राधा एका गरीब कुटुंबातील साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या—फक्त शांत संसार, प्रेम करणारा नवरा आणि दोन वेळचे सुखाचे जेवण. तिचे लग्न शिरीषशी झाले तेव्हा तिला वाटले की तिचे आयुष्य स्थिर झाले.
शिरीष मध्यमवर्गीय कुटुंबातील धाकटा मुलगा होता. तो एका छोट्या कंपनीत नोकरी करायचा. पगार फार मोठा नव्हता, पण तो प्रामाणिक होता. लग्न झाल्यावर काही दिवसातच आपल्या लाघवी स्वभावाने राधाने त्याचे मन जिंकून घेतले होते. राधावर त्याचे प्रेम जडले होते.
ह्या दोघांच्या संसाराची घडी नीट बसली होती मात्र सासरच्या मंडळींच मन जिंकण तिच्यासाठी इतकं सोपं नव्हतं.
शिरीषचा मोठा भाऊ उदय स्वतःचा व्यवसाय करत होता. त्याचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. पैसे, गाडी, मोठं घर—सगळं होतं त्याच्याकडे. उदयची पत्नी नीता एका श्रीमंत घरातील मुलगी होती. तिच्या वडिलांनीच उदयला व्यवसायात सुरुवातीला मोठी मदत केली होती. म्हणूनच घरात नीताला खूप मान होता.
शिरीषची आई तर नीताकडे जणू काही देव असल्यासारखं पाहायची. तिचं प्रत्येक बोलणं त्यांना मान्य असायचं. त्या तिचं मन जपायच्या.
राधा लग्न करून घरात आली तेव्हा सुरुवातीला सगळं ठीक वाटलं होतं. पण काही दिवसांनी वास्तव समोर आलं.
“राधा, तू लग्न करून आलीस आणि आमची जबाबदारी जरा कमी झाली बघ…आता स्वयंपाकघराची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते…स्वयंपाकघर तू सांभाळ…मी आणि नीता आम्हाला बाहेरची कामं असतात…आम्ही आता ते सांभाळू…” सासूबाई म्हणाल्या.
त्या दिवसापासून स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी राधावर आली.
सकाळपासून रात्रीपर्यंत ती कामात गुंतलेली असायची—चहा, नाश्ता, जेवण, भांडी, घर साफसफाई. नीता मात्र सजूनधजून बाहेर जायची, मैत्रिणींना भेटायची. नीता स्वभावाने गर्विष्ठ होती. राधाशी कधी सरळपणे बोलायचीच नाही. एकदा साडीच्या दुकानात दोघी एकत्र गेल्या तेव्हा राधाला एक साडी पसंत पडली. तेव्हा नीता कुत्सितपणे हसत तिला म्हणाली.
“अगं भाऊजींचा पगार पाहून साडी पसंत कर ना…नाहीतर महिनाभराचा पगार साडीतच उडवून टाकशील…”
हे ऐकून राधाचा हिरमोड झाला. तिने साडीची किंमत सुद्धा विचारली नाही. साडी न घेताच ती परत आली.
असेच एकदा नीताची मैत्रीण घरी आली तेव्हा राधाने मनापासून तिचा सगळा पाहुणचार केला. नीताची मैत्रीण सुद्धा राधासोबत चांगली बोलत होती. राधा उत्साहाने तिच्याशी बोलत होती. अशातच नीता मध्येच म्हणाली.
” तुला लग्नाआधी माहिती होतं का भाऊजींचा पगार किती आहे ते…” नीता पुन्हा एकदा तिच्या मैत्रिणीसमोर हसत म्हणाली.
राधा क्षणभरासाठी हिरमुसली पण दुसऱ्या क्षणी शांतपणे म्हणाली, “जास्त नाही, पण आमच्यासाठी पुरेसं आहे.”
नीता मोठ्याने हसली आणि म्हणाली.
“अगं, एवढ्या पैशात काय संसार चालतो..? तुझे भाऊजी घरचा खर्च करतात म्हणून तू एवढया मोठ्या घरात राहतेस…नाहीतर तुझं ते दोन खोल्यांचं घर पाहिलं ना आम्ही…”
आता मात्र राधा काही बोलली नाही. तिला माहीत होतं. ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्याकडे अहंकारही येतोच. तिला फक्त एवढंच वाटायचं की तिचा नवरा प्रामाणिक आहे, तिच्यावर प्रेम करतो, आणि तेच तिच्यासाठी पुरेसं होतं.
असेच दिवस सरत होते. एक दिवस राधाला सतत मळमळायला लागलं. थकवा जाणवत होता. सासूबाईंनी तिला डॉक्टरकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी राधा प्रेग्नंट असल्याचे सांगितले. घरात ही बातमी ऐकून सगळे आनंदी झाले.
पण आनंदाबरोबर राधाच्या कामात मात्र काहीही कमी झाली नाही.
सकाळपासून रात्रीपर्यंत ती पूर्वीसारखीच काम करत राहिली. शिरीष दिवसभर बाहेरच असायचा. राधाला घरची इतकी कामे करावी लागतात ह्याची त्याला कल्पना नव्हती. घरात बाद वाढू नयेत म्हणून राधाने शिरीषला काहीच सांगितले नाही.
काही महिन्यांनी डॉक्टरांनी राधाची सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना कळले की तिला जुळी मुलं होणार आहेत. घरात हे कळल्यावर अचानकच नीताची राधासोबत असलेली वागणूक बदलली.
लग्नाला पाच वर्षे झाली होती, तरीही नीता आणि उदयला मूल नव्हतं.
ती राधाशी गोड बोलायला लागली.
“राधा, तू थकली असशील. ये बस, मी पाणी आणते.”
“काही खायचं आहे का?”
राधाला थोडं आश्चर्य वाटायचं.
“अचानक इतकं प्रेम?” ती मनात विचार करायची.
पण तिने कधी शंका घेतली नाही. तिला वाटायचं की घरात बाळ येणार आहे या विचाराने जाऊबाई हरखल्या असतील. त्यांना बाळाचे लाड करायचे असतील. आपल्या बाळांच्या येण्याने जाऊबाई बदलल्या ह्या जाणिवेने राधा सुखावली होती. नऊ महिने हळूहळू सरले. एक दिवस राधाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
काही तासांच्या वेदनांनंतर राधाने दोन गोंडस बाळांना जन्म दिला—एक मुलगा आणि एक मुलगी.
दोन्ही मुलांना घेऊन शिरीष आनंदाने राधाकडे आनंदाने पाहत म्हणाला.
“राधा… आपल्याला जुळे बाळ झाले…मी खूप खुश आहे…” तो म्हणाला. राधा सुद्धा सुखावली.
काही दिवसांनी राधा बाळांना घेऊन घरी आली.
घरात खूप छान स्वागत झालं. नीता रिकाम्या वेळेत बाळाशी छान खेळायची. एक दिवस नीता राधाला एकटी असताना म्हणाली.
“राधा… मला खूप दिवसांपासून तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे…”
“हो, बोला ना जाऊबाई.”
नीता थोडा वेळ थांबली आणि म्हणाली
.
“तुझ्याकडे दोन बाळ आहेत. मला… मला त्यापैकी एक मूल दत्तक दे.”
राधाच्या हातातलं बाळ घट्ट पकडलं गेलं.
क्षणभर तिचं हृदय धडधडायला लागलं.
आता तिच्या लक्षात आलं—नीताचं अचानक बदललेलं वागणं का होतं.
ती शांतपणे म्हणाली—
“माझी मुलं तुमची सुद्धा मुलंच आहेत की. तुम्हीच मोठ करा दोघांनाही. पण दत्तक वगैरे कशाला…?” राधा म्हणाली.
” मी मुलांना मोठ करेन, त्यांच्यासाठी खर्च करेन, चांगलं शिक्षण देईल, सगळ्या सुखसोयी देईल आणि मग मोठं झाल्यावर तू त्यांच्यावर तुझा हक्क सांगशील. त्यामुळे मला आताच कागदोपत्री दत्तक घ्यायचं आहे..” नीता म्हणाली.
त्यांच बोलणं ऐकून राधा आश्चर्यचकित होत म्हणाली.
” माफ करा जाऊबाई. पण मी माझं मूल देऊ शकत नाही. आपण सगळे एकाच घरात राहतो. तुम्ही माझ्या मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवा. पण मोठी आई म्हणून. मी तुम्हाला माझं मूल दत्तक देणार नाही..”
हे ऐकून नीताचा शांत चेहरा लगेच रागात बदलला.
“अगं, तुला दोन बाळ आहेत ना. मला एक दे. माझंही आयुष्य पूर्ण होईल. आणि मी ज्या सुखसुविधा बाळाला देऊ शकते त्या तू या जन्मात सुद्धा देऊ शकणार नाहीस. भाऊजींच्या पगारात दोन मुलांना चांगलं शिक्षण सुद्धा देऊ शकणार नाही तुम्ही. निदान माझ्यासोबत संपत्तीत लोळेल तुझं बाळ…” नीता मोठ्या आवाजात म्हणाली. ह्या दोघींचा आवाज ऐकून सासूबाई तिथे आल्या. राधा काही बोलेल ह्या आधी सासूबाई राधाला म्हणाल्या.
“राधा, नीता बरोबर बोलतेय. तिला मुल नाही आणि तुझ्याकडे दोन बाळ आहेत. तू मुलगा तिला दे. आणि मुलीला तुझ्याकडे ठेव.”
त्यांचे बोलणे ऐकून राधा थक्क झाली.
“आई, तुम्हीही…?” ती निराशेने म्हणाली.
सासूबाई म्हणाल्या—
“उदयने घरासाठी किती केलंय. नीताने सुद्धा खूप मदत केली आहे त्याला. मग त्यांच्यासाठी तू एवढं तर करूच शकते ना. आणि तुझ्याकडे दोन बाळ आहेत म्हणूनच म्हणत आहे ना ती..”
हे ऐकून राधा अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली.
” आई…भाऊजींनी खूप काही केले असेल हे मला मान्य आहे पण आम्ही कधीच त्यांच्याकडे आमच्यासाठी काहीच मागितले नाही. ह्यांच्या जेमतेम पगारात आम्ही भागवतोय. जाऊबाईंनी सुद्धा आम्हाला काय हवं काय नको ते विचारले नाही कधी आणि आम्हाला अपेक्षा पण नाही. ह्यांना मूल हवंय तर मोठीआईच्या नात्याने माझ्या दोन्ही मुलांना सांभाळावं ह्यांनी. माझी काहीच हरकत नाही. पण मी माझं मूल दत्तक देणार नाही. कारण मला माझं मूल कोणालाच द्यायचं नाहीय.”
” तू काय बोलत आहेस ते कळत आहे का तुला. तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर एवढं बोलायची. मी तुझं मूल दत्तक घेऊन तुमच्यावर उपकारच करतेय. आणि तू मला नकार देत आहेस.” नीता रागाने म्हणाली.
” आमची जी लायकी असेल आम्ही त्यातच आमच्या मुलांना मोठ करू. पण माझी मुलं मी माझ्या नजरेआड होऊ देणार नाही.” राधा निर्धाराने म्हणाली.
नीता आणि तिच्या सासूबाई दोघीही रागाने थयथयाट करत तिच्या खोलीतून निघून गेल्या. राधाने मात्र आपल्या दोन्ही बाळांना आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले.
संध्याकाळी शिरीष घरी आला तेव्हा सासूबाईंनी त्याला दुखी चेहऱ्याने एक वेगळीच कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की नीताला मुलबाळ नाही म्हणून राधाने वांझ म्हणत तिचा अपमान केला आणि यापुढे मुलांशी खेळू नकोस असे म्हणाली. शिरीष सुद्धा आईचं बोलणं ऐकून राधालाच बोलला. राधाचं त्याने काहीच ऐकून घेतलं नाही. तो सुद्धा राधाशी फटकून वागू लागला होता. राधासोबत गोड वागणारी नीता आता राधाशी कठोरपणे वागू लागली होती. सासूबाई सुद्धा तिला आडून आडून ती कशी वाईट करतेय असे टोमणे मारायच्या. नवीन आई झालेली राधा ह्या सगळ्यांचा वागणुकीने दुखी झाली होती.
नीता आणि सासूबाईंनी शिरीषलाच एक मूल दत्तक देण्याचं सुचवलं. शिरीषला सुद्धा वाटले की नीता वहिनी दुखी आहेत तर एक बाळ त्यांना दत्तक द्यायला काही हरकत नाही. बाळ राहील तर एकाच घरात. म्हणून त्याने राधाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सुद्धा राधाने ठाम नकार दिला.
” तू वाईट करतेस राधा. वहिनीला बाळ नाही म्हणून त्यांना एवढी मदत आपण केलीच पाहिजे…”
” ही कसली मदत. कोणी आपलं बाळ देत का कुणाला. आणि त्यांनी बाळाला एका मोठी आई सारख वाढवायला माझी मनाई नाही. पण मी माझं बाळ त्यांना दत्तक म्हणून देणार नाही..” राधा म्हणाली.
काही दिवस शिरीष तिच्यावर नाराज राहिला. पण राधा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. मग हळूहळू शिरीषला समजू लागलं की राधा चुकीची नाही. ती फक्त आपल्या मुलांसाठी उभी राहिली होती. एक दिवस त्याने राधाला शांतपणे विचारलं.
“राधा, खरं सांग… त्या दिवशी नेमकं काय झालं होतं?”
तेव्हा राधाने संपूर्ण घटना शांतपणे त्याला सांगितली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण आवाजात कुठलाही राग नव्हता.
“मला जाऊबाईंना दुखवायचं नव्हतं शिरीष… पण आई म्हणून माझ्या हृदयाला ते मान्य नव्हतं.”
शिरीष काही वेळ शांत बसला. त्याला जाणवलं की त्याने राधावर विश्वास ठेवायला हवा होता. त्याने तिची माफी मागितली.
काही महिने असेच गेले. नीता राधाच्या मुलांशी नीट बोलायची नाही. त्यांचे लाड करायची नाही की त्यांना जवळ सुद्धा घ्यायची नाही. उलट मुलांच्या आवाजाने तिची चिडचिड व्हायला लागली होती.
एक दिवस अचानक उदयचा व्यवसाय मोठ्या तोट्यात गेला. कर्ज वाढलं, गाडी विकावी लागली, आणि घरात पैशांची चणचण सुरू झाली. ज्या लोकांमध्ये नीता अभिमानाने वावरायची ते लोक हळूहळू दूर गेले.
आता नीताला समजू लागलं की पैसा कायमचा नसतो. शिरीष मात्र कुठलीही कुरबूर न करता घरखर्च स्वतःच चालवत होता.
त्या काळात राधानेही पैशांचा किंवा इतर कोणताही हिशोब ठेवला नाही. घरात जे काही बनायचं ते सगळ्यांसाठी बनवायची. नीतासाठीही ती तितक्याच प्रेमाने जेवण वाढायची.
एक दिवस राधाची मुलं अंगणात खेळत होती. ते धावत जाऊन नीताला म्हणाले.
“मोठी आई… आमच्यासोबत खेळ ना!”
“मोठी आई” हा शब्द ऐकून नीताच्या डोळ्यांत पाणी आलं.
तिला आठवलं—ज्या मुलांना ती स्वतःपासून वेगळं करायला पाहत होती, तीच मुलं आज तिला इतक्या प्रेमाने हाक मारत होती.
त्या रात्री नीता शांतपणे राधाच्या खोलीत आली. राधा मुलांना झोपवत होती. नीता काही क्षण शांत उभी राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली—
“राधा… मला माफ कर.”
राधा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली.
नीता डोळ्यातल्या अश्रूंनी म्हणाली,
“मी पैशाच्या अहंकारात खूप चुकीचं वागले. तुझ्याकडून मूल मागून मी आईच्या ममतेचा अपमान केला. आज समजतंय… आईसाठी मूल म्हणजे तिचं हृदय असतं. तू मला त्या दिवशी नकार दिलास… तेच योग्य होतं.”
राधाने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली—
“जाऊबाई… तुम्ही त्यांची मोठी आई आहात. माझ्या मुलांना दोन आईंचं प्रेम मिळालं तर त्यापेक्षा मोठं सुख काय असेल?”
हे ऐकून नीता रडू लागली. तिने राधाचा हात हातात घेतला.
त्या दिवसानंतर नीताचा स्वभाव खरोखर बदलला. तिला कळले की आईची ममता पैशांपेक्तीषाया मोठी असते. राधाला कामात मदत करू लागली. मुलांवर मनापासून प्रेम करू लागली.
घरात पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने शांतता आणि प्रेमाचं वातावरण निर्माण झालं.
आणि राधाला जाणवलं—
कधी कधी एखाद्याला हरवून नाही, तर क्षमा करूनच आपण नातं जिंकतो.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
अशीच एक रोचक मराठी कथा वाचा 👇







