आणि लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. सचिन आणि श्वेताचे लग्न झाले आणि श्वेता सचिनच्या घरी आली. लग्नाच्या पहिल्या रात्रीच सचिन एखाद्या श्वापदा सारखा तिच्यावर तुटून पडला होता. तिला शरीरा सोबतच मन सुद्धा आहे ह्याची त्याला शुद्ध नव्हती. श्वेता मात्र झालेल्या प्रकाराने मनातून घायाळ झाली होती. पण हेच आपले दैव आहे हे मानून तिने सगळे सहन करायचे ठरवले होते.
पण या सर्वात तिला एक आधार मिळाला. तो म्हणजे तिच्या सासूबाईंचा. तिच्या सासुबाई स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. मुलाच्या अशा वागण्याला त्या सुद्धा खूप कंटाळल्या होत्या. सचिन दिवसरात्र नुसता दारूत असायचा. त्याच्या वडिलांना जाऊन दहा वर्षे झाली होती. आणि आईला तो अजिबात जुमानायचा नाही. सचिन घरी असला की नुसता ओरडायचा तिला. श्वेताच्या येण्याने त्यांना सुद्धा आधारच मिळाला होता.
एके दिवशी सचिन दुपारी घरी जेवायला आला. आणि पहिलाच घास खाऊन त्याने जेवणाच ताट जमिनीवर भिरकावून दिले आणि रागाने लालबुंद होऊन श्र्वेताकडे गेला व तिचे केस पकडून तिला म्हणाला.
” भाजीत मीठ काय तुझा बाप येऊन टाकणार आहे का..?”
एवढे बोलून त्याने तिला बाजूच्याच भिंतीवर ढकलले. सुदैवाने तिच्या सासुबाई मध्ये आल्या आणि त्यांनी सचिनला अडवले. श्वेताचा मार हुकला पण ती खूप घाबरली होती. त्यानंतर असे अनेक प्रसंग आले जेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला सचिनचा मार खाण्यापासून वाचवले होते.
सचिनचे बाहेर एका बाईबरोबर अफेअर आहे हे तर श्वेताला लग्न झाल्यावर लगेच माहिती पडले होते. सचिन शेतात भरपूर काम करायचा पण पिकांचा आलेला पैसा तो त्या बाईवर उधळायचा. पण श्वेताला आता त्याचे फार वाईट वाटत नव्हते. तिला वाटायचे की त्यानिमित्ताने का होईना हा जास्त घरी राहत नाही. कारण तो जेव्हा घरी राहायचा तेव्हा ही त्याला घाबरलेलीच असायची.
श्वेताचा संसार कसातरी सुरू होता. पण मध्येच अचानक सचिन आजारी पडला. त्याला डॉक्टरांनी तपासल्यावर कळले की त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे लिव्हर कमकुवत झाले आहे. त्याच्यावर उपचार सुरू झाले. आधी धडधाकट असणारा सचिन आता खंगत चालला होता. त्याचा तो रुबाब आता कुठेतरी हरवला होता. आणि नजरेत लाचारी भरली होती.
तो आता श्वेताला प्रेमाणे आणि आर्जवाने हाक मारी लागला होता. त्याला तसा आजारी पाहून श्वेता च्या मनात त्याच्याबद्दल असलेली सगळी नाराजी दूर झाली. कुठेतरी तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होत होते. ती त्याची मनोभावे सेवा करत होती सचिनची आई सुद्धा त्याची खूप काळजी घ्यायची. डॉक्टरांनी त्याला दारूला हात लावायला सक्त मना केले होते. तो जेव्हा दारूत नसायचा तेव्हा तो एकदम चांगला वागायचा. आणि मागच्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच सचिनचे दर्शन या दोघी सासू सुनेला घडत होते.
श्वेता आणि आईची सुश्रुषा फळाला आली आणि सचिनची तब्येत चांगली झाली. दोघांचा संसार खूप चांगला चालला होता. डॉक्टरांच्या सांगण्यावरून सचिन दारूला हात लावत नव्हता आणि त्या बाईचा नाद सुद्धा त्याने सोडला होता. पण काही दिवसातच सचिन पुन्हा बदलायला लागला.
तब्येत चांगली झाली म्हणून पुन्हा त्याचा उन्मतपणा बाहेर यायला लागला. पुन्हा तो आधीसारखा रागीट झाला. आणि एके दिवशी मित्रांसोबत सहज म्हणून बाहेर गेला तो उशिरा रात्री दारू पिऊन घरी आला. त्याला दारू पिऊन आलेला पाहून त्याची आई अन् बायको दोघीही बिचाऱ्या घाबरल्या. डॉक्टरांनी त्याला दारू प्यायला सक्त मना केले होते.
पण सचिन मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने आणि श्वेताने त्याला पोटतिडकीने समजावून सांगितले पण त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. दारू पिणे त्याच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे हे सांगितल्यावर तो म्हणाला की आधी जसा आजारातून बरा झाली तसाच पुढेही होईल.
नुकतीच त्याच्या प्रेमात पडलेली श्वेता मात्र त्याच्या काळजीने त्याला समजावत असायची. पण तो मात्र आता काहीच ऐकायला तयार नव्हता. शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले. सचिन पुन्हा आजारी पडला. त्याची तब्येत खूप खालावली होती. डॉक्टरांनी या दोघींना आधीच कल्पना दिली की यावेळेला सचिन चे बरे होणे कठीण आहे.
पण दोघीही सासू सूना डॉक्टरांना गयावया करत होत्या. त्या दोघींना असे हतबल झालेलं पाहून सचिन ला पुन्हा त्याच्या चुकांची जाणीव झाली पण यावेळेला खूप उशीर झाला होता. आठ दिवस हॉस्पिटलमध्ये आजाराशी झुंज दिली पण ती अपयशी ठरली. शेवटी सचिन हे जग सोडून निघून गेला. त्याच्या जाण्याने श्वेता आणि तिच्या सासुबाई पुरत्या कोलमडून पडल्या होत्या.
श्वेताच्या माहेरचे सुद्धा तिला धीर देण्यासाठी आले होते. सचिनची तेरवी झाल्यानंतर श्वेताच्या माहेरच्यांनी काही दिवस तिला माहेरी नेत असल्याचे सांगून तिला माहेरी नेले.
माहेरी आल्यावर श्वेताचे दुःख काहीशे हलके झाले होते. बहीण भावांच्या आणि आईच्या सोबतीने ती हळूहळू जगायला शिकत होती.
एके दिवशी तिच्या घरी काही पाहुणे आले. आई त्यांच्यासाठी चहा पाणी करत होती. चहा झाल्यावर तिच्या आईने तिच्या हातात चहा दिला आणि म्हणाली…
” श्वेता…पाहुण्यांना चहा देऊन ये…”
श्वेता ने चहाचा ट्रे घेतला आणि ती पाहुण्यांना चहा द्यायला गेली. तेव्हा श्वेताचे वडील म्हणाले.
” हीच आहे आमची श्वेता…फक्त चोवीस वर्षांची आहे अन् इतक्या लहान वयात विधवा झाली पोरगी…पोरगा लईच वाईट निघाला बघा तो…खूप दारू प्यायचा…लिव्हर खराब झालं अन् मेला…पोरीच जीवन खराब करून गेला…आता तुमच्या लक्षात एखादा चांगला पोरगा असेल तर सांगा हिच्यासाठी…आता पोरीला घरात बसवून तर नाही ना ठेवू शकत…”
त्यांचे बोलणे ऐकून श्वेताला आश्चर्य वाटले. आपला नवरा जाऊन अजुन महिना सुद्धा झालेला नसताना बाबांना असं कसं काय सुचू शकत ह्याचं तिला नवल वाटत होतं. तिने तो चहा तिथेच ठेवला आणि तडक किचन मध्ये निघून आली. थोड्या वेळाने ते पाहुणे निघून गेल्यावर श्वेता बाबाकडे गेली आणि म्हणाली.
” बाबा…हे तुम्ही काय करताय…माझा नवरा जाऊन अजुन महिना सुद्धा झाला नाही आणि तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहात…”
” हो…आणि की काय चुकीचं करत आहे ग…तो स्वतःच्या कर्माने मला आणि तुझं आयुष्य खराब करून गेला…आणि तू मात्र अजूनही त्याचा विचार करत आहेस…” बाबा म्हणाले.
” माझं आयुष्य त्यांनी खराब केलंय की तुम्ही…लग्नाच्या आधी तुम्हाला माहिती नव्हतं का ते दारू पितात म्हणून…लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं…मला सुद्धा तेव्हा हे लग्न करायचं नव्हतं…पण तुम्ही कोणाचंच काहीच ऐकलं नाही…नुसती त्याची बागायती जमीन बघितली आणि मुलगी देऊन टाकली…त्याच्या दारूच्या व्यसनाने आमचा संसार उद्धवस्त होईल असे एकदाही वाटले नाही तेव्हा तुम्हाला…म्हणून प्रत्यक्षात त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्या ऐवजी तुम्हीच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय बाबा…म्हणून सगळा दोष त्यांना देऊन मोकळे होऊ नका…” श्वेता म्हणाली.
” पण मी तर तुझ्या भल्यासाठीच चांगला श्रीमंत मुलगा बघत होतो ना…” बाबा म्हणाले.
” खरंच मुलगा श्रीमंत असला म्हणजे संसार सुखाचा होतो असे असते का बाबा…तो मनाने, स्वभावाने चांगला आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं नाही का…तुम्हाला सगळं काही माहिती असून केवळ श्रीमंत आहे म्हणून तुम्ही माझे लग्न लावून दिले…पण खरंच मला काय हवंय…माझी आवड काय आहे हे लक्षातच घेतले नाही तुम्ही कधी…” श्वेता म्हणाली.
” अगं…पण जे काय झालं तो तुझ्या नशिबाचा भाग होता…ह्याला आपण काय करणार…आणि आता आयुष्यभर लग्न न करता माहेरी राहणार आहेस का तू…?…बिना लग्नाची कोण पोसेल तुला माहेरी…” आई म्हणाली.
” कुणीच पोसायची गरज नाही तिला…” श्वेताच्या सासुबाई दारात उभ्या राहून म्हणाल्या. त्यांना अचानकपणे आलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्या समोर आल्या आणि म्हणाल्या.
” सचिन नंतर त्याच्या सगळ्या जमिनींची मालकीण श्वेताच आहे…माझ्या मुलाकडून खूप अपेक्षा होत्या पण त्याने नसत्या व्यसनात बुडून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली…पण माझी सून मात्र माझी मुलगी बनून राहिली माझ्या घरी…पण आता मी तिची आई होणार आहे… आधी ती तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून तिच्या पायावर उभी राहील आणि नंतर तिला तिच्या आयुष्यात काय करायचं ते ती स्वतः ठरवेन…” त्या म्हणाल्या.
त्यांचे बोलणे ऐकून सगळे गप्प बसले. श्वेताने जाऊन तिच्या सासूबाईंना मिठी मारली. आणि म्हणाली.
” आई…मी कालच तुम्हाला घ्यायला बोलावले आणि आज तुम्ही आल्या सुद्धा…”
” हो मग…तुझ्याशिवाय घरी अजिबात करमत नाहीय… चल आवर पटकन…आपण निघुयात घरी…” सासुबाई म्हणाल्या.
श्वेताने आधीच भरून ठेवलेली कपड्यांची बॅग उचलली आणि तिच्या सासूबाईंसोबत तिच्या घरी निघून सुद्धा गेली. तिचे आईवडील मात्र तिला पाठमोरी पाहतच राहिले. कारण आज पहिल्यांदा श्वेताने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली होती. खरंच काही गोष्टी ह्या नशिबावर सोडून नाही चालत…काही गोष्टींसाठी आपण स्वतः देखील जबाबदार असतो.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
खूप छान कथा आहे.प्रत्येक गोष्ट नशिबावर सोडून नाही चालत, आणि सासूबाईंचं कौतुक करावसं वाटतं 👌😊
छान कथा