लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता.
आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.
हा तोच क्षण होता लग्नाचा…ज्या क्षणापासून ही कथा सुरू झाली होती.
लग्नमंडप दिव्यांनी उजळून निघाला होता. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. पाहुण्यांची ये-जा सुरू होती. कुठे गप्पा, कुठे हशा, तर कुठे फोटो काढण्याची लगबग.
आज मिलिंदचं लग्न होतं. पण या आनंदाच्या गर्दीत एक मन मात्र खूप अस्वस्थ होतं. मनिषा हळूहळू मंडपात प्रवेश करत होती.
तिच्या पावलांमध्ये संकोच होता, पण चेहऱ्यावर शांतता ठेवण्याचा प्रयत्न दिसत होता. तिचं हृदय मात्र जोरात धडधडत होतं.
“आज मी सगळं सांगणार,” ती स्वतःशी म्हणाली.
“आज नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही.” ती मनाशी म्हणाली.
मिलिंद स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला मेघना उभी होती. मेघना लाल साडीत खूप सुंदर दिसत होती. दोघेही पाहुण्यांशी बोलत होते. तेवढ्यात मिलिंदची नजर मनिषावर पडली. क्षणभर तो थांबला. मग तो शांतपणे तिच्याकडे चालत आला.
“कशी आहेस?” त्याने सहज विचारलं.
मनिषा हलकंसं हसली.
“छान आहे… तूम्ही?”
“मी पण ठीक आहे.”
दोघे काही क्षण शांत उभे राहिले.
मिलिंद म्हणाला,
“तू आलीस… बरं वाटलं.”
तिला त्याच्या त्या साध्या शब्दांनीच डोळ्यांत पाणी येण्याची भीती वाटली.
“तुमचं लग्न आहे… येणारच होते,” ती म्हणाली.
दोघे थोडं बाजूला उभे राहिले. गर्दीतही त्यांच्याभोवती एक विचित्र शांतता निर्माण झाली होती. मिलिंद म्हणाला,
“आपण शेवटच्यांदा भेटलो तेव्हा तू खूप शांत दिसत होतीस.”
“हो…कदाचित मी खूप विचार करत होते.” मनिषा हसली.
“जीवन विचित्र असतं ना?”मिलिंद म्हणाला,
“हो,” ती म्हणाली.
“कधी कधी आपण जे गमावतो… तेच नंतर किती महत्त्वाचं होतं हे कळतं.”
त्या शब्दांनी तिच्या मनात वादळ उठलं. ती त्याच्याकडे पाहत होती.
तिला त्याला सगळं सांगायचं होतं.
“मिलिंद… मला काही सांगायचं आहे,” ती म्हणाली.
तो शांतपणे तिच्याकडे पाहू लागला.
“बोल ना.”
पण तेवढ्यात कोणीतरी त्याला आवाज दिला.
“मिलिंद, पंडितजी बोलावत आहेत.”
“मी दोन मिनिटांत येतो.”तो म्हणाला,
मग तो मनिषाकडे वळून म्हणाला,
“तू थांब… आपण बोलू.”
तो निघून गेला.
मनिषा तिथेच उभी राहिली. तिच्या मनात हजारो शब्द होते. पण ते अजूनही ओठांवर येत नव्हते. तेवढ्यात मेघना तिच्याकडे आली. ती हसत म्हणाली,
“तू मनिषा आहेस ना?”
मनिषा थोडी दचकल्यासारखी झाली.
“हो.”
मेघना खूप नम्रपणे म्हणाली,
“मिलिंदने तुझ्याबद्दल खूप सांगितलं आहे.”
“काय?” मनिषा आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाली.
“तो म्हणतो तू खूप चांगली आहेस.”मेघना म्हणाली,
मनिषाच्या डोळ्यांत अश्रू दाटले. ती कसंबसं हसून म्हणाली.
” इतकीही चांगली नाही मी…पण ते स्वतः खूप चांगले असल्याने त्यांना सगळेच चांगले वाटतात. ”
“हो… त्याचा चांगुलपणा मला आता समजत आहे. ते पाहूनच प्रेमात पडली आहे मी त्याच्या…” मेघना गालातल्या गालात हसत म्हणाली.
मनातली जाणीव
मेघनाशी बोलताना मनिषाला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. मेघना मिलिंदसोबत खूप आनंदी दिसत होती. तिच्या डोळ्यांत विश्वास होता.
आणि मिलिंद तिच्याशी खूप काळजीपूर्वक वागत होता. त्या क्षणी मनिषाला जाणवले की
“कदाचित तो तिच्यासोबत खूप खुश आहे.”
काही वेळाने मिलिंद पुन्हा तिच्याकडे आला.
“माफ कर… थोडा उशीर झाला,” तो म्हणाला.
ती हलकंसं हसली.
“ठीक आहे.”
“तू काही सांगणार होतीस ना?”तो म्हणाला,
तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. हीच ती वेळ होती. हीच ती संधी होती.
“मिलिंद…”ती म्हणाली,
तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. पण त्या क्षणी तिने मेघनाकडे पाहिलं. मेघना स्टेजवर उभी होती… आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. मनिषाच्या मनात एक विचार आला.
“मी आता हे सगळं बोलले तर… त्याचं आयुष्य पुन्हा गुंतागुंतीचं होईल. माझ्यामुळे त्याला खूप काही सहन करावं लागलंय आधीच..आता पुन्हा नको…”
ती काही क्षण शांत राहिली.
मग हलकंसं हसली.
“काही खास नाही… फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या.”
“थँक यू.”तो हसून म्हणाला,
“तुम्ही आनंदी राहा… बस इतकीच इच्छा आहे.” तिच्या डोळ्यांत अश्रू आले. पण तिने ते लपवले.
थोड्या वेळाने वकील कागद घेऊन आले.
“सही करायची आहे,” त्यांनी सांगितलं.
मिलिंदने आधी सही केली. मग कागद मनिषासमोर आले. तिने पेन हातात घेतलं. क्षणभर तिचा हात थांबला. तिने एकदा मिलिंदकडे पाहिलं. तो शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिने हलकंसं हसत सही केली.
सही झाल्यावर मिलिंद म्हणाला,
“तू ठीक आहेस ना?”
“हो… आता खरंच ठीक आहे.” ती म्हणाली.
“तुझ्या पुढील आयुष्यात खूप आनंद येवो.” तो हसून म्हणाला.
“तुमच्याही” ती मनापासून म्हणाली.
मनिषा हळूहळू मंडपातून बाहेर पडली. मागे ढोल-ताशांचा आवाज सुरू झाला. लोक आनंदात ओरडत होते. स्टेजवर मिलिंद आणि मेघना वरमाला घालत होते. मनिषाने शेवटचा एकदा मागे वळून पाहिलं. मिलिंद हसत होता. तीही हलकंसं हसली. आणि शांतपणे चालत निघून गेली. मंडपातूनही अन् त्याच्या आयुष्यातूनही.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
कथा कशी वाटली ते नक्की सांगा. मनिषा चा त्याला काहीही न सांगण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का ? त्याचे लग्न मेघना ऐवजी मनिषा सोबत व्हायला पाहिजे होते असे तुम्हाला वाटते का. नक्की कळवा.




