सुमेधा निशांतच्या घरी पोहचली. निशांतच्या आईने आधीच तिच्या स्वागताची थोडी तयारी करून ठेवली होती. थोडा वेळ दोघांनाही बाहेर थांबवून त्या आत गेल्या. आरतीचे ताट आणि तांदळाचे माप घेऊन बाहेर आल्या. सुमेधा इतका वेळ बाहेर निशांत सोबत एकटीच उभी होती. पण इतका वेळ दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. दोघांच्याही वागण्यात एक अवघडलेपण जाणवत होते.
सुमेधा ला तिच्या सासुबाई म्हणाल्या.
” सुमेधा…हे माप ओलांडून आत ये…”
त्या सरशी सुमेधा आपल्या तंद्री तून बाहेर आली. निशांतच्या आईंनी तिचे औक्षण केले आणि ती माप ओलांडून घरात आली. घरात आल्यावर त्या तिला सोबतच देवघरात घेऊन गेल्या. तिथे गेल्यावर दोघांनीही देवांना नमस्कार केला. त्यानंतर निशांत आईला म्हणाला.
” आई… मी जरा फ्रेश होऊन येतो…”
” हो…जा…” आई म्हणाली.
तसा निशांत तिथून निघून गेला. तिथे आता फक्त आई अन् सुमेधा ह्या दोघीच उरल्या होत्या. सासूबाईंशी काय बोलावं हे तिला अजिबात कळत नव्हते. इतक्यात सासुबाई तिला म्हणाल्या.
” मला माहिती आहे…तुला हे सगळं खूप विचित्र आणि अवघडल्यासारखे वाटत असेल…एखादेवेळी एखाद्या नवीन जागेवर आल्यावर आपल्याला आपली जागा बनवणे तितकेसे अवघड जात नाही जितके आपली जुनी जागा पुन्हा मिळवायला जाते…ते ही तेव्हा जेव्हा जुन्या आठवणी त्रासदायक असतील…पण तू काळजी करू नकोस…मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबतच आहे…तुला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची काळजी आतापासून मी घेईल…तू आधी जशी या घरात रुळलेली होतीस तशीच राहा…”
त्यावर तिने सासूबाईंकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती त्यांना म्हणाली.
” आधीसारखी…नाही आई…आधी खूप वाईट होते मी…खूपच चुकीचे वागले…मला पूर्वीसारखं काहीच नकोय आता…त्या आधीच्या सुमेधाला मी कुठेतरी दूर सोडून आलीय…आता मला नव्याने सुरुवात करायची आहे…आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे आहे…”
” इथेच तर चुकतेयस तू…आता आधीचं काहीच लक्षात नाही ठेवायचं…अगदी चुका सुद्धा नाही…सगळं काही निर्मळ मनाने पुन्हा सुरू कर…आता नको त्या जुन्या आठवणी…आपण आपल्या नवीन आठवणी तयार करू…” सासुबाई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या
” आई…तुम्ही इतक्या सहजासहजी कशा माफ करू शकल्या मला…? तुम्हाला माझा राग नाही का आला… इतकं कसं तुमचं मन निर्मळ आहे आणि तुमचा हा चांगुलपणा मला आधी का नाही कळला…?” सुमेधा म्हणाली.
” कारण आधी तू जग फक्त तुझ्या दृष्टिकोनातून पाहत होती…घरावर तुला तुझी सत्ता हवी होती…सगळ्या गोष्टींवर स्वतःच वर्चस्व हवं होतं…त्या वेळी तुझं वय सुद्धा अल्लड होतं… तु खूप हट्टी होती…पण आता तू खूप काही सोसलं आहेस…तुला आता खऱ्या अर्थाने नात्यांची किंमत कळायला लागली आहे…” सासुबाई म्हणाल्या
” पण आई…तुमची खात्री कशी लागली की मी खरंच बदलली आहे ते…?” सुमेधाने सासूबाईंना प्रश्न केला.
” जेव्हा मला तुझ्या वहिनीने सांगितले की तिच्या बाळासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातला तेव्हा मला त्या गोष्टीची जाणीव झाली…अगं आधी फक्त मी आणि माझं एवढंच जग होतं तुझं…पण आपल्या वहिनीच्या बाळासाठी तू स्वतःचा विचार न करता अगदी मरायला सुद्धा तयार झालीस…त्या आधी सुद्धा तुला तुझी चुक लक्षात आलीय असे वाटले होते मला…”
” त्या आधी कधी आई…?” सुमेधा ने आश्चर्याने विचारले.
” तुला आठवत नसेल पण मला आठवतय…तुमचा डिव्हॉर्स होणार होता त्या दिवशी मी कोर्टात आले होते…त्या वेळी मी तुला बघीतले तेव्हा तुझ्या डोळ्यात आपल्या बाळाला गमावल्याच दुःख पाहिलं मी…मला तेव्हाच वाटलं होतं की जे काही झालं ते तू स्वतःहून केलं नसशील…पण त्यावेळी हे बोलायची ना वेळ होती ना प्रसंग…
निशांत तर काहीच ऐकायला सुद्धा तयार नव्हता…त्याच्या म्हणण्या नुसार तू त्याला डिव्होर्स द्यायला तयार सुद्धा तयार झालीस…तुला त्याला त्रासच द्यायचा असता तर तू त्याला टाळाटाळ करू शकली असतीस…त्याच्यावर हवे ते आरोप करू शकली असतीस…नाहीतरी आजकाल कायदे बहुतांशी बायकांच्या बाजूनेच आहेत…पण त्यावेळी तू खचलेली होतीस…
आणि आयुष्यात आलेले वाईट दिवसच व्यक्तीला चांगल्या वाईटाची जाणीव करवून देत असतो…आणि मुळात राग करायचा असेल तर तो माणसाचा न करता त्याच्यातल्या वाईट सवयींचा करावा…शिवाय तुझ्या वहिनीने सांगितलेल्या एकूण एका गोष्टीवर मला विश्वास वाटत होता…” सासुबाई म्हणाल्या.
त्यावर सुमेधाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने तिच्या सासूबाईंना मिठी मारली. त्यावर सासुबाई म्हणाल्या.
” हे रडणं वगैरे आता बंद…आजपासून आपण सगळ्यांनी फक्त आणि फक्त आनंदातच राहायचं…” सासुबाई म्हणाल्या.
त्यावर दोघीही सासू सूना मनापासून हसल्या. त्यानंतर सुमेधा तिच्या रूममध्ये गेली. निशांत वॉशरूम मध्ये होता. सुमेधाने आपल्या खोलीला इतक्या दिवसांनंतर पाहत होती. अगदी ती होती तेव्हा जशी होती तशीच आता देखील होती. निशांतने खरेच भिंतीवरील एखादा फोटो सुद्धा काढला नव्हता. तिने आपल्या बॅग मधील कपडे ठेवायला कपाट उघडले. तर कपाटातील तिची बाजू आजही रिकामीच होती.
इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि निशांत बाहेर आला. त्याने तिला पाहूनही न पाहिल्या सारखे केले. ती मात्र आताही काहीच बोलू शकली नाही. त्याने त्याची तयारी केली आणि तो बाहेर निघाला. आता मात्र सुमेधा त्याच्याशी बोलली. तिने त्याला विचारले.
” तुम्ही कुठे चाललात…?”
त्यावर तो काहीच बोलला नाही.
” म्हणजे तुम्ही बाहेर चाललात का…?” तिने पुन्हा विचारले.
” हो…” तो एवढेच बोलला आणि बाहेर निघून गेला.
तिला मात्र त्याचे हे वागणे खूप विचित्र वाटत होते. पण त्याला त्याचा वेळ सुद्धा द्यायलाच हवा हे सुद्धा तिला माहीत होते. शिवाय तिलाही अजुन थोडासा वेळ हवा होताच. तिने आपले कपडे बदलले आणि किचन मध्ये गेली. किचन मध्ये पाहते बरीचशी कामे झालेली होती. स्वयंपाक सुद्धा तयार होता. किचनमध्ये एक मावशी काम करत होत्या. त्यांना पाहून सुमेधा म्हणाली.
” तुम्ही कोण…?”
” अगं ह्या सुलभाताई आहेत…आपल्या घराच्या मागेच राहतात…ह्यांची खूप मदत होते ग मला…माझी तब्येत आताशा ठीक राहत नाही ना म्हणून ह्यांना मदतीसाठी बोलावलं…मागच्या काही दिवसात घराला खूप चांगल सांभाळलं ह्यांनी…” तिच्या सासुबाई किचन मध्ये येत म्हणाल्या.
” थँक यू मावशी…तुमची खूप मदत झाली आईंना…” सुमेधा त्यांना म्हणाली.
” त्यात काय सूनबाई… माजं कामच हाय बघा त्ये…पण ह्या घरच्या लोकांनी मला लई जीव लावला बघा…अगदी घरातलं असल्यासारखं वागवत्यात ह्या मला…” सुलभा मावशी म्हणाल्या.
” अहो तुम्ही आहातच आमच्या घरातील एक सदस्य सुलभाताई…” सासुबाई हसत म्हणाल्या.
” मावशी…मला सांगा आता आणखी काय करायचं आहे ते…” सुमेधा म्हणाली.
” न्हाई… तुमी कशाला कामाला हात लावताय…मी हाय ना…”सुलभा ताई म्हणाल्या.
” हो ग सुमेधा…तू आराम कर…आज फार दगदग झाली तुझी…कामाचं टेंशन नको घेऊ अजिबात…” सासुबाई म्हणाल्या.
” तसे नाही…पण मी एकटी बसून काय करणार आहे…मला तसे करमणार नाही…मला इथे तुमची मदत करू द्या..” सुमेधा म्हणाली.
” एकटी…? का ग…निशांत कुठे आहे…?” सासूबाईंनी विचारले.
” ते…त्यांना महत्त्वाचे काम होते बाहेर…म्हणून गेलेत…मला सांगून गेले…” सुमेधा चाचरत म्हणाली.
” हे तर फार चुकीचे आहे…आजच लग्न झालंय आणि ह्याला आजच बाहेर जायचे होते का…” सासुबाई म्हणाल्या.
” महत्त्वाचं काम होतं म्हणून गेलेत…येतील लवकरच…” सुमेधा म्हणाली.
मग मात्र सासुबाई काहीच बोलल्या नाहीत. त्या किचन मध्ये तिथेच एका खुर्चीवर बसून राहिल्या. सुमेधा आणि सुलभा ताईंनी त्यांच्याशी गप्पा मारत सगळी कामे आटोपली. आज घरातील वातावरण खूपच चांगलं वाटत होतं. हसण्या बोलण्याला अगदीच उधाण आले होते.
इकडे वृंदाताई मात्र सुमेधाच्या आठवणींनी बेचैन झाल्या होत्या. सगळं काही ठीक असेल ना असा विचार त्यांना वारंवार येत होता. एकतर सुमेधाने एकदाही त्यांना फोन केलेला नव्हता. त्यांची बेचैनी पाहून मनीषा त्यांना म्हणाली.
” आई…काय झालंय…सुमेधा ताईंनी आठवण येत आहे का…?”
” हो ग…बघ ना…पोरीने एक फोन सुद्धा नाही केला अजुन…” वृंदाताई म्हणाल्या.
” इतकंच ना आई…अहो त्यांनी नाही केला तर तुम्ही एक फोन करा ना त्यांना…” मनीषा म्हणाली.
” तसे नाही ग…पण मला भीती वाटते…” वृंदा ताई.
” भीती…? कशाची भीती आई…?” मनीषाने विचारले.
” मागच्या वेळी माझ्या लुडबुड केल्याने तिचा संसार मोडला होता ग…आता सुद्धा माझी अती काळजी तिच्या संसारात बाधक ठरली तर…?” वृंदाताई काळजीने म्हणाल्या.
” तुम्ही उगाच काळजी करताय आई…अहो ती वेळ वेगळी होती आणि आजची वेळ वेगळी आहे…आणि आता त्या जुन्या गोष्टींचा फार विचार नाही करायचा…आणि तुम्ही फोन करत नसाल तर मीच करते त्यांना फोन…” मनीषा म्हणाली.
आणि मनीषाने सुमेधाला कॉल केला. सुमेधा ने कॉल उचलल्यावर मनीषा म्हणाली.
” काय हो सुमेधाताई…तुम्हाला मघाशी रडताना पाहून मला तर वाटले होते की तुम्ही आमच्यापासून दूर कसे राहणार…पण आता तर एकदमच विसरलात तुम्ही आम्हाला…”
” तसे नाही ग वहिनी…जरा गप्पा वगैरे सुरू होता म्हणून फोन करायचा राहून गेला…” सुमेधा म्हणाली.
” निशांतदादा जवळ असताना तुम्हाला आता आमची काय आठवण येणार म्हणा…” मनीषा चेष्टेने म्हणाली.
” काहीही काय ग वहिनी…” सुमेधा आता जरा लाजली होती.
त्यानंतर जुजबी बोलून मनीषाने कॉल ठेवून दिला. वृंदाताईंना सुमेधाचा आवाज ऐकून बरे वाटले. इतक्यात निशांत सुद्धा घरी आला. तो आल्यावर सुमेधाने जेवण टेबल वर नेऊन ठेवले. सुलभा ताई तोवर कामे आटोपून आपल्या घरी निघून गेल्या होत्या. सासुबाई, निशांत आणि सुमेधा असे तिघेच आता जेवणाच्या टेबलवर बसले होते.
निशांत मात्र चोरून चोरून सुमेधा कडेच बघत होता. त्याची आई त्याच्याशी बोलत होती. पण त्याचे लक्ष मात्र सुमेधाकडेच होते. तसे त्याने तिला पहिल्यांदा पाहिले नव्हते. पण आज नव्या नवरीच्या रुपात ती खूपच छान दिसत होती. साडीचा पदर खोचून कामे करताना ती खूपच गोड दिसत होती. निशांतच्या आईच्या ते लक्षात आले तेव्हा त्या मनातल्या मनातच हसल्या. आईच्या बोलण्यावर तो फक्त हो ला हो आणि नाही ला नाही एवढेच एवढेच बोलत होता.
म्हणूनच मग त्यांनी लवकर जेवण आटोपले. आणि रूम मध्ये जायला निघाल्या. तेव्हा निशांत त्यांना म्हणाल्या.
” हे काय आई…इतक्यात जेवण आटोपलं सुद्धा…”
” हो रे…आज जरा दगदग झाली…म्हणून म्हटलं जरा जाऊन आराम करते…” आई म्हणाली.
” ठीक आहे…” निशांत म्हणाला.
आई रूममध्ये निघून गेली आणि तिथे फक्त निशांत आणि सुमेधा उरले. दोघेही एकदम चुपचाप जेवण करत होते. दोघांपैकी कुणीच काही बोलत नव्हते. इतक्यात सुमेधाने पाहिले की निशांत च्या ताटातील पोळी संपली आहे. पोळी द्यायची म्हणून तिने हॉटपॉट उघडला. आणि बरोबर त्याचवेळी निशांतने सुद्धा पोळी घेण्यासाठी हात समोर केला. दोघांच्याही हातांचा एकमेकांना स्पर्श झाला. तसे दोघेही शहारले. सुमेधाने पटकन आपला हात काढून घेतला. निशांत सुद्धा गडबडला.
दोघेही एकदमच आपल्या जागी चुपचाप बसून होते. दोघांपैकी एकही बोलायला पुढाकार घेत नव्हते. इतक्यात निशांत ने पटकन जेवण आटोपले आणि रूम मध्ये निघून गेला. सुमेधाला त्याचे वागणे काही कळत नव्हते. ती घरात आल्यापासून तो तिच्याशी एकही शब्द स्वतःहून बोलला नव्हता.
क्रमशः
सुमेधा आणि निशांतचे अवघडलेपण कधी दूर होईल…? निशांतच्या अशा वागण्यामागे काय कारण असेल…? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.
Next
Next part will come soon 😊