सरलाताईंनी गरम गरम स्वयंपाक करून नंदिनीला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी नंदिनी नंतर व्यवस्थित जेवली. उषाताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन सरला ताईंना फोन लावला आणि नंदिनी ची चौकशी केली. सरला ताईंनी नंदिनी कडे फोन नेऊन दिला. उषाताईंनी तिला विचारले.
कशी आहेस बाळा…?
ठीक आहे आई…
आणि असे म्हणताच तिचा हुंदका बाहेर पडला. ती रडायला लागली. उषाताई काळजीत पडल्या. त्यांनी तिला विचारले.
काय झालं नंदिनी…? तू अशी रडत का आहेस…?
तुझी खूप आठवण येत आहे आई… नंदिनी म्हणाली.
मलापण तुझी खूप आठवण येत आहे बाळ… पण तू काळजी नकोस करू… सरलाआत्या आहे ना… त्या तुझी व्यवस्थित काळजी घेतील… उषाताई म्हणाल्या.
त्याची मला खात्री पटली आहे आई… खरं सांगायचं म्हणजे इथे आल्यावर मला एकदमच सुरक्षित वाटतंय… नाहीतर दुपारपर्यंत मनात भीती होती की बाबा काहीही करून माझं लग्न त्या माणसाशी लावून देतील… नंदिनी ने मनातील भीती बोलून दाखवली.
आता तू त्या गोष्टींची आठवण सुद्धा मनात ठेवू नकोस… वाईट स्वप्न समजून विसरून जा… उषाताई म्हणाल्या.
पण आई… येताना बाबा बोलले सुद्धा नाहीत ग माझ्याशी… माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही… माझ्यावर रागावलेत का ग ते… नंदिनी ने विचारले.
असे काही नाही बाळा… पण बाबा सध्या रागात आहेत ना म्हणून… त्यांचा राग ओसरला की ते आपोआप शांत होतील… उषाताई म्हणाल्या.
तुला काही बोलले का ते…? नंदिनी ने काळजीने विचारले.
तू त्याची काळजी नकोस करू… मला काहीच नाही बोलले ते… तू फक्त स्वतःची काळजी घे… इकडे मी सांभाळेन सर्व… उषाताई म्हणाल्या.
ठीक आहे… तू पण स्वतःची काळजी घे… मी इथे ठीक आहे… नंदिनी म्हणाली.
मग नंदिनीने फोन सरलाताईंना दिला. सरलाताई उषाताईंना म्हणाल्या.
तू अजिबात काळजी करू नकोस उषा… मी व्यवस्थित काळजी घेईन नंदिनीची… सरलाताई म्हणाल्या.
ते मला माहिती आहे ताई… स्वतःपेक्षा ही जास्त विश्वास आहे मला तुमच्यावर… तुम्ही आज माझ्या मुलीचं आयुष्य वाचवलत… मी तुमचे उपकार कसे फेडणार आहे देव जाणे… मला तर काहीच सुचत नव्हतं… पण तुम्ही साथ दिली म्हणून या सगळ्यातून बाहेर पडता आले… जणू काही देवानेच तुम्हाला माझी मदत करायला पाठवले होते… पण काळजी नंदिनीची वाटतेय… तिला या सगळ्यातून निघायला वेळ लागेल अजुन… अन् नंदिनीचे बाबा सुद्धा कधीपर्यंत मनात राग ठेवतील काय माहित… उषाताई म्हणाल्या.
त्याची चूक त्याला कळली की आपोआप सरळ होईल तो… तेव्हा पश्चात्ताप सुद्धा होईल त्याला… फक्त आता जरा सांभाळून घे त्याच्या रागाला… सरला ताई म्हणाल्या.
हो ताई… एवढे बोलून उषाताईंनी फोन ठेवून दिला.
उषाताईंनी नंदिनीला कपडे बदलायला सांगितले. आताशा नंदिनीला जरा बरं वाटत होतं. आणि सरलाआत्याचा खूप आधार सुद्धा वाटत होता. एकीकडे तिची सख्खी आत्या होती जिने सगळं काही माहिती असून सुद्धा ती सोयरिक साधली. आणि एकीकडे सरला आत्या होती जिने कुठलाही विचार न करता नंदिनीच्या भल्यासाठी स्वतःच्या मुलाला ऐन वेळेवर लग्नासाठी तयार केले.
काहीही झाले तरी नकुल त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला चांगलं शिकवलं. तो नोकरीला लागला. तेव्हा त्याच्या लग्नाबाबत त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा सुद्धा असतीलच. पण त्यांनी त्यावेळी फक्त एक स्त्री म्हणून विचार केला. जिथे नंदिनीचे बाबा सगळं काही खरं समजल्यावर सुद्धा इभ्रतीपायी तिचे लग्न त्यांच्याशी लावायला तयार झाले होते तिथे नकुलच्या आई बाबांनी मात्र तिच्या मनाचा विचार केला.
आज तर नंदिनीला तिचे बाबा जणू काही कुणी अनोळखी व्यक्ती असल्यासारखे भासत होते. काल तेच स्वतःहून तिला म्हणाले होते की ते हे सगळं फक्त तिच्या सुखासाठी करत आहेत आणि तिला आयुष्यात कुठलीही अडचण आली तर सर्वप्रथम त्यांना सांगायची म्हणून.
अन् आज तेच लोक काय म्हणतीलच्या नावाखाली तिला त्यांच्या हवाली करणार होते. नंदिनीचं आयुष्य एकाच दिवसात पूर्णपणे बदललं होतं. पण सरला आत्याच्या घरी तिला सुरक्षित वाटत होतं. आत्याने सुद्धा त्या रात्री तिला स्वतःजवळच झोपवले.
कारण तिला एकटीला झोपू द्यावं अशी तिची मनस्थिती नव्हती. सुनीलराव नकुलच्या खोलीत जाऊन झोपले होते. नकुल तर घरी आल्यापासून त्याच्या खोलीतून बाहेरच निघाला नव्हता. त्याला राहून राहून सगळं आठवत होतं. तशी त्याच्या बाबांनी तात्पुरती त्याची समजूत काढली होती. पण त्याने किती समजून घेतले हे त्याचे त्यालाच माहीत होते.
इकडे रात्री शालूताईचा प्रकाशरावांना फोन आला. आणि तिने जे सांगितले ते ऐकून प्रकाशरावांना धक्का सुद्धा बसला आणि उषाताईंवरील राग आणखीनच वाढला. शालूताईने सांगितले की रवीच्या घरच्यांना लग्न न करता परत जाणे कमीपणाचे वाटत होते. काहीही करून त्यांना रवीचे लग्न करायचे होते.
म्हणून त्यांनी जवळपासच्या सगळ्याच नातेवाईकांना फोन करून सांगितले की रवीच्या होणाऱ्या बायकोचं तिच्या आतेभावा बरोबर प्रेमप्रकरण सुरू असल्याने तिने आज ऐन मांडवात रवीऐवजी त्याच्याबरोबर लग्न केले आणि आता त्यांना रवीच्या लग्नासाठी मुलगी शोधायची आहे.
मुलगी कशीही असली तरी चालेल फक्त लग्न आजच्या आज व्हायला हवं. सगळ्यांनी झाल्या प्रकाराबद्दल त्यांच्याकडे हळहळ व्यक्त केली आणि मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मग शालू आत्याच्या नवऱ्याला त्यांच्या दूरच्या नात्यातील बहिणीची पुतणी आठवली.
त्यांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्यातच मुलगा व्हायची वाट पाहता एकामागोमाग पाच मुलींचा जन्म झाला होता. त्यातील सुजाता ही सगळ्यात मोठी मुलगी. त्यांनी कधीतरी सांगितलं होतं की तिच्या लग्नासाठी एखादा मुलगा पाहा म्हणून. मग आता त्यांनी सुजाताच्या वडिलांना फोन केला आणि सगळ्या परिस्थीती ची कल्पना दिली.
नंदिनीचे दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू आहे म्हणून ऐन मांडवात हे लग्न मोडले हे सुद्धा तिखटमीठ लावून सांगितले. तुम्हाला जर काही हरकत नसेल सुजाता चे लग्न रवी शी व्हावे अशी आमची इच्छा आहे. सोबतच रवी किती श्रीमंत घरातील मुलगा आहे, तो किती जास्त शिकलेला आहे आणि खूप चांगल्या नोकरीला आहे अशा अनेक गोष्टी त्यांना पटवून सांगितल्या.
त्याच्यासाठी खूप श्रीमंत घरातून स्थळं आली होती पण शालूच्या म्हणण्यावरून आम्ही साधारण घरातील नंदिनी शी लग्न जुळवले होते पण ती सुद्धा अशी निघाली. आता ऐन वेळेवर लग्नासाठी मुलगी कुठे शोधायची म्हणून मला तुम्ही आठवलात.
नंदिनी च्या घरची माणसे तर अजिबात माणुसकीची नाहीत निघाली. पण तुम्हाला मी खूप आधीपासून ओळखतो. अनेक जणांकडून तुमचं नाव ऐकून आहे की दादाराव खूपच चांगले गृहस्थ आहेत म्हणून. म्हणून लगेच डोक्यात तुमचं नाव आलं. अशी म्हणून शक्य तितकी त्यांची स्तुती सुद्धा केली.
सुजाताच्या वडिलांना तर कसेही करून सुजाताचे लग्न लावायचे होते. त्यांच्यासाठी तर ही सुवर्णसंधी होती. आधीच पाच मुलींचं लग्न कसं करायचं ह्याचं टेन्शन आणि त्यातच मुलगा नाही झाल्याचा राग यामुळे आधीच त्यांना कसेही करून पाचही मुलींची लग्न लवकर लावायची होती.
म्हणून मग त्यांनी लग्नासाठी लगेच होकार दिला आणि मग हे सगळं वऱ्हाड तिथे लग्नासाठी हजर झालं. तोवर रवीची दारुही चांगलीच उतरली होती. मुलाकडच्यांनी त्यांना सोबत आणलेले दागिने आणि साडी दिली तेव्हा तर त्यांचे डोळे दिपले. अतिशय आनंदाने त्यांनी सुजाता आणि रवीचे लग्न लावून दिले.
आणि रात्री उशिरा ती मंडळी नवरीला घेऊन निघून सुद्धा गेली. सुजाताच्या वडिलांचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. कारण कितीही शोधलं असतं तरी त्यांना रवीच्या घरासारखे श्रीमंत घर कधीच सापडले नसते. आणि सध्यातरी त्यांना याशिवाय आणखी काहीच महत्त्वाचे वाटत नव्हते.
हीच खबर शालूताईंनी तिखटमीठ लावून प्रकाशरावांना सांगितली होती. त्या पुढे म्हणाल्या रवीला नंदिनीपेक्षाही चांगली आणि संस्कारी बायको भेटली आहे. बरं झालं नंदिनीशी त्याचं लग्न नाही झालं नाहीतर तिने पुढे चांगला संसार नसता केला रविसोबत. मला तर वाटलं होतं की नंदिनी तुझ्या आज्ञेत आहे पण तसे काहीच नाही. तुझ्या शब्दाचा मान तिने राखला नाही. असेच आणखीन बरेच काही काही सांगितले होते.
प्रकाशराव हे सगळं ऐकून आणखीनच चिडले. जर ती सुजाता ऐन वेळेवर रविशी लग्न जरी शकते तर नंदिनीने लग्न करायला काय झाले होते असा विचार त्यांच्या मनात आला. आता मात्र त्यांना उषाताईंसोबतच त्यांना नंदिनीचा सुद्धा राग यायला लागला. रात्रभर ते याच विचारात होते.
नंदिनीला सुद्धा रात्रभर झोप आली नाही. पहाटे कुठेतरी तिचा डोळा लागला. पण तरीही सकाळी पुन्हा लवकर उठली. सरला आत्या घरातील कामे उरकत होत्या. ही त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली.
आत्या… मी काही मदत करू का…?
अगं तू इतक्या लवकर कशाला उठलीस… जाऊन आराम कर जरावेळ… मला माहिती आहे तुला रात्रभर नीट झोप आली नाही… आत्या म्हणाली.
मला आताही झोप येणार नाही… मला तुमची मदत करू देत… नंदिनी ने विचारले.
ठीक आहे… तू जरा चहाचं आधन ठेव गॅसवर… आत्या म्हणाली.
तशी नंदिनी कामाला लागली. सकाळी उठून खोलीतून बाहेर येताना नकुल ने किचन मधल्या खिडकी मधून नंदिनीला किचन मध्ये काम करताना पाहिले. मनातल्या मनात त्याने विचार केला की कालच हिच्यासोबत इतकी मोठी घटना झाली आहे आणि आज हिने सगळं विसरून नवीन आयुष्याची सुरुवात सुद्धा केलीय.
क्रमशः





