सर्वजण गप्पा मारत असताना मधुरा मात्र किचन मध्ये सर्वांसाठी गरमागरम पोळ्या करत होती. सतरा वर्षांची अल्लड मधुरा आज एखाद्या मुरलेल्या गृहिणी सारखी धावपळ करून कामे करत होती. सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केल्यावर मधुराने सर्वांना जेवण वाढले. सर्वांनी जेवणाची स्तुती केल्यावर आत्या म्हणाली…
” आज काव्या ने सकाळपासून खूप मदत केली हो मला स्वयंपाकात…तुम्ही येणार म्हणून सकाळपासून कामात आहे पोरगी…”
” हो…आणि ही तुमच्या भावाची मुलगी सुद्धा खूप कामाची वाटतेय..” काव्याच्या सासुबाई म्हणाल्या.
” ती अजून लहान आहे…म्हणून तिला घरातील जास्त काम सांगत नाही…म्हटलं हिने पण थोडं शिकावं काव्या पासून…म्हणून तिला घरी घेऊन आले आहे…”
आत्याचे बोलणे ऐकुन पाहुण्यांनी काव्याची खूप स्तुती केली. त्यावेळी मधुराने आत्याकडे पाहिले. आत्याने डोळ्यांनीच मधुराला पाहुण्यांना पोळी वाढायला खुणावले. मधुराला वाईट वाटले. आपण सकाळपासून राबतोय आणि आत्याने किती सहजपणे आपले श्रेय काव्या ताईला दिले ह्याचे मधुराला आश्चर्य वाटले.
त्यानंतर रोज लग्नाच्या निमित्ताने घरात पाहुण्यांची ये जा सुरूच असायची. मधुराला रोज भरपूर कामे करावी लागायची. कधीकधी पाहुण्यांना जेवण करून जायला रात्रीचे बारा वाजयचे. मधुराला रात्री उशिरा झोपून पुन्हा सकाळी लवकर उठावे लागायचे. पण काव्याला मात्र असे कोणतेच बंधन नव्हते.
ती मस्तपैकी सकाळी साडेआठ वाजता उठायची. आणि दिवसभर लोळत पडायची. नाहीतर फोन वर बोलत बसायची. मधुराची आत्या मुलीशी खूप प्रेमाने बोलायची आणि मधुराशी मात्र केवळ कामापुरते गोड बोलायची. आणि मधुराला हे कळायला लागले होते. त्यानंतर आत्या जेव्हा मुलीच्या लग्नाच्या खरेदीला जायची तेव्हा मधुराला सोबत घेऊन सुद्धा जात नसे.
सोबत काव्याच्या मैत्रिणींना घेऊन जायची. मधुराला फक्त आत्याने कामापुरते घरी आणले होते. आपल्या घरी नेहमी हसरी आणि खोडकर असणारी मधुरा आत्याच्या घरी येऊन पार सुकून गेली होती. आता तिला आत्याच्या आलिशान घराचं अजिबात अप्रूप वाटत नव्हतं.
आत्याच्या मुलीच्या उंच राहणीमानाचे आकर्षण सुद्धा राहिले नव्हते. आणि आपण श्रीमंत घरात जन्माला यायला हवं होतं असं वाटणं सुद्धा बंद झालं होतं. आता तिला आठवत होती ती तिची प्रेमळ आई, तिला हवं नको ते विचारणारे तिचे प्रेमळ बाबा, नेहमी तिच्या खोड्या काढणारा तिचा लहान भाऊ.
एके दिवशी आत्या तिच्याजवळ आली आणि म्हणाली…
” मधुरा…हा ड्रेस घे…आणि काव्याच्या लग्नात हाच घालशील…काव्याचा सर्वात सुंदर ड्रेस घालायचा देत आहे तुला…हा ड्रेस घातल्यावर खूप सुंदर दिसशील तू…”
मधुराने तो ड्रेस पाहिला. हा ड्रेस काव्याचा जुना ड्रेस होता. काव्याने बरेचदा घातलेला होता. आणि आता लग्नाच्या निमित्ताने काव्याने खूप नवीन कपडे आणल्यामुळे हा जुना ड्रेस आत्याने मधुराला देऊ केला होता. आत्याच्या हे वागणे मधुराला अजिबात आवडले नव्हते. पण आईने सक्त ताकीद दिली होती की आत्याच्या घरी कोणालाच उलटून बोलायचे नाही.
तिला आठवले की दर दिवाळी ला आत्या घरी येणार म्हणून बाबा नेहमीच त्यांच्या कपड्यांसाठी पैसे राखून ठेवा यचे. काव्या ताईला बाबा आपल्यापेक्षा चांगला ड्रेस घ्यायचे आणि आत्याला आईपेक्षा महाग साडी. आपल्या गरीब पण मनाने मोठ्या असणाऱ्या आईबाबांचा तिला अभिमान वाटू लागला होता. आणि आपल्या श्रीमंत पण कोत्या मनाच्या आत्याला आपण आपल्या आई बाबांपुढे नेहमीच झुकतं माप दिलं ह्याच तिला वाईट वाटत होतं.
तिला आता वाटू लागले होते की काव्याताईचे लग्न लवकर व्हावे आणि आपल्याला लवकर आपल्या घरी जायला मिळावे. आणि बघता बघता काव्याच्या लग्नाचा दिवस जवळ आला होता. काव्याच्या लग्नाला चार दिवस बाकी असताना मधूराची आई, बाबा अन् लहान भाऊ सुद्धा आत्याच्या घरी आले होते.
मधुराचा उदास चेहरा पाहून आईला तिच्या मनातलं बहुधा कळलं असावं. तरीपण लग्न घर म्हणून आईने मधुरा ला तिथे काहीच विचारले नाही. पण आईच्या येण्याने मधुरा खूप खुश झाली होती. इथे आली तेव्हापासून मधुराच्या आईनेसुद्धा किचन मध्ये कामाला सुरुवात केली होती.
दुसऱ्या दिवशी आई मधुरा ला म्हणाली.
” मधुरा…तुला लग्नासाठी जो ड्रेस हवा आहे तो आज तुझ्या बाबांसोबत जाऊन घेऊन ये…”
” नाही आई…मला नको तो ड्रेस…तू माझ्यासाठी जो ड्रेस शिवला आहेस तोच घालणार मी लग्नात…” मधुरा म्हणाली.
” पण तुला तर तो आवडला नव्हता ना…” आईने विचारले.
” आता आवडलाय…” मधुरा म्हणाली.
आईला मात्र मधुराच्या अशा बोलण्याचे कारण थोडेफार कळले होते. आई काही बोलणार इतक्यात मधुरा म्हणाली.
” आई…एक विचारू का…?”
” विचार ना…” आई म्हणाली.
” हे श्रीमंत लोक मनाने चांगले नसतात का…?”
” नाही ग बाळ…असा गैरसमज नको करून घेऊस…माणसांचा स्वभाव वेगवेगळा असतो…मग गरीब काय आणि श्रीमंत काय…स्वभावावर औषध नसते…आता तुझी आत्याच बघ…लग्नाच्या आधी माहेरी गरिबीच होती…आणि सासर चांगलं श्रीमंत भेटलं…पण प्रत्येकाला अचानकपणे मिळालेली श्रीमंती झेपत नाही…त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा गर्विष्ठ बनत जातो इतकंच…पण सगळी श्रीमंत माणसे मनाने वाईट असतात असे अजिबात नाही…” आईने मधुराला समजावून सांगितले.
आईने प्रेमाने समजलेले मधुरा समजली सुद्धा. यापुढे आईबाबांकडे कोणत्याच गोष्टीचा हट्ट करायचा नाही हे तिने ठरवले होते. तीन दिवसांनी काव्याच्या लग्नात मधुरा ने आईने शिवलेला ड्रेस घातला. तो ड्रेस घालून मधुराला आज अजिबातच ओशाळल्यासारखे वाटत नव्हते. उलट आईने स्वतःच्या हाताने शिवलेला ड्रेस म्हणून तो ड्रेस आज तिच्यासाठी सर्वात सुंदर ड्रेस होता.
तिला त्या ड्रेस मध्ये पाहून तिच्या आत्याने विचारले…
” काय ग मधुरा…मी तुला इतका सुंदर ड्रेस घालायचा दिला आणि तू हा इतका साधासा ड्रेस घातलास लग्नात…”
” हो आत्या…साधा असला तरी माझ्या आईने प्रेमाने माझ्यासाठी शिवला आहे …आणि आई म्हणते की सौंदर्य आपल्या कपड्यांवरून नाही तर आपल्या चांगल्या विचारांनी प्राप्त होते..महागडा पण जुना वापरलेला ड्रेस घातल्या पेक्षा साधा पण नवीन ड्रेस घातलेला कधीही चांगला.नाही का…?” मधुरा म्हणाली.
मधुराला नक्की काय म्हणायचे ते आत्याला कळले होते. आपण स्वतःच्या मुलीसाठी इतके सारे कपडे घेतले पण आपल्या इथे महिन्याभरापासून काम करणाऱ्या आपल्या सख्ख्या भावाच्या मुलीला मात्र आपण जुना ड्रेस घालायचा दिला ह्याचे आत्याला थोडेफार वाईट वाटले असावे म्हणून मधुराला काहीही न बोलता आत्या तिथून निघून गेली.
आईने मधुराचे बोलणे ऐकले. आणि मधुराला आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली ह्याचा आईला आनंद झाला.
आपली आजची कथा खूप सामान्य आहे. पण त्या कथेतून मिळणारा बोध मात्र खूप काही शिकवून जातो. माणूस श्रीमंत असला म्हणजे तो सुखी आहे असे नव्हे, सुखी तो तेव्हा होतो जेव्हा तो आतून समाधानी असतो. आणि सुंदर दिसायला चांगल्या कपड्यांपेक्षा चांगल्या मनाची गरज असते, कारण ज्याचे मन सुंदर असते तो सर्वार्थाने सुंदर असतो.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरु नका