईंनी किचन मधला खिडकीतून बाहेर पाहिले. वसंतरावांसोबत निशा सुद्धा आली होती. तिला पाहून आशाताईंना आता काळजी वाटायला लागली होती. एरव्ही निशा नेहमीच सासरहून भांडून माहेरी यायला लागली होती. आजही ती जरा धुसफूस करतच घरात आली. आशाताई दोघांसाठी पाणी घेऊन दिवाणखान्यात आल्या. निशाकडे पाहून म्हणाल्या.
” निशा…तू अशी अचानक…?”
निशा काही बोलेल त्या आधीच वसंतराव म्हणाले.
” अचानक म्हणजे काय…? तिचं घर आहे…ती कधीही येऊ शकते… तिला काय तुमच्या परवानगीची गरज आहे का घरी यायला…?”
” तसं नाही…पण तुमच्यासोबत आलीय… जावईबापू सुद्धा नाहीयेत सोबत…म्हणून जरा काळजी वाटली…” आशाताई जरा चाचरत म्हणाल्या.
” तुमची काळजी तुमच्याजवळ ठेवा…आणि तुम्हालाच तुमच्या जावईबापुचा मोठा पुळका आहे…त्याला तर आमच्या मुलीची काहीच परवा नाही…तिचा योग्य मान राखता येत नाही…” वसंतराव मोठ्याने म्हणाले.
” तसं नाही…त्यांना सुद्धा घरच्या मोठ्या माणसांची मर्जी राखावीच लागते…आणि संसार म्हटलं की तडजोड ही आलीच…” आशाताई म्हणाल्या.
” तडजोड…अन् आमची मुलगी…कधीच नाही…ते शक्यच नाही… लहानपणीपासून लाडाकोडात वाढलेली आहे ती…तिने जिकडे बोट दाखवलं ते सगळचं मिळालंय तिला…तिने का म्हणून तडजोड करायची…” वसंतराव मोठ्याने म्हणाले.
” जाऊद्या बाबा…आईला काही कळणार नाही…तिला समजूनच घ्यायचं नसतं मुळात…सतत तडजोडीची भाषा करते…” निशा म्हणाली.
आशाताई यावर काही बोलणार इतक्यात वसंतरावांनी रागाने त्यांच्याकडे पाहिले. मग त्या ही फार काही न बोलता तिथून किचनमध्ये निघून गेल्या.
निशा ही आशाताई आणि वसंतरावांची थोरली लेक. म्हणजे त्यांचं पहिलं अपत्य. निशानंतर पाच वर्षांनी निशांत चा जन्म झाला. निशा तिच्या वडिलांनी खूपच लाडकी होती. लहानपणीपासूनच वसंतरावांनी तिचे प्रत्येक लाड पुरवले होते. तिला हवं ते सगळंच तिला आणून दिलं. त्यामुळे ती काहीशी हेकेखोर, हट्टी झाली होती.
मोठी होता होता तर ती एखाद्या गोष्टीसाठी पार हट्टाला पेटायची. वसंतरावांना मात्र मुलीच्या या वागण्याचं कौतुकच वाटायचं. आशाताई तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करायच्या पण ती आईचं अजिबात ऐकायची नाही. उलट आई आपल्याला समजूत घेत नाही म्हणून तिच्यातला अन् आईतला दुरावा वेळेबरोबर वाढतच गेला.
बाबा मात्र तिचा हट्ट पुरवायला मागे पुढे बघायचे नाहीत. घरी सुध्दा सगळं काही करताना तिचंच मत विचारात घेतलं जाई. अगदी स्वयंपाकात काय करायचं त्यापासून घराला कोणता रंग द्यावा इथवर तिचंच ऐकलं जायचं. याउलट निशांत मात्र खूप समजूतदार होता.
घरी श्रीमंत असूनही त्याला ह्याचा अजिबात गर्व नव्हता. तो मित्रांमध्ये मिळून मिसळून राही. घरी केलेला स्वयंपाक आवडीने खाई. अन् हट्ट तर त्याने क्वचितच कधीतरी केला असेल. निशा मात्र त्याच्या अगदीच उलट.
आशाताईंना सतत काळजी वाटून राहायची. निशाचे पुढे कसे होईल, सासरी गेल्यावर निशाच्या मनाप्रमाणे सगळं नाही झालं तर काय होईल ह्याची त्यांना सतत चिंता लागून राहायची.
निशाच्या कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी तिची भेट साकेतशी झाली. मुळातच साधा, सरळ असणाऱ्या साकेतचे व्यक्तिमत्त्व मात्र खूप प्रभावी होते. स्वभावात स्थिरपणा होता. बोलायला लाघवी होता. अभ्यासात हुशार होता. प्रत्येकाच्या अडी अडचणीला धावून जायचा.
सगळ्यांना तो खूपच आवडायचा. विशेषकरून कॉलेजमधील मुलींना. निशा सुद्धा त्याच्या प्रेमात पडलीच. ती कॉलेजमध्ये त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला लागली होती. हळूहळू त्यालाही ती आवडायला लागली. त्याला भेटल्यावर, त्याच्या प्रेमात पडल्यावर तिचा स्वभाव आता हळूहळू बदलायला लागला होता. तिचा हट्टीपणा आता जरा कमी व्हायला लागला होता.
निशाला साकेतशी लग्न करायचे होते. कॉलेज संपताच तिने तसे तिच्या वडिलांना सांगितले सुद्धा. वसंतरावांना सध्या निशाचे लग्न करायचे नव्हते. त्यांना वाटायचे की निशाने आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे. आपल्या करिअर कडे लक्ष द्यावे. मगच लग्न करावे. पण निशा मात्र आता काहीच ऐकायला तयार नव्हती.
निशा किती हट्टी आहे हे त्यांना माहीतच होते. म्हणून त्यांनी एकदा साकेतला भेटायचे ठरवले. निशा ने आनंदातच साकेत ला घरी यायचे आमंत्रण दिले. साकेत वसंतरावांनी भेटायला त्यांच्या घरी आला. आशाताईंना साकेत चांगला मुलगा वाटला होता.
स्वभावाने सुद्धा शांत आणि समजूतदार होता. शिवाय त्याला भेटल्यापासून निशाच्या स्वभावात सुद्धा खूप फरक पडला होता. पण वसंतरावांना मात्र तो फारसा पसंत पडला नव्हता. कारण म्हणजे त्याच्या घरच्या मानाने वसंतराव जरा जास्त श्रीमंत होते. आणि दुसरं म्हणजे त्याच्या घरी भलामोठा एकत्र परिवार होता.
साकेत चे आजी आजोबा, आई बाबा, दोन मोठे भाऊ अन् वहिनी अन् मोठ्या वहिनीची लहान मुलगी सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहायचे. निशा इतक्या मोठ्या परिवारात राहावी हे वसंतरावांना योग्य वाटत नव्हते. त्यांच्या मते अशा घरात त्यांची मुलगी कामाच्या ओझ्यात दबून जाईल.
पण निशा मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती. शेवटी वसंतराव तयार झाले. साकेत आणि निशाचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. लग्न करून निशा भल्यामोठ्या कुटुंबातील धाकटी सून म्हणून आली. साकेतच्या घरच्यांनी निशाचे खूप कोडकौतुक केले.
निशाच्या दोन्ही मोठ्या जावा तिच्याशी खूप चांगल्या वागायच्या. सासू आजेसासू तिच्या बारीकसारीक गोष्टींचे कौतुक करायच्या. मोठे दिर तिच्याशी आदराने बोलायचे. साकेतला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे व्हायचे. साकेतचे प्रेम पाहून निशा हरखून जायची पण त्याच्या घरच्यांचे प्रेम तिला नाटकी वाटायचे.
त्यांचे प्रेम पाहून त्याबद्दल कृतज्ञ राहण्याऐवजी निशाला वाटायचे की आपण माहेरी श्रीमंत आहोत अन् लग्नात खूप सोनंनाणं घेऊन आलोत म्हणून हे सगळे आपली एवढी काळजी घेतात. सतत मागेपुढे करतात. वसंतराव सुद्धा दर दोन दिवसांनी निशाला भेटायला जात. जाताना तिच्यासाठी महागड्या भेटवस्तू घेऊन जात.
हळूहळू निशा सगळ्यांशी फटकून वागायला लागली. त्यांच्यासमोर आपल्या श्रीमंतीचा देखावा करायला लागली. दोन दिवसाआड साकेत ला घेऊन बाहेर फिरायला जायची नाहीतर दिवसभर स्वतःच्या खोलीत राहायची. फक्त जेवण आणि नाश्ता सगळ्यांसोबत करायचा म्हणून खाली यायची.
साकेतला तिच्या वागण्यातला बदल हळूहळू दिसायला लागला होता. पण नवीन जागेत रमायला हळूहळू वेळ लागेल म्हणून साकेतने दुर्लक्ष केले. साकेतने दुर्लक्ष केल्याने निशाला वाटायला लागले की त्याचा आपल्या अशा वागण्याला पाठिंबा आहे म्हणून. निशा अजूनच तोडून वागायला लागली.
एके दिवशी संध्याकाळी ती किचन मध्ये गेली आणि तिच्या मोठ्या जावेला म्हणाली.
” जाऊबाई…माझा अन् साकेत चा दोन वेळचा चहा आजपासून माझ्या खोलीतच देत जा…”
” अगं पण खोलीतच का…? सगळ्यांच्या सोबत इथे हॉल मध्येच घेत जा की…” जाऊबाई सहजपणे म्हणाल्या.
” तुम्हाला जेवढं सांगितलं ना तुम्ही तेवढंच करा…बाकी माझं मला चांगलंच समजतं…” निशा फणकाऱ्याने म्हणाली.
तिच्या जाऊबाईला तिची बोलण्याची पद्धत अजिबात आवडली नव्हती. ती निशाला काही म्हणेल त्या आधीच दारात उभा असलेला साकेत म्हणाला.
” निशा…ही काय बोलायची पद्धत झाली का…? तू वहिनी सोबत अशी कशी बोलू शकतेस…? माफी मग वहिनीची…”
साकेत जाऊबाईसमोर तिला असं ओरडल्याने तिला अपमानित झाल्यासारखे वाटले. ती तणतणत स्वतःच्या खोलीत निघून गेली. साकेतला तिचे वागणे अजिबात आवडले नव्हते. तो वहिनी जवळ येऊन म्हणाला.
” वहिनी…मला माफ करा…मी निशाला आधीच समजावून सांगायला पाहिजे होते…”
” जाऊद्या भाऊजी…तुम्ही माझ्या बाजूने तिला बोललात ह्यातच माझ्यासाठी सगळं आलं…”
त्यानंतर साकेत सरळ त्याच्या खोलीत गेला आणि निशा कडे पाहून म्हणाला.
” निशा…तू कशा पद्धतीने बोललीस वहिनीसोबत…तू अशी काही बोलू शकतेस त्यांना…आणि चहा खोलीत आणून प्यायची काय गरज आहे…?”
” काय गरज आहे म्हणजे काय…? मला तुझ्यासोबत बसून तुझ्याशी गप्पा करत चहा प्यायचा होता म्हणूनच म्हटलं ना मी…तिथे सगळ्यांसमोर मोकळं नाही बोलता येत…” निशा म्हणाली.
” मग काय इतर वेळी नाही का बोलता येत…? आणि तुला काहीही सांगायचं असेल तर ते सांगण्याची एक योग्य पद्धत असते…” साकेत म्हणाला.
” तुला मी चहा खोलीत पाठवायला सांगितला ते दिसतंय…आणि तू माझ्याशी कसा बोललास त्यांच्यासमोर ते विसरलास…हे बघ…मला असं कुणाचं काही ऐकून घ्यायची सवय नाही…” निशा तनक्याने म्हणाली.
” तू जर समोरच्या व्यक्तीशी चांगली बोललीस तर तुझ्याशी सुद्धा सगळे चांगलेच बोलतील…पण तुझी आजची बोलण्याची पद्धत खूपच वाईट होती…” साकेत म्हणाला.
” मी एवढं काहीच जास्त बोललेली नाहीये…तू उगाच छोट्याशा गोष्टीचा बाऊ करतो आहेस…” निशा रागाने म्हणाली.
त्यानंतरही साकेतने बराच वेळ तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी साकेत बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने तो घरी परत आला तेव्हा त्याला घरच्यांनी सांगितले की निशा चे वडील घरी आले होते आणि निशा कोणालाही काहीही न सांगता सरळ त्यांच्यासोबत घरी निघून गेली म्हणून.
क्रमशः
भाग २ –
तुझ्याविना मी – भाग २
भाग – ३
तुझ्याविना मी – भाग ४
भाग -४
तुझ्याविना मी – भाग ४
भाग ५ –
तुझ्याविना मी – भाग ५
भाग ६ –
तुझ्याविना मी – भाग ६
भाग ७ –
तुझ्याविना मी – भाग ७
भाग ८ (अंतिम भाग) –
तुझ्याविना मी – भाग ८ ( अंतिम भाग)
निशाच्या या स्वभावामुळे तिच्या आणि साकेतच्या नात्यात दुरावा येईल का…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका. आणि अशाच मराठी कथा वाचण्यासाठी मितवा या पेज ला फॉलो करायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.