समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
मग शालूताई त्यांना म्हणाल्या.
” अरे असा काय बघत आहेस??? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं… शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या मुलीसाठी किती चांगलं स्थळ आणलं होतं…”
” या सगळ्या गोष्टींना काही अर्थ आहे का ताई आता??? आपण घरी जाऊयात…” प्रकाश राव ओशाळत म्हणाले.
” थोडा वेळ थांबून घरीच जायचं आहे… चल आत..”असे म्हणत प्रकाशरावांची वाट न पाहता शालू ताई आत गेल्या सुद्धा.
मग रवीची आई प्रकाशरावांना म्हणाली.
“या ना दादा आत…”
मग प्रकाशरावांच्या वागण्यातील असहजता जरा कमी झाली. ते आतमध्ये येऊन बसले. रवीची आई पुन्हा त्यांना म्हणाली.
” जे झालं ते होऊन गेलं… मला माहित आहे ह्यात तुमची काही चूक नव्हती… तुमची मुलगी आणि बायको अशा वागतील हे तुम्हाला थोडीच माहीत असेल… आणि आमच्या रवीच लग्न झालंय आता… मी तर म्हणते बरच झालं एका अर्थाने… नाहीतर सुजाता सारखी मुलगी आम्हाला थोडीच मिळाली असती…”
आता मात्र प्रकाशरावांना सगळं काही जसच्या तसं आठवायला लागलं. लग्नाचा दिवस आणि ऐन लग्नाच्या दिवशी नंदिनीने लग्नाला नाही म्हणणे. सगळे म्हणजे सगळेच लख्ख आठवायला लागले. शालू ताईंचा उद्देश पूर्ण होताना दिसत होता. इतक्यात रवीच्या आईने सुजाताला आवाज दिला आणि म्हणाल्या.
” सुजाता… इकडे ये बाळ… बघ घरी पाहुणे आलेत…”
सुजाता लगेच तिच्या खोलीतून बाहेर आली. सुजाता आज कधी नव्हे ती खूप साऱ्या दागिन्यांनी सजलेली होती. सासूबाईंनी तिला आज खूप महागातील एक साडी नेसायला म्हणून काढून दिली होती. एकदमच लक्ष्मी दिसत होती सुजाता. तिच्याकडे पाहत सासुबाई म्हणाल्या.
” हे शालू ताईंचे भाऊ आहेत… रक्षाबंधनाला आलेत इथे… नमस्कार कर त्यांना…”
सुजाताने समोर येऊन नमस्कार केला. प्रकाशराव तर जणू तिच्यात कुठेतरी त्यांच्या नंदिनीला शोधत होते. इतक्यात नोकराने खाण्यापिण्यासाठी अनेक जिन्नस एका ट्रे मध्ये सजवून त्यांच्यासमोर आणले. प्रकाशराव तर इतकं सगळं एकत्र पाहून चक्रावलेच.
जर नंदिनीचे लग्न ह्या घरात झाले असते तर आज सुजाताच्या जागी नंदिनी हे सुख उपभोगत असती ह्या कल्पनेनेच ते मनातून सुखावले होते. पण जेव्हा त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा मात्र ते स्वप्नातून खाडकन जागे झाले.
नंदिनीने स्वतःच्या पायाने या वैभवाला लाथाडले हे आठवून तर त्यांच्या रागात आणखीनच भर पडली. कुठेतरी त्यांच्या मनात उषाताईंना जाऊन परत आणायचा विचार येत होता तो आता एकदमच बदलला होता. त्यांची एकंदर मनस्थिती ओळखून रवीची आई म्हणाली.
” तुम्ही येणार हे आधीच माहिती असतं ना तर रवीला आज घरीच थांबायला सांगितले असते… तेवढीच भेट झाली असती… पण हल्ली ऑफिस चे कामही खूप वाढले आहे त्याचे… नुसता कामात असतो…”
हे ऐकून सुजाताने प्रश्नार्थक नजरेने सासूबाईंकडे पाहिले. तिच्या सासूबाईंनी तिला पाहून नजरेने काहीतरी इशारा केला तशी ती एकदमच मान खाली घालून गप्प बसली. मग पुन्हा तिच्या सासुबाई तिला म्हणाल्या.
” सुजाता बाळ… तुला शॉपिंगला जायचे होते ना… जा अन् जाऊन तयारी कर बाहेर जाण्याची… मी आपल्या ड्रायव्हर ला सांगते गाडी तयार ठेवायला…”
असे म्हटल्यावर सुजाता लगेच तिथून उठून आतमध्ये निघून गेली. मग पुन्हा तिच्या सासुबाई प्रकाशरावांना म्हणाल्या.
” आता नवीन नवीनच आलीय ना ह्या शहरात… इतक्या दूर आल्यावर सुरुवातीला तिचं मन रमावं म्हणून रोजच तिला कुठेतरी पाठवतो आम्ही… कधी रवी घेऊन जातो तर कधी मी… दुसऱ्याची लेक असली तरी आम्हाला मात्र आमच्या मुलीसारखीच हो…”
” खरंय तुमचं… तुम्ही खरंच खूप चांगल्या सासुबाई आहात… नाहीतर आजकालच्या जगात तुमच्यासारखी सासू अन् असे सासर मिळणे महाकठीण ग बाई… पण आमची नंदिनीच कमनशिबी होती त्यात आपण काय करणार…” शालूताई मध्येच म्हणाल्या.
” जाऊदेत ते विषय आता शालूताई… बरं आता आल्या आहात तर जेवण करूनच जा… मी आताच सांगते गरम गरम जेवण वाढायला…” रवीची आई म्हणाली.
” नाही नको… घरून जेवण करूनच निघालो आहोत आम्ही…” शालूताई म्हणाल्या.
मग त्यांनी एकदोनदा आग्रह केला पण शालूताईंनी पुन्हा कधी येईल असे म्हणून त्यांना टाळले आणि घरी यायला निघाल्या. प्रकाशरावांच्या डोळ्यापुढे मात्र त्यांची श्रीमंती, त्यांचा पाहुणचार आणि सुजाताच्या अंगावरील दागिने हे येत होते.
त्यांच्या मनात असणारा उषाताई आणि नंदिनीवरचा राग पुन्हा उफाळून आला होता. किंबहुना तो आधीपेक्षा कैकपटीने वाढला होता. शालूताई मात्र प्रकाशरावांकडे पाहून अगदीच आश्वस्त झाली होती की ज्या उद्देशासाठी त्यांनी प्रकाशरावांना रवीच्या घरी नेले होते तो उद्देश्य पूर्ण झाला होता.
इकडे सुजाताला मात्र अजूनही कळत नव्हते की हे सगळे काय चालले आहे. कधी नव्हते ते सासूबाईंनी तिला एवढी महागातील साडी आणून दिली होती. या घरात आल्यापासून साध्या मंगळसुत्रशिवाय दुसरा दागिना तिने घातला नव्हता पण आज मात्र इतके दागिने घालायला दिले.
शिवाय आज स्वयंपाकघरातील कामांपासून सुद्धा सुट्टी दिली. सासुबाई इतक्या कशा बदलल्या ह्याचं तर नवल वाटत होतच पण आज आलेले पाहुणे नेमके कोण ह्याचे कुतूहल सुद्धा मनात होते. रविच्या बाबतीत सुद्धा किती सफाईने सासुबाई खोट्या बोलल्या हे सुद्धा तिने पाहिले होते.
पण ह्याचे मात्र तिला काही फारसे नवल वाटले नाही. कारण खोटं तर आधीपासूनच बोलत होत्या त्या. त्यांनी लग्नाच्या वेळी बोललेल्या जवळपास सगळ्याच गोष्टी खोट्या होत्या हे तिला लग्न झाल्यावर चारच दिवसात कळून चुकले होते. रवीचे शिक्षण, रवीची नोकरी, त्याच्या घरच्यांचा चांगुलपणा हे सगळंच खोटं निघालं होतं.
लग्न करून घरी आल्यावर पहिल्याच रात्री तिने त्याच्यातील पशूचा अनुभव घेतला होता. स्वतःच्या अशक्त अंगकाठीमुळे, व्यसनामुळे, सतत नाकारल्यामुळे मनात असणारा त्याचा न्यूनगंड त्याने तिच्यावर ताकद आजमावून दूर करू पाहिला होता. नंदिनीने त्याला पाहताच ऐन मांडवात दिलेला नकार आणि नंदिनी इतकी सुंदर नसणारी सुजाता बायको म्हणून भेटल्याचा राग तो आता सुजातावरच काढत होता.
कुठे नुकतीच विशी पार केलेली, डोळ्यात अनेक स्वप्ने घेऊन सासरी आलेली सुजाता आणि कुठे तो पस्तिशी उलटलेला, व्यसनांच्या आहारी गेलेला रवी. दोघांमध्ये कुठलेच साम्य नव्हते. पण परिस्थितीने दोघांनाही एकत्र बांधले होते. तिने त्याच्याशी संवाद साधण्याचा एक दोनदा प्रयत्न केला होता पण त्याच्या बोलण्यात एक तोचतोपणा होता. त्याला फक्त एकाच गोष्टीशी घेणं देणं होतं. तिच्या मनाचा विचार तर त्याच्या मनात कुठे दूर दूर सुद्धा नव्हता.
त्याच्या तोंडातून सतत येणारा दारूचा वास तर तिला असह्य झाला होता. पण नवरा म्हटलं की त्याचं सगळं सहन करणं आलंच ह्याच बाळकडू आधी पासूनच मुलींना दिलं जातं. सुजाता सुद्धा त्याला अपवाद नव्हती. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी बळेच तिच्याजवळ असलेले सगळे दागिने काढून घेतले तेव्हा त्यांच्या मनाची श्रीमंती किती आहे हे ही तिला कळून चुकले होते.
आठवड्याभरातच तिची रवानगी स्वयंपाकघरात करण्यात आली. आता तिचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सगळा वेळ कामातच जायचा. तिला कामात जुंपण्यामागे सासूबाईंचा विशिष्ट हेतू होता. त्यांच्या मते ती दिवसरात्र कामात असली तर इतर गोष्टींमध्ये तिचे लक्ष जाणार नाही.
ती रवीची तक्रार करण्यास धजावणार नाही हा त्या मागचा उद्देश. शिवाय सासुबाई सुद्धा नंदिनीबद्दलचा मनात असलेला राग थोड्याफार प्रमाणात का होईना सुजातावर काढायच्याच. सुजाताला आता सगळे काही समजून चुकले होते. रवी दिवसभर फक्त दारू पिऊन झोपा काढतो आणि रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत बाहेर फिरत असतो हे ते तिच्या केव्हाच लक्षात आले होते.
आपण पुरते फसल्या गेलोय हे न कळण्याईतपत नासमज ती नव्हतीच मुळी. पण आता तिचाही नाईलाज होता. एकतर त्या पाच बहिणी आणि ही त्यात सगळ्यात मोठी. बाबांचा आधीपासून मुलींवर राग होता. कारण त्यांना मुलगा हवा होता पण मुलाच्या प्रतीक्षेत पाच मुलीच झाल्या.
आधीच जेमतेम परिस्थिती आणि त्यात पाच मुलींच्या लग्नाची जबाबदारी. अशाने त्यांनी मुलींना मुली कमी आणि भारच जास्त समजले होते. आणि सूजाताच्या लग्नाच्या निमित्ताने तो भार थोडा हलका झाला होता. समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढीस लागली होती आणि चार लहान बहिणींवर असणारा राग थोडा का होईना कमी झाला होता.
अशात घरच्यांना सगळ्या परिस्थीतीची कल्पना देणे म्हणजे त्यांच्या आनंदावर विरजण घालण्यासारखे होते. आपण जर थोडेफार दुःख सहन केल्याने आपल्या घरच्यांना सुख मिळत असेल तर काय हरकत आहे म्हणून सुजाता ओठांवर एक शब्दही न येऊ देता सगळं काही सहन करत होती.
एकदा मात्र तिने मोठ्या हिमतीने सासूबाईंकडे जाऊन विषय काढला. म्हणाली.
” सासुबाई… हे रोज दारू पितात… अगदी नीट चालताही येणार नाही एवढी दारू पितात… तुम्ही ह्यांच्याशी एकदा बोला ना… दारू पिऊ नका म्हणून…”
त्यावर सासुबाई तिच्यावर मोठ्याने ओरडत म्हणाल्या.
” अगं ए… आम्ही इतकं मोठं केलं त्याला… आजवर सांभाळलं… आणि पुढेही आम्हीच सांभाळायचे का? असेच करायचे असते तर त्याचे लग्न कशाला लावून दिले असते… ते काम आता तुझं आहे… स्वतःच्या नवऱ्याला ही सांभाळू शकत नसशील तर मग तुझा उपयोग तरी काय? तुला काय फक्त इथे आमच्या पैशांवर मजा मारायला म्हणून लग्न करून आणलंय का?”
सासूबाईंनी असे बोलल्यावर सुजाताला जे कळायचं होतं ते कळून चुकलं होतं. आपल्या आयुष्यात आता हे सहन करण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही हे जाणून पुढे येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिक तयारी तिने करून ठेवली होती.
आज जे आयुष्य नंदिनीच्या वाट्याला येणार होते ते सुजाताच्या वाट्याला आले होते. आणि आपल्या वाट्याचे आयुष्य कुणीतरी दुसरंच जगतय ह्या सत्य परिस्थिती पासून अनभिज्ञ असणाऱ्या नंदिनीचे आयुष्य मात्र एक नवीन वळण घेणार होते.
क्रमशः
सुजाताच्या नशिबात शेवटी काय लिहिले असेल…? नं
दिनीचे आयुष्य पुढे कोणते वळण घेईल…? प्रकाशराव आता पुढे काय करतील…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका 😊





