नंदिनीच्या आईला सुद्धा हा काय प्रकार आहे ते कळत नव्हतं. मुलगा तब्येतीने खूपच बारीक होता. शिवाय तो दारूत आहे हे दुरूनच समजत होतं. नंदिनीच्या आईने तिच्या वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतला प्रश्न प्रकाशरावांना चांगलाच कळला होता. त्यांनी नजरेनेच उषाताईंना प्रतिसाद दिला आणि सांगतो म्हणाले. नंदिनीची आई तिच्या बाबांकडे जायला निघाली.
इकडे नंदिनी पाय धुण्याच्या विधी साठी समोर ठेवलेल्या चौरंगावर बसली. नवरदेव अगदी बाजूलाच बसला होता. आता नंदिनीने एक नजर उचलून त्याला पुन्हा पाहिले. नंदिनी जेव्हा नवरदेवाच्या समोर आली तेव्हा तिचं सौंदर्य पाहून तो पुरता घायाळ झाला होता. आधीच दिसायला सुंदर त्यात हा नवरीचा साज शृंगार. तिला पाहताच तो तिला हळूच म्हणाला.
” एकदम अप्सरा दिसते आहेस तू…”
आणि त्या सरशी त्याच्या तोंडातून दारूचा वास तिच्यापर्यंत पोहचला. तिला तर आधीच त्याच्याकडे पाहायची सुद्धा इच्छा होत नव्हती आणि तो मात्र तिच्याशी बोलायचा बहाणा शोधत होता. तो तिला पुन्हा म्हणाला.
” बोल ना राणी…”
नंदिनीला खूप जास्त किळसवाणे अनेक अगतिक झाल्यासारखे वाटत होते. आयुष्यात असाही प्रसंग येईल ह्याचा तिने कधी विचारच केला नव्हता. आई वडिलांच्या निर्णयावर डोळे झाकून विश्वास केल्याचं हे फळ मिळणार होतं का तिला. आणि आईबाबा इथेच आहेत तर हे सगळं पाहून काही करत का नाहीयेत याच आश्चर्य सुद्धा वाटलं.
नवरदेवाच्या एका भावाने नंदिनी चे पाय धुतले आणि सोबत आणलेले लग्नाचे दागिने व साडी तिला सुपूर्द केली. ते सगळं तिच्या मैत्रिणीच्या हातात दिलं. आता नंदिनी ला मांडवातून पुन्हा एकदा घरात जाऊन ती लग्नाची साडी आणि दागिने परिधान करायचे होते. ती नवरी असल्याने तिने खाली मान घालून हळूहळू चालत घरात जायचे आणि सोबतच्या मैत्रिणीने तिच्या मागे चालायचे असे अपेक्षित होते.
पण नंदिनीच्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती आणि तिला काहीच न सुचल्याने ती लग्न मंडपातून भरभर निघून सरळ तिच्या घरात जायला निघाली. सुरुवातीला तर काय होतंय हे कोणालाच कळलं नाही. आणि सगळं काही समजेपर्यंत नंदिनी घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहचली सुद्धा होती. शालू आत्याने तिला आवाज दिला पण तिने मागे वळून सुद्धा पाहिले नाही.
तिची आई लगेच तिच्या मागोमाग आता आली. त्यानंतर जवळ जवळ घरातील सगळेच आत यायला लागले. नंदिनीची आई तिला म्हणाली.
” काय झालं नंदिनी…? तू अक्षरशः धावतच मंडपातून घरात का आलीस…?”
” मला नाही करायचं त्यांच्याशी लग्न…” नंदिनी रडतच म्हणाली.
उंबरठ्यातून आत येत असणाऱ्या तिच्या वडिलांनी तिचं हे बोलणं ऐकलं आणि त्यांच्या काळजात एकदमच धस्स झालं. नंदिनीच्या आईने हळू आवाजात तिला म्हटले.
” काय बोलत आहेस नंदिनी…हळू बोल…सगळे ऐकतील…”
” ऐकू दे ऐकायचं असेल तर…मला हे लग्न नाही करायचं…तो खूप जास्त दारू प्यायला आहे…त्याचे डोळे खूप भीतीदायक वाटले आई मला…मला नाही करायचं त्याच्याही लग्न…” नंदिनी डोळ्यात पाणी आणून विनवत होती.
” अगं ए…काय बोलत आहेस तू… तुझं तुला तरी कळतंय का…? लग्न आहे काही खेळ नाही… गपचुप जाऊन मांडवात बस…लोक कुजबुज करत आहेत… नवरी अशी कशी मांडव सोडून निघून आली म्हणून…तुझ्या बाबांच्या इभ्रतीचा जरा सुद्धा विचार नाही आला का तुझ्या मनात…?” शालूआत्या रागाने कडाडत म्हणाली.
” ह्यात माझी काहीच चूक नाही…मला आधी नव्हतं माहीत मुलगा असा आहे म्हणून…मला सगळं दिसत असून सुद्धा मी लग्न करावं असं वाटतंय का तुम्हाला…?” नंदिनी काकुळतीला येत म्हणाली.
इतक्यात आजी तावातावाने समोर येत म्हणाली.
” ए पोरी…बापाने तुला डोक्यावर बसवलं म्हणून वाया नको जाऊ…काहीतरीच काय नाटकं…लग्नाच्या दिवशी लग्न मोडलेल ऐकलस का कधी…मुलगा दारू पितो म्हणून कुठलं लग्न मोडल असं ऐकलंस का कधी…? चल बाहेर…बस मांडवात…”
इतक्यात तिचे बाबा समोर येऊन तिला म्हणाले.
” अशी नकोस वागू नंदिनी…अगं लोक काय म्हणतील… तोंडाला काळं फासतील तुझ्या बाबाच्या…थू थू करतील…अशी नकोस करू…मला माहिती आहे तुला काय वाटत असेल…पण सगळं काही नीट होईल…तू समजुतीने वाग फक्त…चल ना बाहेर मांडवात…”
बाबांच्या विनवण्याने नंदिनी समोर नवीन पेच उभा राहिला होता. इतकी मोठी हिम्मत करून ती मांडवातून निघून आली होती. पण बाबांसाठी पुन्हा मांडवात जावं लागेल ह्याची तिला मनातून खूप भीती वाटली. ती मनातून एकदमच खचली. आपल्यापुढे आता लग्न केल्याशिवाय पर्याय नाही असे वाटून भीतीने तिची गाळण उडाली. इतक्यात तिचे बाबा पुन्हा म्हणाले.
” लवकर तयारी कर आणि मांडवात चल नंदिनी… रविरावांना दारूची सवय जरी असली तरी पण मी समजावून सांगेन त्यांना…सगळं काही सोडतील ते…तुझे बाबा सगळं काही नीट करतील…”
” कसे काय करणार आहेस तू सगळं नीट…? जरा आम्हाला पण सांग…” मागून सरलाताई घरात येत म्हणाली.
सरला ताईला नेमकं काय बोलायचं आहे ते न कळल्याने ते प्रश्नार्थक पणे सरला ताईंकडे पाहत होते. इतक्यात सरला ताई पुन्हा म्हणाली.
” ज्याला इतके वर्ष त्याचे आई वडील सुधारू शकले नाही…डॉक्टर ज्याचं व्यसन सोडवू शकले नाहीत… त्याचं व्यसन तू कशाप्रकारे सोडवणार आहेस ते तरी कळू दे आम्हाला…”
” काय बोलत आहेस तू सरला ताई…?” प्रकाशराव म्हणाले.
” काय झालंय तुला सरला…अशी काय बोलत आहेस…आज माझ्या भाचीच लग्न आहे…तुला तर आधीच बघवल्या जात नसेल की नंदिनी इतक्या श्रीमंत घरची सून होणार आहे…”
” फक्त श्रीमंत असून काय फायदा…मुलीला एक चांगला जोडीदार मिळणं महत्त्वाचं नाही का…? आणि तू त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतेस ना…मग तुला हे सगळं माहिती नाहीये का…?”
” हे बघ…तू जास्त बोलू नकोस…आम्ही दोघं बहीण भाऊ पाहून घेऊ काय ते…” शालू आत्या रागाने म्हणाल्या.
सरला ताई काही बोलणार इतक्यात प्रकाशराव त्यांना म्हणाले.
” मला कळेल का तुम्हाला काय बोलायचं आहे ते…इकडे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे…आणि तुम्ही अशा भांडताय काय…आणि तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते सांगशील का सरलाताई…”
” सांगत्ये ना…” सरला ताई सांगायला लागली. पण इतक्यात आजी मध्येच त्यांना थांबवत म्हणाली.
” आता तुझी गोष्ट ऐकायला इथे कोणाकडेच वेळ नाही…लग्नाची वेळ झालीय…तू बाहेर जाऊन बस पाहुण्यांत…आम्ही पाहून घेऊ आमचं…”
आता मात्र उषा ताईंना राहवल्या गेले नाही. त्या सरला ताईला म्हणाल्या.
” सांगा ना ताई…काय सांगायचं आहे तुम्हाला…”
” मुलाला दारूचं खूप व्यसन आहे…त्या व्यसनापायी ती बारावी नंतर शिकू सुद्धा शकला नाही…व्यसन वाढता वाढता इतकं वाढलं की त्याला दवाखान्यात भरती करावं लागलं…तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की त्याची दारू सुटली नाही तर त्याच्या तब्येतीचा भरवसा नाही…पण त्याच्या आई बाबांच्या ने दारू सुटत नव्हती म्हणून कुणीतरी सल्ला दिला की लग्न लावून द्या मग दारू सुटेल…
म्हणून लग्नासाठी मुलगी पाहायला लागले…पण ह्याचं हे व्यसन आणि वाईट संगती बद्दल माहिती असल्याने ओळखीतील लोकांनी त्याला काही मुलगी दिली नाही…म्हणून मग अशी दूरच्या नातेवाईकांमधून एखादया गरीब घरची मुलगी पाहावी म्हणून नंदिनीला पसंत केलं त्यांनी…” सरला ताईंनी एका दमात सांगितले.
” काय…?” नंदिनीची आई तर मोठ्याने ओरडलीच.
प्रकाशराव सुद्धा एका जागी थिजले. आणि नंदिनीचा तर पार दगड झाला होता. पण शालू आत्या समोर आली आणि म्हणाली.
” इतकं सुद्धा काही नाहीये…मुलगा फक्त कधीकधी दारू पितो…आणि दारूच आहे ना…आज ना उद्या सुटेलच…आणि बारावी पर्यंत शिकलेला आहे तर काय..घरी गडगंज संपत्ती आहे त्यांच्या…शिवाय आपली नंदिनी सुधारेल त्याला…बायकोचं कामच असतं ते…नवऱ्याला वठणीवर आणण्याच…आणि फक्त दारूचं व्यसन एव्हढाच एक दुर्गुण आहे ना त्याच्यात…त्याने काय फरक पडतो…नंदिनी आरामात राहू शकेल तिथे…”
” म्हणजे तुम्हाला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं…?” नंदिनीची आई शालूताईंकडे रागाने पाहत म्हणाली.
पण समोर नंदिनीची आजी आली आणि म्हणाली.
” अगं ए…परक्या माणसांवर विश्वास ठेवून स्वतःच्या नंदेला प्रश्न काय विचारतेस…तिच्यामुळे तुझ्या मुलीच्या आयुष्याचं सोनं होणार आहे हे विसरू नकोस…आणि दारूची सवय कशी लागते तशी सुरू सुद्धा शकते…आहे ना भरपूर पैसा…मग करतील ते चांगले दवाखाने…होईल सगळं ठीक… तसंही मुलींना काय सगळं काही आयतं मिळत नाही सासरी…त्यांना स्वतःच स्वतःचा संसार उभा करायचा असतो…आणि अशा क्षुल्लक गोष्टीसाठी लग्नाच्या दिवशी वाद नको…लग्न होऊन जाऊ दे…मग बघता येईल पुढचं पुढे…”
” म्हणजे…एवढं सगळं कळल्यावर ही हे लग्न व्हावं असं वाटतंय का तुम्हाला…?” नंदिनीच्या आईने अतीव आश्चर्याने विचारले.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
हे लग्न होईल का…? प्रकाशराव आता काय निर्णय घेतील…? आजी आणि शालू आत्या मिळून प्रकाशरावांचा निर्णय बदलायला भाग पाडतील का…? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.