गौरीची आई शारदा नुकतीच शेतातून घरी आली होती. आल्यावर हातपाय धुवून चहा घेतला. इतक्यातच बाहेर गाडीचा आवाज आला. आता यावेळी आपल्या घरी कोण आले असेल हे पाहायला त्या घराबाहेर जाणार इतक्यातच गौरी आतमध्ये आली.
साडीचा पदर डोक्यावर घेऊन मग अंगभर लपेटून घेतला होता गौरीने. नजर भयभीत दिसत होती. दोन महिन्यापूर्वीच सासरी पाठवणी केलेल्या गौरीला आज अचानक असे पाहून तिच्या आईच्या काळजात धस्स झालं. त्या तिला काही बोलणार इतक्यातच मागून जावई प्रशांत सुद्धा आतमध्ये आला.
जावया समोर काय विचारणार म्हणून त्यांनी तिला काही विचारलं नाही. गौरी सरळ आत रूम मध्ये निघून गेली. जावई बुवा बैठकीत बसले. इतक्यात गौरीच्या आईने त्यांना विचारले.
” आज अचानक आलात दोघेही…म्हणजे एखादा फोन पण नाही केला…नाहीतर काही गोडधोड जेवण बनवलं असतं…”
” त्याची काही गरज नाही…मी इथे जेवायला आलेलो नाही…मी गौरीला इथे सोडायला आलोय…” प्रशांत बोलला.
” काही झालंय का… गौरीचं काही चुकलं का..?” गौरीच्या आईने जरा घाबरूनच विचारले.
” दिवसभर काहीच काम करत नाही ही घरी…नुसती टीव्ही बघते…ही घरी असतानाही माझ्या आईला कामे करावी लागतात…गाई आणि म्हशीचं तर हिला काहीच येत नाही…टीव्ही वर नुसते गाणे बघत असते…” प्रशांत म्हणाला.
” अजुन लहान आहे वयाने…शिकेल हळूहळू…” गौरीची आई त्यांना समजावत म्हणाली.
” शिकवा तिला…नाहीतर बस म्हणावं कायमची माहेरी…” प्रशांत म्हणाला. आणि लगेच घरून निघाला देखील.
अचानक झालेल्या या प्रसंगाने गौरीची आई मनातून खूप घाबरलेली होती. पण चेहऱ्यावर मात्र त्यांनी ते दिसू दिले नाही. त्या आतमध्ये गौरी जवळ गेल्या. आईला पाहून गौरीचा आता पर्यंत थांबून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला. ती आईच्या वाक्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. गौरीची आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होती.
थोड्या वेळाने गौरीने स्वतःला सावरले. तिला आईच्या कुशीत सुरक्षित वाटत होते. गौरीचे रडणे थांबल्यावर आईने तिला विचारले.
” काय झालंय गौरी…सासरी कुणी काही बोललं का तुला…”
” हो आई…खूप बोलले…” गौरी पुन्हा रडत म्हणाली.
” सासर असच असतं बघ…सुरुवातीला हे बऱ्याच जनींसोबत घडतं…पण जसजसं आपण तिथे रुळतो…तिथल्या चालीरीती स्वीकारतो…तसतसे सगळे काही ठीक व्हायला लागते…” तिची आई तिला समजावत म्हणाली.
” पण आई फक्त बोलले नाहीत ते मला…” गौरी म्हणाली.
” म्हणजे…?” आईने विचारले
” त्यांनी माझ्यावर हात उचलला आई… काल रात्री तीन वाजेपर्यंत मला मारले त्यांनी…माझ्या दोन नणंदा सुद्धा आल्या होत्या मला बोलायला…आणि घरातले सगळेच मला खूप बोलत सुद्धा होते आई…मी काल रात्रीपासून काही खाल्लेलं पण नाही आई…” हे बोलताना गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
गौरीच्या आईच्या काळजात मात्र धडकी भरली. आजवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या माझ्या मुलीवर हात उचलला त्यांनी. कालपासून पोर उपाशी आहे ह्या विचाराने तर त्यांचे मन हेलावून गेले. त्यांनी गौरीकडे पाहिले तसे गौरीने साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसायला लागल्या.
गौरीच्या आईने तिला पोटाशी धरलं. आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्या रोखू शकल्या नाहीत. त्यानंतर दोघीही मायलेकी बराच वेळ काहीच बोलल्या नाहीत. गौरीच्या आईने स्वयंपाकघरात जाऊन सकाळचे जे काही शिल्लक अन्न होते ते गौरीसाठी आणले. आणि गौरीने ते अगदी हपापल्या सारखे खाऊन टाकले. तोवर गौरीची लहान बहीण चंदा सुद्धा घरी आली. गौरीताईला असे अचानक समोर बघून तिला आनंद झाला होता मात्र तिची अवस्था पाहून काहीतरी बिनसलंय हे तिलाही कळलं होतं.
गौरीने जेवण केले आणि तिच्या आईच्याच मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली. तिच्या डोक्यावरून हात फिरवताना तिला तो दिवस आठवला जेव्हा गौरीने बारावीच्या परीक्षेत कॉलेज मधून पहिला नंबर आणला होता. गौरी तर त्या दिवशी खूपच आनंदात होती पण तिची आई तिच्यापेक्षाही आनंदात होती. कारण आज पोरीने तिच्या कष्टाचं चीज केलं होतं. गौरीचे वडील वारल्यानंतर तिच्या आईने दोघी बहिणींना मोठ्या कष्टाने वाढवलं होतं.
प्रसंगी स्वतःला साधी घेतली नाही पण दोघी मुलींच्या शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही. गौरी आधीपासूनच अभ्यासात हुशार होती. घरकामात सुद्धा अगदी निपुण. नेहमीच म्हणायची की आई मी शिकून मोठ्या नोकरीवर लागेल आणि तुला माझ्या सोबत घेऊन जाईल. तिच्या आईला सुद्धा असेच वाटायचे की दोन्ही मुलींनी त्यांच्या मनाप्रमाणे शिकावं. नोकरी करावी. निदान तिच्या आयुष्यात जे कष्ट आलेत ते मुलींच्या आयुष्यात नकोत म्हणून ती सतत झटायची.
गौरीचे वडील गेल्यावर शारदा अगदी एकटी पडली होती. पदरात दोन लहान मुलीसुद्धा होत्या. पण सुदैवाने त्यांच्याकडे चांगली पिकणारी चार एकर शेती होती. शारदा एकत्र कुटुंबात राहायची. शारदा आणि तिच्या दोन मुली, सोबतच तिचा दिर, जाऊ आणि त्यांच्या दोन मुली व एक मुलगा. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले होते. गौरीचे मोठे काका ती शेती करायचे. खाणे पिणे एकत्र च असल्याने ते फक्त थोडी गरजेपुरती रक्कम शारदाला द्यायचे. पण बरीच रक्कम ते स्वतःकडे ही ठेवायचे. पण आता मात्र एकच घराचे दोन भाग केले होते. आणि शारदा व तिच्या मुली घराच्या मागच्या भागात राहत होत्या.
आज ना उद्या गौरी आणि चंदाच्या लग्नाची जबाबदारी गौरीच्या काकांवर येणार हे ते जाणून होते. शिवाय काकांना नेहमीच वाटायचे की ह्या दोन मुलीच आहेत. एकदा का ह्यांची लग्न झाली की ह्यांना शेती मध्ये वाटा द्यायची गरज उरणार नाही. शारदाच्या नंतर शेती आपलीच होईल ही आशा सुद्धा त्यांच्या मनात होतीच.
एके दिवशी गौरीचे काका घरी आले आणि शारदाला म्हणाले.
” हे बघा वहिनी…गौरी ने कॉलेजात नंबर पटकावला हे तर चांगलंच केलं…मला सुद्धा खूप कौतुक आहे पोरीचं…पण आता तिच्या लग्नाचा पण विचार करायला हवा ना…”
” अहो पण भाऊजी…गौरी अजुन लहान आहे…आणि आता तिला अजून पुढे शिकायचं आहे…” शारदा म्हणाली.
” मुलींची जात आहे वहिनी…आज एखादे चांगले स्थळ आले म्हणजे पुढेही इतकी चांगली स्थळे येतील असे नाही…आणि मुलाकडच्यांना गौरीच्या हुषारीचे खूप कौतुक आहे…ते म्हणाले की आम्ही मुलीला पुढे शिकवू…” काका म्हणाले.
” तरीपण इतक्या लवकर गौरीचे लग्न करणे मला तरी पटत नाही भाऊजी…” शारदा म्हणाली.
” मुलगा शिक्षक आहे…शहरात राहील आपली गौरी…गावी भरपूर शेती आहे…घरातील सर्वजण गावीच राहतात…हे दोघेही नवरा बायको शहरात राहतील…म्हणजे आपल्या गौरीला अभ्यास करायला भरपूर वेळ मिळेल आणि तिचा नवरा शिक्षक असल्याने तिला अभ्यासात त्याची मदतच होईल…आणि तिथेच मोठ्या कॉलेज मध्ये शिकेल सुद्धा…” काका म्हणाले.
” मी विचार करून सांगते…” शारदा म्हणाली.
” ठीक आहे…तुम्ही उद्यापर्यंत विचार करा आणि मला सांगा…” काका म्हणाले.
काका गेल्यावर शारदाने विचार केला की चांगला नोकरीवर असणारा नवरा आहे. लग्न करून पोरगी शहरात राहील. तिथंच शिकायला ही मिळेल. आपल्या सारखं हलाखीत जगावं लागणार नाही पोरीला. पोरीच नशीब बदलेल. आणखी काय हवं. म्हणून तिने या स्थळाला होकार देण्याचे ठरवले. आणि तसे गौरीच्या काकांना कळवले देखील.
क्रमशः
लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)